पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्लू (एच१ एन१ ) ने पुन्हा डोके वर काढले असून, दोन दिवसांत पुन्हा आठ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये एकूण ३१ स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत.
शहरात वातावरणात झालेल्या बदलामुळे स्वाईन फ्ल्यू (एच१एन१) च्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या महापालिका रुग्णालयात आणि खासगी दवाखान्यात वाढली आहे. स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असताना पालिकेच्या वायसीएम रुग्णालयातच स्वॅब तपासणी उपलब्ध आहेत. तसेच पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून स्वाईन फ्लूबाबत जनजागृती होत नसल्याचे दिसून येत आहे.
स्वाईन फ्लूची लक्षणे:
१०० डिग्रीपेक्षा जास्त ताप
घसा दुखणे
सतत खोकला
सर्दी
श्वास घेण्यास त्रास
अंगदुखी
थकवा आणि उलट्या होणे
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
घाबरून जाऊ नका, पण दुर्लक्षही करू नका. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, हात वारंवार धुवा, सर्दी-ताप अंगावर काढू नका. दोन दिवसांपेक्षा जास्त ताप राहिल्यास जवळच्या पालिका दवाखान्यात ताबडतोब संपर्क साधा. स्वाईन फ्लू हा श्वसनसंस्थेशी संबंधित आजार असून सर्दी, खोकला, घसादुखी, ताप तसेच श्वसनाशी संबंधित विविध लक्षणे आढळू शकतात. वातावरणातील बदलाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
या महिन्यामध्ये स्वाईन फ्लूचे जे रुग्ण आढळले ते खासगी रुग्णालयात आढळले आहेत. स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी वायसीएममध्ये अतिदक्षता विभागात तीन बेडची व्यववस्था केली आहे तसेच स्वॅब तपासणीचीही सोय आहे. रुग्णांसाठी टॅमी फ्लूच्या गोळ्यांचा पुरेसा साठा आहे.डॉ. अभयचंद्र दादेवार (अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी)