Water Supply Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Water Cut Continues: पवना धरण ७७ टक्के भरले, तरी पिंपरी-चिंचवडकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार!

पूर आला, धरण साठा वाढला; मात्र जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार १५ टक्के पाणी कपात कायम, ऑक्टोबरपर्यंत निर्णय नाही

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस होऊन पवना आणि इंद्रायणी नदीस पूर आला होता. तसेच, पवना धरण 77 टक्के भरले आहे. असे असतानाही शहरात सुरू असलेली 15 टक्के पाणी कपात यापुढेही सुरूच राहणार असल्याने प्रशासनाने जाहीर केले आहे.

जून महिना संपला तरी, पावसाळा सुरू न झाल्याने तसेच, शहराची तहान भागविणार्‍या पवना धरणात केवळ 16 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने 15 टक्के पाणी कपात सुरू केली होती. ती कपात शहरात 19 जूनपासून सुरू करण्यात आली होती. त्यामुळे शहरात नेहमीपेक्षा अर्धा ते एक तासाने पाणी कमी सोडण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांत पाणीटंचाईचा सामना करावा लागला.

मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. पाच व सहा जुलैला झालेल्या धुवाधार पावसामुळे पवना आणि इंद्रायणी नदीस पूर येऊन अनेकांच्या घरात तसेच, हाऊसिंग सोसायट्यांत पाणी शिरले. पवना धरणात अल्पावधीतच तब्बल 77.28 टक्के भरले आहे. त्यामुळे पाणी कपात रद्द होईल, अशी शहरवासीयांना आशा होती. मात्र, एल निनोचा प्रभाव कमी झाला नसून, पाण्याचे आतापासूनच नियोजन करून काटकसरीने पाण्याचा वापर करण्याची सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेस केली आहे. तसेच, पाणी कपात कायम ठेवण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने पाणी कपात मागे घेतलेली नाही.

पाण्याची नासाडी करणार्‍यावर कारवाई नाहीच

पिंपरी-चिंचवड शहरात पाणी कपात लागू केल्यानंतर पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले होते. शहरात पाण्याची नासाडी तसेच, अपव्यय करणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पाणीपुरवठा विभागास दिले होते. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथकेही नेमण्यात आले होते. आत्तापर्यंत एकाही व्यक्तीवर कारवाई करण्यात आली नसल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे. शहरात अंगण, रस्ते, पार्किंग तसेच, वाहने धुणे, टाकी भरून वाहने असे प्रकार कायम आहेत. उघडेपणे पाण्याची नासाडी केली जात आहे. शहरात ठिकठिकाणी खुलेआमपणे वाहन धुताना दिसतात.

ऑक्टोबरपर्यंत धरणात 100 टक्के साठा असल्यास पाणी कपात रद्द होईल

पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेली 15 टक्के पाणी कपात कायम ठेवण्यात येणार आहे. ऑक्टोबरपर्यंत धरणात शंभर टक्के पाणीसाठा असल्यानंतरच ती कपात रद्द केली जाईल. अन्यथा कपात पुढेही कायम ठेवण्यात येणार आहे. सध्या पाणी कपात असली तरी, नागरिकांच्या तक्रारींचे प्रमाण बरेच कमी झाले आहे, असे महापालिकेचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT