पिंपरी: मतदार याद्यांच्या पडताळणी (एसआयआर) मोहिमेत पिंपरी-चिंचवड शहरातील 17 लाख 24 हजार 537 मतदारांपैकी तब्बल 6 लाख 8 हजार 148 मतदारांची नावे गायब झाली आहे. मतदारांची प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे. यादीत नाव आहे की नाही, हे मतदारांनी तपासून घ्यावे. यादीत नाव नसल्यास त्यावर हरकत नोंदवता येणार आहे. त्यासाठी महिन्याभराची मुदत आहे.
मतदार पडताळणी 17 ऑगस्टपर्यंत करण्यात आली. त्यात शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील तब्बल 6 लाख 8 हजार 148 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. गैरहजर, स्थलांतरीत, मयत, दुबानर किंवा अन्य कारणांमुळे त्यांची नावे वगळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नोंदणी पूर्ण झालेल्या 17 लाख 24 हजार 527 मतदारांची प्रारुप मतदार यादी 31 ऑगस्टला प्रसिद्ध केली जाणार आहे.
त्या दिवसापासून 30 सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. त्यांचे निराकरण 29 ऑक्टोबरपर्यंत करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. प्रारुप मतदार यादीत नाव नसणे म्हणजे मतदानाचा हक्क कायमचा गमावला, असे नाही. हरकती नोंदवण्याचा 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत नाव पुन्हा समाविष्ट करून घेता येणार आहे.
त्यामुळे मतदारांनी मतदार यादी तपासून घ्यावी. नाव नसल्यास मुदतीत दावा दाखल करावा, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे. यादीत नाव नसल्यास मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह विधानसभा मतदार संघाच्या संबंधित मतदार नोंदणी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरात आता भोसरी मतदारसंघ सर्वात मोठा
एसआयआरच्या मतदार नोंदणी आकडेवारीवरून पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वांधिक मतदार संख्या असलेला मतदार संघ भोसरी झाला आहे. या भोसरी मतदार संघात एकूण 4 लाख 62 हजार 877 मतदार आहेत. तर, चिंचवड मतदार संघात 4 लाख 17 हजार 351 आणि पिंपरी मतदार संघात 2 लाख 36 हजार 161 मतदार आहेत. त्यांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.