हेमांगी सूर्यवंशी
पिंपरी: शाळांच्या वार्षिक परीक्षा संपल्या असून, उन्हाळी सुटीत अनेकजण मौजमजा करण्यासाठी आपल्या गावाकडे जातात. त्यामुळे सध्या एस.टी. गाड्यांबरोबरच खासगी ट्रॅव्हल्सलाही प्रवाशांकडून पसंती मिळत आहे; मात्र खासगी ट्रॅव्हल्सचालक आपली वाहने वर्दळीच्या रस्त्यांवर बिनदिक्कतपणे उभी करून वाहतूककोंडी निर्माण करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील वाहतूक सुरळीत रहावी, या उद्देशाने वाहतूक पोलिस विभागाच्या वतीने ऑक्टोबर 2025 ते मार्च सन 2026 दरम्यान 16 हजार 982 ट्रॅव्हल्सच्या बसगाड्यांवर कारवाई करण्यात आली असून, 2 कोटी 10 लाख 91 हजार 150 एवढा दंड आकारण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात नोकरी, उद्योग व्यवसायानिमित्त बाहेरगावावरुन आलेल्या नागरिकांचे प्रमाण आधिक आहे. शहरातील विविध भागांतून राज्यातील इतर जिल्हे अथवा तालुक्याला जाण्यासाठी नागरिकांकडून खासगी ट्रॅव्हल्सला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सचा लाभ घेण्याची संख्या शेकडोच्या घरात आहे. यामधून प्रवास करणारे प्रवासी लक्षणीय आहे. वर्दळीच्या पुणे-मुंबई महामार्गावर अनेक ठिकाणी ट्रॅव्हल्सच्या गाड्या बिनदिक्कतपणे उभ्या केल्या जातात. निगडी ते दापोडी ग्रेड सेपरेटर मार्गात अनेकदा खासगी ट्रॅव्हल्स उभ्या केल्या जातात. त्यामुळे तेथे मोठी वाहतूक कोंडीचे प्रकार घडतात. मात्र, या सर्व प्रकाराकडे वाहतूक विभाग डोळेझाक करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात काळेवाडी, निगडी, नाशिकफाटा, सांगवी या ठिकाणी खासगी ट्रॅव्हल्स उभ्या राहतात. निगडी येथील रस्त्यावर मनमानी पध्दतीने ट्रॅव्हल्स उभ्या केल्या जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. प्रवाशांना पिकअप करण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स जागोजागी थांबत असल्याचे दिसून येते.
नियमांकडे कानाडोळा
खासगी बसचालकांनसाठी वाहतूक विभागांकडून पाच पिकॲप पॉईट ठरलेले आहेत. मात्र खासगी बसचालक या नियमाचे पालन करत नाही. तसेच खासगी तिकीट बुकींग करणाऱ्या एजन्सीकडून बसची वेळ प्रवाशांना सांगितली जाते. सायंकाळी सहानंतर बसथांब्यावर एकापाठोपाठ येऊन गाड्या थांबतात. खासगी वाहनचालक जिकडे जागा मिळेल तिकडे बस थांबवतात. त्यामुळे वाहतूक कोंडी निमार्ण होत असून, प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.
अनधिकृत थांब्यांमुळे अपघातास निमंत्रण
पिंपरी-चिंचवड शहरात रावेत, सांगवी, वाकड, ताथवडे, रहाटणी, थेरगाव, सौदागर, जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, हिंजवडी, भोसरी, या परिसरात ट्रॅव्हल्सचे चालक वर्दळीच्या रस्त्यातच प्रवासी घेण्यासाठी गाड्या उभ्या करतात; मात्र अशा प्रकारे गाड्या उभ्या केल्याने भरधाव येणाऱ्या वाहनांच्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
खासगी ट्रॅव्हल्स गाड्यांमध्ये वातानुकूलित सुविधा, आरामदायी प्रवास, स्वच्छता, असल्याने प्रवासी या सेवेचा अधिक लाभ घेत आहेत; मात्र ट्रॅव्हल्सचे चालक मनमानी पद्धतीने वर्दळीच्या रस्त्यावरच उभ्या करतात. अशावेळी प्रवाशांना ट्रॅव्हल्समध्ये चढ-उतार करणे मोठे जिकिरीचे ठरते.विक्रम जाधव, प्रवासी
खासगी ट्रॅव्हल्स गाड्यांवरील चालकांना वाहतूक पोलिसांनी ठरवून दिलेल्या पिकअप पॉईंट वरच बस थांबवण्याबाबत आम्ही नेहमी सूचना करत असतो.मनोज चौगुले, खासगी ट्रॅव्हल्स संघटना, उपाध्यक्ष
वाहतूक नियमाचे उल्लघंन करणाऱ्या खासगी वाहतूक बसचालकांवर वारंवार कारवाई करण्यात येते. ऑक्टोबर ते मार्च सन 2026 दरम्यान 16 हजार 982 खासगी बसगाडयावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दंडात्मक रक्कमही वसूल करण्यात आली आहे.विवेक पाटील, पोलिस उपायुक्त वाहतूक