

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील सुका कचरा जाळून वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात वीज तयार केली जाते. तो प्रकल्प पुढील महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे दररोज 700 टन सुक्या कचर्याची विल्हेवाट लागणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील अनधिकृत प्रशासकीय इमारती कोसळून 9 कर्मचार्यांचा मृत्यूची घटना 8 जुलैला घडली होती. त्यामुळे मोशी कचरा डेपोत कचरा डंप करणे बंद आहे. परिणामी, शहरात जागोजागी कचर्याचे ढीग निर्माण झाले आहेत. त्याबाबत नगरसेवकांसह नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. कचर्या समस्येबाबत आयुक्त बोलत होते.
आयुक्त सूर्यवंशी म्हणाले, की धुरड्याची चिमणी नवीन बसविण्यासाठी वेस्ट टू एनर्जी प्रकल्प बंद आहे. चिमणीचे काम महिन्याभरात पूर्ण होणार आहे. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत प्रकल्प प्रत्यक्ष सुरू होईल. मोशी कचरा डेपोमध्ये आता जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे महापालिकेने 1 हजार टन क्षमतेचा वेस्ट टू एनर्जीचा दुसरा नवीन प्रकल्प शहरात दुसर्या ठिकाणी सुरू करणार आहे. त्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे, असे आयुक्तांनी सांगितले.
कचरा डेपोतील कचर्याचा डोंगर वेगाने संपवण्यासाठी सध्या बायोमायनिंगचे काम वेगात सुरू आहे. दररोज 5 हजार टन कचर्यावर प्रक्रिया केली जात आहे. वेळेत डोंगर न संपल्याने संबंधित टप्पा एक व दोनच्या कामाची मुदत संपली होती. मात्र, महापालिकेने ठेकेदाराला मुदतवाढ दिली असून, मनुष्यबळ व यंत्रसामुग्री वाढवून पावसाळ्यातही काम सुरू ठेवले आहे. पुढील सहा महिन्यांत कचर्याचा डोंगर पूर्णपणे नष्ट करण्याचे कडक निर्देश दिले आहेत, असे आयुक्तांनी सांगितले. ते काम 100 टक्के पूर्ण झाल्यानंतर डेपोतील 25 एकर जागा रिकामी होणार आहे.
कचरा केंद्रासाठी 40 जागांची पाहणी
कचर्याची गंभीर समस्या लक्षात घेऊन महापालिकेने कचरा व्यवसस्थापनाचे नियोजन केले आहे. शहरात कचरा प्रक्रियेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी 10 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 40 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यातील कमी लोकवस्तीच्या जागांची लवकरच स्थळपाहणी केली जाईल. स्थानिक पातळीवरच प्रक्रिया होणार असल्याने महापालिकेच्या कचरा वाहतुकीच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. शहरात सध्या दररोज 1 हजार 500 टन कचरा जमा होतो. भविष्यात कचर्याचे प्रमाण 5 हजार टनांवर जाण्याची शक्यता धरून महापालिकेने नियोजन केले आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला इशारा
कासारवाडीतील शंकरवाडी येथे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या 40 एकर जागेत जुना कचरा डेपाे आहे. त्यापैकी 20 एकर जागा कचरा प्रक्रिया केंद्रासाठी मिळावा, असा प्रस्ताव संरक्षण विभागाकडे पाठवला जाणार आहे. महापालिका कॅन्टोन्मेंट बोर्डाचा सध्या दररोज 25 टन कचरा घेत आहे. संरक्षण विभागाने जागा न दिल्यास तो कचरा स्वीकारणे बंद करण्याचा इशारा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.