Voter List Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Voter Verification: पिंपरी-चिंचवडमध्ये मतदार पडताळणीला वेग; २९ जुलैपूर्वी फॉर्म न भरल्यास प्रारूप यादीत नाव येणार नाही

एसआयआर अभियानाचा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आढावा; बीएलओंना घरोघरी भेटी व माहिती पडताळणीचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात मतदारांची पडताळणी सुरू आहे. विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानात मतदार यादीतील माहिती अचूक व अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या कामांचा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आढावा घेतला. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत सुरू असलेल्या घरोघरी भेटी, अर्ज संकलन, माहिती पडताळणी तसेच, नागरिकांच्या प्रतिसादाबाबत त्यांनी माहिती घेतली.

या बैठकीस उपायुक्त आयुक्त सचिन पवार, मतदार नोंदणी अधिकारी संदीप खोत, अर्चना यादव, सचिन पाटील आदी उपस्थित होते. उपायुक्त सचिन पवार यांनी अभियानाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. बीएलओंकडून सुरू असलेल्या घरोघरी भेटी, अर्ज संकलन, प्रलंबित प्रकरणांची स्थिती तसेच, मतदार नोंदणी प्रक्रियेतील विविध बाबींची माहिती त्यांनी दिली.

निर्धारित कालमर्यादेत सर्व कामे पूर्ण करण्यासाठी विभागनिहाय नियोजन करून नियमित पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्त सूर्यवंशी यांनी अभियानात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रत्येक बीएलओने जबाबदारीने काम करावे, असे निर्देश दिले.

बीएलओंना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करा

नागरिकांनी बीएलओ यांना आवश्यक माहिती व कागदपत्रे देऊन सहकार्य करावे. मतदार यादीतील नाव, पत्ता, छायाचित्र किंवा इतर कोणत्याही तपशीलात दुरुस्ती किंवा अद्ययावत माहिती आवश्यक असल्यास संबंधित मदत कक्षाशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत अचूकपणे समाविष्ट होणे ही लोकशाही बळकट करण्यासाठी आवश्यक बाब आहे, असे आवाहन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

मतदान करता त्या केंद्राच्या बीएलओस भेटून अर्ज भरा

शहरातील मतदारांची पडताळणी 30 जूनपासून सुरू झाली आहे. ज्या ठिकाणी मतदान करत आहात, तेथील बीएलओंना भेटून किंवा बीएलओ आपल्या घरी आल्यानंतर ईएफ फॉर्म भरून त्यास पोहच द्यावी. ऑनलाईन ही फॉर्म भरता येतो. त्यासाठी या lnk6.in/PCMCHO/eo6c-QYOc संकेतस्थळावर जाऊन माहिती भरू शकता. आपण २९ जुलैपूर्वी फॉर्म न भरल्यास नाव प्रारूप यादीमध्ये येणार नाही, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT