

पिंपरी : चॉकलेटच्या बहाण्याने शेजारी राहणाऱ्या नराधमाने पाच वर्षीय चिमुकलीला निर्जन ठिकाणी नेले. तिच्यावर अत्याचार करून हत्या केली. रविवारी (दि. १४) मावळ तालुक्यातील उर्से येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंकी देवी फुलचंद सिंग (२७, रा. उर्से, ता. मावळ, मूळ रा. झारखंड) यांची मुलगी रोशनी कुमारी उर्फ मुन्नी (वय ५) ही शनिवारी (दि. १३) रात्री सुमारे अकरा वाजता बेपत्ता झाली होती.
दरम्यान, याप्रकरणी शिरगाव–परंदवडी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून शोध मोहीम सुरू असतानाच उर्से येथे रोशनी मृत अवस्थेत आढळून आली.
पोलिसांनी शेजारी रहाणारा समीर कुमार मंडळ (मूळ रा. गोंटा, झारखंड) यास अटक केली असून, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्राथमिक तपासात चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला नेण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे मावळ तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आरोपीस कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.