Teachers Government Duties Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad SIR Teachers: SIRच्या कामात शिक्षक अडकले; पिंपरी-चिंचवडमधील हजारो विद्यार्थ्यांचे अध्यापन ठप्प

३९६ शिक्षकांकडे मतदारांच्या कागदपत्रांची जबाबदारी; पहिल्या सत्राच्या परीक्षेपूर्वी गणित, विज्ञान, इंग्रजीचे अध्यापन प्रभावित

पुढारी वृत्तसेवा

वर्षा कांबळे

पिंपरी: मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) च्या मोहिमेअंतर्गत ज्या मतदारांना नोटिसा बजावल्या होत्या, त्यांना सुनावणीऐवजी त्यांचे केवळ आवश्यक पुरावे, कागदपत्रे घेण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचे व अनुदानित खासगी शाळेचे शिक्षक पूर्णपणे अडकले आहेत. पहिल्या सत्राची परीक्षा तोंडावर असताना वर्गावर शिकवायला पुरेसे शिक्षक नसल्याने हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पालिकेच्या १२९ प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये सुमारे ४५ हजार विद्यार्थी शिकतात. यापैकी ७० टक्क्यांहून अधिक नियमित शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी शाळेत हजेरी लावून नंतर दिवसभर क्षेत्रीय कार्यालयात जावून मतदारांकडून आवश्यक ते कागदपत्रे जमा करून ऑनलाईन माहिती भरण्याचे काम सुरू आहे.

एसआयआर ही प्रक्रिया ३० जूनपासून सुरू झाली आहे. तिला १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर आता ज्यांचे मतदार यादीमध्ये नाव नाही, त्यांच्याकडून फॉर्म ६ भरून घेणे. त्या मतदारांकडून पुरावे आणि कागदपत्रे जमा करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया ऑक्टोबरअखेर सुरू राहणार आहे. याच काळात शाळांमध्ये परीक्षांची तयारी सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होण्याची भीती पालक व्यक्त करत आहेत. पालकांमध्येही या परिस्थितीबद्दल चिंता वाढताना दिसत आहे. नियमित अध्यापनाऐवजी कमी वेळ शिकवणी होत असल्यानं मुलांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होईल का, असा प्रश्न अनेक पालक उपस्थित करत आहेत.

सध्या पालिका शाळांमध्ये पहिल्या सत्र परीक्षेची तयारी सुरू आहे; परंतु गेल्या महिनाभरापासून गणित, विज्ञान, इंग्रजीसारखे मुख्य विषय शिकवले गेलेच नाहीत. अनेक शाळांमध्ये एका शिक्षकाकडे दोन-दोन वर्गांचा भार आला आहे. विद्यार्थ्यांचे सरावाचे पेपर, उजळणी पूर्ण झालेली नाही. पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालकांचे म्हणणे आहे की, मुलांना शाळेत पाठवतो तर शिक्षकच नाहीत, मग शाळा कशासाठी?

विद्यार्थी शाळेत अन‌् शिक्षक बाहेर

एसआयआरच्या कामामुळे शाळांमधील अनेक शिक्षक दैनंदिन हजेरी लावून बाहेर पडतात. मुले शाळेत येऊन वर्गात तर बसतात; परंतु अनेक वर्गांवर शिकवायला शिक्षकच नाहीत. शाळांमध्ये मानधनावरील शिक्षक आणि प्रभारी मुख्याध्यापक हेच शाळांचा गाडा हाकताना दिसत आहेत. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच एसआयआरमुळे नियमित अध्यापनावर परिणाम होत आहे. उरलेल्या शिक्षकांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.

यादीत नावे नसलेले सहा लाख मतदार

पिंपरी-चिंचवड शहरातील १७ लाख २५ हजार ५३७ मतदारांपैकी तब्बल ६ लाख ८ हजार १४८ मतदारांच्या नावांचा यादीत समावेश नाही. त्या सर्वांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक प्रमाणात मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. मतदार पडताळणी मोहिमेत मतदारांनी सादर केलेल्या अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये नाव आणि पत्त्यातील त्रुटी, मतदाराच्या तपशिलांतील तफावत तसेच, जुन्या मतदार यादीशी जोडणी न झालेली प्रकरणे समोर आली आहेत. नावे नसलेल्या सहा लाख मतदारांना बीएलओकडे आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, गाव, पत्ता किंवा इतर तपशिलांमध्ये त्रुटी असलेल्या मतदारांनी आवश्यक पुरावे आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यास मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या स्तरावरच कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सर्व वर्ग एकत्र करून अध्यापन

वर्गावर शिक्षक नसल्याने मानधनावरील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना सर्व वर्गांना एकत्र बसवून शिकवावे लागत आहे. अशा वेळी एकाच वर्गात विद्यार्थ्यांना दाटीवाटीने बसविले जाते. एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणे अवघड जात आहे. मोजक्या शिक्षकांवर संपूर्ण शाळेची जबाबदारी येत आहे. अनेक ठिकाणी १ ली ते ४ , ५ वी ते ८ वी असे वर्ग एकत्र करून अध्यापन करावे लागत आहे. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक उपलब्ध नसल्याने उपलब्ध शिक्षकांवर अतिरिक्त ताण येत आहे.

एसआयआरच्या कामासाठी ३९६ शिक्षक होते तेवढेच शिक्षक आता कागदपत्रे आणि पुरावे गोळा करण्याच्या कामात व्यग्र आहेत. शाळेच्या घटक चाचणी परीक्षा झाल्या आहेत. शाळांवर पुरेसे शिक्षक नाहीत. मानधनावरील शिक्षक आणि उपलब्ध शिक्षकांवर शाळेची जबाबदारी आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. तोपर्यंत आहे त्या शिक्षकांकडून अध्यापन केले जाईल.
संगीता बांगर (प्रशासन अधिकारी, पिं.चिं.मनपा)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT