

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील शिक्षक पदभरती प्रक्रियेला गती मिळाली असून, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ च्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिफारस झालेल्या उमेदवारांचे समुपदेशन पूर्ण करण्यात आले आहे.
या प्रक्रियेत मराठी, हिंदी आणि उर्दू माध्यमांतील एकूण १३९ उमेदवारांचे समुपदेशन करण्यात आले. त्यापैकी १३० उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण सुरू करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांनी दिली.
चिंचवड येथील प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज येथे सोमवारी (दि. २) ही प्रक्रिया पार पडली. पहिल्या व दुसऱ्या फेरीत शिफारस झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर शासनाच्या निर्धारित निकषांनुसार दिव्यांग, महिला आणि इतर उमेदवारांना त्यांच्या गुणानुक्रमानुसार समुपदेशनाची संधी देण्यात आली.
उपलब्ध रिक्त पदे, माध्यम आणि पदनिहाय उमेदवारांना नियुक्तीसाठी संधी देण्यात आली. समुपदेशन प्रक्रियेत एक उमेदवार शैक्षणिक अर्हतेच्या कारणास्तव अपात्र ठरला आहे.
या भरती प्रक्रियेतील विशेष बाब म्हणजे महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेतलेल्या दोन माजी विद्यार्थ्यांची शिक्षकपदी निवड झाली आहे. ज्या शाळांमध्ये शिक्षण घेतले, त्याच शिक्षण व्यवस्थेत शिक्षक म्हणून सेवा करण्याची संधी मिळणे ही महापालिकेच्या शैक्षणिक वाटचालीसाठी अभिमानास्पद बाब मानली जात आहे.
महापालिका शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता होती, परंतु आता पवित्र पोर्टलव्दारे १३० शिक्षक मिळणार आहेत. शिक्षकांच्या भरतीमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मोठी मदत होणार आहे. ज्या शाळेमध्ये शिक्षक कमी आहेत, त्याठिकाणी प्राधान्याने शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.
- ममता शिंदे, उपायुक्त, शिक्षण विभाग, महापालिका