Tribal Skill Centre Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Development: पिंपरी-चिंचवडमध्ये आदिवासी कला-कौशल्य केंद्राला ग्रीन सिग्नल; बावनकुळे यांची सकारात्मक भूमिका

पिंपरी-चिंचवडमध्ये आदिवासी व वंचित घटकांसाठी कला-कौशल्य केंद्र उभारणीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून सात महत्त्वपूर्ण विकास निर्णयांना मंजुरी मिळाली आहे

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी क्रांतिवीर चापेकर बंधूंची भूमी पिंपरी-चिंचवडमध्ये आदिवासी व वंचित घटकांतील मुलांसाठी समर्पित कला-कौशल्य-कारागिरीचे केंद्र उभारण्याचा संकल्प आता दृष्टिक्षेपात आला आहे.

गिरीश प्रभुणे यांच्या संकल्पनेतील या केंद्राला जागा उपलब्ध करुन देण्याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. याबाबतचा प्रस्ताव कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात येणार आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघासह पिंपरी-चिंचवड शहरातील महसूल विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शहराच्या विकासाशी निगडीत सात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

या बैठकीला पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार महेश लांडगे यांनी मांडलेल्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून, अनेक विषयांवर तातडीने कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत.

या बैठकीत मोशीत उभारण्यात येणाऱ्या आयआयएम नागपूरच्या उपशाखेसाठी जागा हस्तांतरणाचा विषय मार्गी लागला. याबाबतचा आदेश सात दिवसांत पारित करण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी शैक्षणिक प्रकल्पाला गती मिळणार आहे. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीस आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी पुनर्प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून राज्य शासनाकडून त्यास मंजुरी देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे.

क्रांतिवीर चापेकर बंधू हे भारताचे भूषण आहे. या राष्ट्रप्रेमी विचारांचे स्मरण होईल आणि भारतातील पहिले आदिवासी कला-कौशल्य-कारागिरीचे केंद्र माझ्या पिंपरी-चिंचवडमध्ये होणार आहे, याचा विशेष अभिमान वाटतो. यासह भोसरी विधानसभा मतदारसंघ आणि शहराच्या विकासाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक निर्णय घेतले आहेत.
महेश लांडगे, आमदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT