

पिंपरी: उद्या नेमकं काय घडेल हे मला माहीत नाही. जगभरात बरंच काही चालू आहे. त्यातच आता 19 डिसेंबर रोजी देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार आहे. अमेरिकन संसदेने कायदा केला असून, त्यात अमेरिकेत असलेल्या इस्त्रायलच्या गुप्तहेराने केलेल्या स्टींग ऑपरेशनमुळे अनेकजण अडचणीत येण्याची शक्यता आहे. यात कोणाकोणाची नावे आहेत, कोणी कोणते कारनामे केले आहेत, हे आता बाहेर येईल. त्यामुळे देशाच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. तसेच, या काळातच पंतप्रधानपदी मराठी माणूस होण्याची शक्यतादेखील त्यांनी बोलून दाखवली.
सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे लिखित जन-गण-मन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड येथील मोहननगर येथे पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी संविधान अभ्यासक सुभाष वारे, साहित्यिक चंद्रकांत साळसकर, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी, कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे, इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी दिवंगत कामगार नेते बाबा आढाव आणि काँग्रेसचे दिवंगत माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, संविधानाचा ढाचा आजही अस्तित्वात आहे; मात्र संविधानाच्या आत्म्यालाच संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. संसदेला दुय्यम बनवले जात असून, सर्व संवैधानिक संस्थांवर नियंत्रण मिळवण्याचे प्रकार वाढले आहेत. कितीही प्रचार केला, विचार मांडले, आंदोलने केली तरी अखेरीस मतपेटीतून काय निष्पन्न होईल, याची खात्री राहिलेली नाही.
लोकशाहीवर विश्वास ठेवत मतदान केल्यानंतर मतदार अभिमानाने बोटावरील शाई दाखवतो; मात्र या लोकशाहीत आत्माच उरलेला नाही. निवडणुकांवर विश्वास ठेवायचा की नाही, हा गंभीर प्रश्न सर्वांना पडला आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व नागरिकांना समान अधिकार देणारे संविधान दिले असले, तरी आपण अद्याप त्या समतेच्या टप्प्यावर पोहोचलेलो नाही. त्याआधीच संविधानाचा गळा घोटण्याचे काम सुरू झाले आहे, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी केला आहे.
पंतप्रधानपदी मराठी माणूस ?
मध्यंतरी मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल, असे बोललो होतो. यावर अनेकांचे फोन आले. पण, मराठी माणूस पंतप्रधान होण्यापूर्वी आत्ता बसलेल्या माणसाला बाजूला व्हावे लागेल. त्यामुळे बहुतेक बदल घडण्याची शक्यता मला दिसत आहे, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले.