Moshi Garbage Depot Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Waste Processing: कचरा प्रक्रिया केंद्रांवरून नगरसेवकांमध्येच मतभेद; प्रशासनासमोर पेच

दहा ठिकाणांची घोषणा होताच स्थानिक लोकप्रतिनिधींचा विरोध; सभागृहातील मागणी आणि प्रत्यक्षातील भूमिकेत विसंगती

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात दहा ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्रांच्या ठिकाणची घोषणा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केली आहे. मात्र, आमच्या प्रभागात कचरा केंद्र नको, असा दबाव स्थानिक नगरसेवकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे घनकचरा समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नांना खो बसत असून, विरोधामुळे प्रशासन हतबल झाले आहे.

महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाती अनधिकृत प्रशासकीय इमारत कोसळल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत 9 कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. तर, काही कर्मचारी जखमी झाले आहेत. ती घटना 8 जुलैला घडली. त्यानंतर संपूर्ण शहरात कचरा कोंडीची समस्या निर्माण झाली. कचरा कोठे डम्प करायचा, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. तात्पुरता पर्याय म्हणून सध्या मोशी डेपोतच कचरा डम्प केला जात आहे.

शहरातील दहा क्षेत्रीय कार्यालयात एक असे एकूण दहा ठिकाणी कचरा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. जागांचा शोध घेऊन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्या जागांची यादी 13 सप्टेंबरला जाहीर केली. त्यानंतर नगरसेवकांसह त्या प्रभागातील विविध संघटना, माजी नगरसेवक, पदाधिकारी व नागरिकांकडून तेथे कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करण्यास विरोध करण्यात येत आहेत. त्याबाबत आयुक्तांना आणि वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटून दबाव टाकला जात आहे. कोणत्याही परिस्थितीत कचरा केंद्र आमच्या प्रभागात करू नका, असा आग्रह धरला जात आहे. या विरोधामुळे प्रशासन हतलब झाले आहे. नगरसेवकच विरोध करत असतील तर, कचरा प्रक्रिया केंद्र सुरू कोठे करायचे, शहराचा कचरा प्रश्न कसा सोडवायचा, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा झाला आहे.

नगरसेवकांची सभागृहात एक आणि बाहेर एक अशी भूमिका

मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील अनधिकृत प्रशासकीय इमारत कोसळल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत 9 कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला तर, काही कर्मचारी जखमी झाले आहेत. त्या दुर्घटनेनंतर शहरात कचरा कोंडी निर्माण झाली. त्यानंतर सभागृहात सर्व पक्षीय नगरसेवकांनी सर्व 32 प्रभागात एक कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करण्याची मागणी लावून धरली होती. आता, प्रत्यक्षात आयुक्तांनी उपलब्ध असलेल्या दहा जागांची घोषणा केल्यानंतर काही नगरसेवकांनी आमच्या प्रभागात कचरा केंद्र नको, अशी उलटी भूमिका घेतली आहे. प्रभागातील विविध संघटना, पदाधिकार्‍यांना सोबत घेऊन नगरसेवकांनी प्रभागातील प्रस्तावित कचरा केंद्र रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे. नगरसेवकांच्या या परस्पर विरोधी भूमिकेमुळे आश्चर्य तसेच, संताप व्यक्त केला जात आहे.

सर्व बाबींचा विचार करून अंतिम निर्णय घेणार

प्रस्तावित दहा जागांच्या क्षेत्रफळानुसार तेथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुर्गंधविरहीत ट्रान्स्फर स्टेशन, मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी, बायोगॅस, बायोफ्युएल तसेच, प्लास्टिकपासून उपयुक्त उत्पादने तयार करण्यासंदर्भातील विविध प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक जागेची तांत्रिक व व्यवहार्यता तपासणी करण्यात आली आहे. सर्व संबंधित बाबींचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे.

या ठिकाणी सुरू करणार कचरा प्रक्रिया केंद्र

1) प्रभाग क्रमांक 13- निगडी-यमुनानगरमधील सेक्टर क्रमांक 22 येथील पाण्याच्या टाकीजवळ 2) प्रभाग क्रमांक 17-दळवीनगर, वाल्हेकरवाडी, बिजलीनगरमधील चिंचवड, आरक्षण क्रमांक 1/89, सर्व्हे क्रमांक 113, 114 व 116 पैकी 3) प्रभाग क्रमांक 18- तानाजीनगर, चिंचवड गावामधील चिंचवड आरक्षण क्रमांक 221 4) प्रभाग क्रमांक 10- मोरवाडी, शाहूनगर, संभाजीनगरमधील दत्तनगर, राम मंदिराजवळ 5) सर्व्हे क्रमांक 77, दिघी गायरान 6) चोविसावाडीतील आरक्षण क्रमांक 2/16 7) पुनावळेतील सर्व्हे क्रमांक 23/6/3 पैकी, 23/6/2 पैकी, 23/5 पैकी, 23/1 पैकी, 23/6/4 पैकी, 23/2/1 पैकी व 23/2/2 8) पुनावळेतील सर्व्हे क्रमांक 26/1/6, 26/3/1 व 26/3/2 पैकी 9) गवळीमाथा, भोसरी 10) खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील जागा

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रस्तावित कचरा प्रक्रिया केंद्रांच्या जागांची तांत्रिकदृष्ट्या तपासणी करण्यात आली आहे. त्या जागांची अंतिम निश्चिती महापौर, सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नगरसेवकांच्या संमतीने केली जाणार आहे. पर्यावरणपूरक व नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, अशा पद्धतीने या कचरा प्रक्रिया केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे.
डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका
शहरातील सर्व भागांत अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. नगरसेवकांनी विरोध केला तरी, तो डावलून केंद्र सुरू केले जातील. ज्या प्रभागात कचरा निर्माण झाला, त्याच प्रभागात त्याची विल्हेवाट लावण्याचे धोरण प्रशासनाचे धोरण आहे. त्याचे सत्ताधारी भाजपने नेहमीच समर्थन केले आहे. नागरिकांनी तसेच, नगरसेवकांनी कचरा प्रक्रिया केंद्रांस विरोध न करता, त्यात सहभाग नोंदवावा. त्याबाबत उपयुक्त सूचना व सल्ले देऊन प्रशासनाला समर्थन द्यावे.
शत्रुघ्न काटे, नगरसेवक, शहराध्यक्ष भाजप
मोशी कचरा डेपोवरील ताण कमी करण्यासाठी शहरात लहान लहान आकाराचे कचरा प्रकिया केंद्र सुरू करणे हे वाढत्या शहराची गरज आहे. सर्व 32 प्रभागांत एक कचरा प्रक्रिया केंद्र असणे आवश्यक आहे. आयुक्तांनी जाहीर केलेल्या दहा जागांवर कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबण्यास सुरूवात केली आहे. माझ्या घरासमोर कचरा नको, ही भूमिका बदलली पाहिजे.
प्रशांत शितोळे, सत्तारूढ पक्षनेते, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT