

पुणे : जन्मतःच मृत म्हणून घोषित करण्यात आलेल्या गदिमांना अक्षरश: पुरायला नेले असता, त्यांचा श्वासोच्छ्वास सुरू होणे, हा केवळ चमत्कार नव्हता, तर जणू काही परमेश्वरानेच त्यांच्या जीवनात नाट्य पेरून त्यांच्या आयुष्याची पटकथा लिहीली होती, असे भावोत्कट उदगार ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी काढले.
ग.दि. माडगूळकर यांच्या स्मरणार्थ गदिमा प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि.14) आयोजित गदिमा स्मृती समारोहात मोहन जोशी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डॉ. श्रीपाद जोशी, गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर आणि उत्कर्ष प्रकाशनाचे संचालक सु.वा. जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले. गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त प्रकाश भोंडे यांनी आभार मानले.
यावेळी यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना, गृहिणी सखी सचिव पुरस्कार वंदना रवींद्र गांगुर्डे यांना, चैत्रबन पुरस्कार प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांना, विद्या प्रज्ञा पुरस्कार तरूण प्रतिभावंत गायिका मुग्धा वैशंपायन यांना प्रदान करण्यात आला.
मोहन जोशी म्हणाले, संपूर्ण माडगूळकर कुटुंबाचा सगळा जीवन प्रवास अत्यंत हालाखीचा आणि कष्टप्रद असा होता. माझे सख्खे चुलत मामा म्हणजे पु. भा. भावे हे पक्के हिंदुत्ववादी, ग.दि. मा. हे काँग्रेस विचारांचे, तर बाबूजी हे कट्टर संघाच्या विचारांचे अशी वैचारिक तफावत असताना देखील या तिघांमधील मैत्रीचे बंध दृढ होते.
नागराज मंजुळे म्हणाले, आपण एखाद्या क्षेत्रात खाली मान घालून काम करीत असतो आणि अचानक थंड हवेची झुळूक यावी, अशा प्रकारे एखाद्या पुरस्काराची वार्ता ऐकायला मिळते. गदिमांच्या नावाचा हा पुरस्कार असाच अनुभव देणारा आहे. डोंगराएवढे काम करून ठेवलेल्या माणसाच्या नावाने मला हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. गदिमांसारख्या व्यक्तींनी आपले जगणे समृध्द केले आहे. लोकोत्तर व्यक्तिमत्व असेच, त्यांचे वर्णन करता येईल.