Mobile Use on Bike Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Traffic Mobile Use: दुचाकी चालवताना मोबाईल वापर महागात; पिंपरी-चिंचवडमध्ये 12,829 चालकांवर कोट्यवधींचा दंड

वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर पोलिसांचा कडक बडगा; वारंवार नियम मोडल्यास परवाना निलंबनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: तरुणाई मोबाईलमध्ये इतकी गुंग झाली आहे की, रस्त्यावर दुचाकी चालवतानाही मोबाईल कानाला लावण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. वेग, वाहतूक नियम आणि स्वतःचा जीव याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून मोबाईलवर बोलणे, व्हिडीओ कॉल करणे किंवा मेसेज पाहणे ही धोकादायक सवय शहरातील अपघातांना आमंत्रण देत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कडक भूमिका घेत दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.

दरम्यान, चालू वर्षात दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या तब्बल 12 हजार 829 वाहनचालकांना पोलिसांनी पकडले असून, त्यांना एकूण 1 कोटी 94 लाख 68 हजार रुपये इतका दंड ठोठावण्यात आला आहे. शहरातील विविध भागांत विशेष तपास मोहिमा राबविण्यात येत आहेत. यामध्ये एका वाहतूक विभागात 5 हजार 258, तर दुसऱ्या वाहतूक विभागात 7 हजार 571 दुचाकीस्वार मोबाईलवर बोलताना आढळून आले. या सर्व वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. त्यानुसार, पहिल्या वाहतूक विभागात 1 कोटी 15 लाख 37 हजार, तर दुसऱ्या वाहतूक विभागात 79 लाख 31 हजार रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे.

एका क्षणाची चूक, आयुष्यभराची किंमत

दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणे हे अत्यंत धोकादायक असल्याचे तज्ज्ञ वारंवार सांगतात. मोबाईलवर संभाषण करताना चालकाचे लक्ष रस्त्यावरून हटते. वाहनाचा वेग, आजूबाजूची वाहतूक, सिग्नल, पादचारी किंवा अचानक समोर येणारे अवजड वाहन यांचा अंदाज राहत नाही. अचानक ब्रेक मारण्याची वेळ आली किंवा परिस्थिती बदलली, तर वेळेवर प्रतिक्रिया देता येत नाही. यामुळे किरकोळ अपघातांसह गंभीर जखमा, अपंगत्व आणि मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे.

हेल्मेटच्या आत मोबाईल

अनेक दुचाकीस्वार हेल्मेट वापरत असले, तरी हेल्मेटच्या आत मोबाईल ठेवून संभाषण करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. हेल्मेट हे अपघातानंतर संरक्षण देते; मात्र अपघातच टाळण्यासाठी वाहन चालवताना पूर्ण लक्ष रस्त्यावर असणे अत्यावश्यक आहे. मोबाईलवर बोलताना वाहनावरील नियंत्रण सुटल्यास हेल्मेट असूनही गंभीर इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‌‘प्रेमाच्या गप्पा‌’ ठरताहेत जीवघेण्या

दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्यांमध्ये तरुण-तरुणी, विशेषतः प्रेमी युगुलांची संख्या तुलनेने अधिक असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. कॉलेज, नोकरी किंवा फिरण्यासाठी निघालेले तरुण दुचाकी चालवत असतानाच दीर्घकाळ मोबाईलवर संवाद साधताना दिसतात. काहीजण तर दुचाकी चालवतानाच व्हिडीओ कॉल किंवा सोशल मीडियावर संभाषण करत असल्याचेही निदर्शनास आले आहे. हा निष्काळजीपणा केवळ स्वतःपुरता मर्यादित न राहता इतर वाहनचालक, पादचारी आणि प्रवाशांच्या जीवावरही बेतणारा ठरत आहे.

अपघातानंतर पश्चात्ताप

अपघातानंतर जखमी किंवा मृतांच्या नातेवाईकांकडून दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलत असल्याची कबुली दिली जाते. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. एका क्षणाची बेफिकिरी संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करत असल्याची अनेक उदाहरणे शहरात यापूर्वी घडली आहेत.

जनजागृतीची गरज

दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणे रोखण्यासाठी केवळ पोलिस कारवाई पुरेशी नसून, समाजानेही याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलांना वाहन चालवताना मोबाईल वापरू नये, याबाबत ठाम सूचना देणे, महाविद्यालये व कंपन्यांनी वाहतूक सुरक्षिततेबाबत जनजागृती कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे. तसेच, मित्रमंडळी आणि प्रेमी युगुलांनीही सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणे म्हणजे अपघाताला खुले आमंत्रण देण्यासारखे आहे. काही सेकंदांचे दुर्लक्षही जीवघेणे ठरू शकते. विशेषतः तरुणांनी याची गंभीर दखल घ्यावी. नियम मोडणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल. केवळ दंडच नाही, तर वारंवार नियम मोडणाऱ्यांवर परवाना निलंबनासारखी कारवाईही करण्यात येणार आहे.
सारंग आवाड, अपर पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT