पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत शहरातील मोठ्या हाऊसिंग सोसायटीतील मैलासांडपाणी प्रक्रिया केंद्राची (एसटीपी) तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत उपद्रव शोध पथकाकडून मैलासांडपाणी प्रक्रिया न करता थेट ड्रेनेजलाईनमध्ये सोडणाऱ्या 12 हाऊसिंग सोसायट्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्याकडून एकूण 70 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
21 मोठ्या हाऊसिंग सोसायटीतील एसटीपीची तपासणी
या संदर्भात दैनिक पुढारीने ‘त्या हाऊसिंग सोसायट्यांवर फौजदारी; एसटीपी बंद ठेवणारे सदनिकाधारक महापालिकेच्या रडारवर’ असे ठळक वृत्त 18 एप्रिलला प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पर्यावरण विभागाने शहरात धडक कारवाई मोहीम राबवण्यास सुरुवात केली. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील एकूण 21 मोठ्या हाऊसिंग सोसायटीतील एसटीपीची तपासणी करण्यात आली. या पाहणीत 9 एसटीपी पूर्ण क्षमतेने सुरू असल्याचे आढळून आले. तर, 12 केंद्रांमधून मैलासांडपाणी अनधिकृतपणे प्रक्रिया न करता बाहेर सोडण्यात येत असल्याचे आढळून आले.
याप्रकरणी महापालिकेच्या उपद्रव शोधपथकाकडून संबंधित हाऊसिंग सोसायटींवर कारवाई करण्यात येऊन एकूण 70 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्या सोसायट्यांनी तातडीने एसटीपी सुरू न केल्यास दंडाची रक्कम वाढविण्यात येणार आहे. ज्या हाऊसिंग सोसायट्यांनी
अद्याप एसटीपी केंद्र सुरू केलेले नाही किंवा निर्माण होणारे मैलासांडपाणी प्रक्रिया न करता बाहेर सोडत आहेत, त्यांनी तात्काळ एसटीपी केंद्र सुरू करून पाण्याचा पुनर्वापर करावा. अन्यथा नळजोड खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिला आहे.
ही आहेत त्या सोसायटींची नावे
जी के आर्यबन-किवळे
लेजन्सी इन्पिरियल-किवळे
मी रावेत-रावेत
साई सरोज-रावेत
लाईफ कॅन्व्हास-मामुर्डी
सोनिगरा पी रेसिडन्सी-रावेत
इडेन स्पेसेस-रावेत
स्टार व्हिस्टा-रावेत
आनंदबन सोसायटी-रावेत
नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई
हाऊसिंग सोसायटीत मैलासांडपाणी प्रक्रिया केंद्र असूनही, प्रक्रिया न केलेले मैलासांडपाणी बाहेर किंवा ड्रेनेजलाईनमध्ये सोडणे ही गंभीर बाब आहे. त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. संबंधित हाऊसिंग सोसायट्यांनी नियमांचे पालन करून पाण्याचा पुनर्वापर करावा, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.