Pimpri Chinchwad Street Light Safety Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Street Light Safety: पिंपरी-चिंचवडमध्ये विद्युत दिव्यांच्या दुरुस्तीवेळी सुरक्षेचा फज्जा; कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात

सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, शॉकप्रूफ ग्लोव्हजशिवाय उंचावर काम; बॅरिकेडिंगअभावी नागरिकांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील विविध चौकांमध्ये महापालिकेकडून विद्युत दिव्यांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मात्र, ही कामे करताना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे धक्कादायक चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. उंचावर क्रेन किंवा हायड्रॉलिक लिफ्टच्या सहाय्याने काम करणारे कर्मचारी कोणत्याही प्रकारचे सुरक्षा साहित्य न वापरताच काम करत असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

प्रत्यक्ष पाहणीत अनेक कर्मचारी सेफ्टी बेल्ट, शॉकप्रूफ हँडग्लोज, सेफ्टी हेल्मेट, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट आणि सेफ्टी शूज यांशिवायच उंचावर काम करताना दिसून आले. विद्युत प्रवाहाशी संबंधित कामांमध्ये एका क्षणाचा निष्काळजीपणादेखील जीवावर बेतू शकतो. तरीही संबंधित ठेकेदार आणि महापालिका प्रशासनाकडून सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे.

नागरिकांच्याही जीवाला धोका

कामाच्या ठिकाणी वाहतुकीची मोठी वर्दळ असतानाही अनेक ठिकाणी आवश्यक ते बॅरिकेडिंग, इशारा फलक किंवा सुरक्षितता व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे केवळ कर्मचाऱ्यांचाच नव्हे, तर रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काम पूर्ण करण्याच्या घाईत सुरक्षा नियमांना बगल दिली जात आहे का?, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

महापालिकेने संबंधित ठेकेदारांकडून सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून घ्यावे, सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून द्यावे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यानंतर जबाबदारी कोण घेणार?, हा प्रश्न कायम राहणार आहे.

विद्युत दिव्यांच्या देखभाल व दुरुस्तीची सर्व कामे निर्धारित सुरक्षा नियमांचे पालन करूनच करणे बंधनकारक आहे. संबंधित ठेकेदारांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला सेफ्टी बेल्ट, शॉकप्रूफ हँडग्लोज, हेल्मेट, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट व इतर आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. जर कोणत्याही ठिकाणी सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले तर, संबंधित ठेकेदाराची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.
महेश कावळे, सह शहर अभियंता विद्युत विभाग, पिंपरी-चिंचवड
काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का? एखादा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावरच काम सुरू असताना इतकी बेफिकरी जीवावर बेतू शकते.
मंगेश गुरव, नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT