Money Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad School Sports Referee Honorarium: शालेय क्रीडा स्पर्धांच्या पंचांचे मानधन सहा महिने रखडले

महापालिका शाळांतील स्पर्धांनंतरही पंचांना प्रतीक्षा; क्रीडा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांमध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर 2025 दरम्यान स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांत पंच म्हणून काम पाहणाऱ्यांचे मानधन अद्यापही प्रलंबित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तब्बल सहा महिने उलटूनही मानधन न मिळाल्याने अनेक पंच या मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. अनागोंदी कारभारामुळे क्रीडा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महापालिका शाळांमधील क्रीडा स्पर्धा दरवर्षी ऑगस्ट महिन्यापासून सुरू होतात आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत विविध स्तरांवर पार पडतात. यामध्ये एकूण 49 विविध खेळांचा समावेश असतो. या स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी पंचांची नियुक्ती केली जाते. हे पंच प्रामुख्याने विविध क्रीडा संघटनांशी संबंधित खेळाडू, माजी खेळाडू किंवा क्रीडाक्षेत्रातील अनुभव असलेल्या व्यक्ती असतात.

पुणे शहरासह परिसरातील अनेक पंच पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन सामने पार पाडतात. नाममात्र मानधनावर ते जबाबदारी स्वीकारतात. मात्र, त्यांना मिळणारे मानधन तुटपुंजे असून त्यातून प्रवास, पेट्रोल, जेवणखर्चही भागत नाही. त्यातच सहा महिन्यांपासून मानधन रखडल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

क्रीडा विभागाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला जातो. तरीदेखील पंचांसारख्या महत्त्वाच्या घटकाला मानधनासाठी प्रतीक्षा करावी लागणे ही बाब संतापजनक असल्याची भावना व्यक्त होत आहे. काही पंचांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, आम्ही खेळाची आवड आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ही जबाबदारी स्वीकारतो. मात्र, वारंवार मानधनासाठी पाठपुरावा करावा लागणे आणि महिनोन्महिने प्रतीक्षा करावी लागणे अत्यंत निराशाजनक आहे.

शालेय क्रीडा स्पर्धा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा महत्त्वाचा भाग मानली जाते. खेळांमुळे शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात. या प्रक्रियेत पंचांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. न्याय्य आणि शिस्तबद्ध स्पर्धा पार पाडण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. दरम्यान, संबंधित पंचांनी आपले प्रलंबित मानधन तात्काळ अदा करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. क्रीडा विभागाने याबाबत अधिकृत स्पष्टीकरण देऊन मानधन वितरणाची निश्चित तारीख जाहीर करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.

महापालिका निवडणुका असल्याने मानधनास विलंब झाला आहे. काही दिवसांमध्ये कागदपत्रांची तपासणी करून पंचांना त्यांचे मानधन दिले जाणार आहे
पंकज पाटील, उपायुक्त पिंपरी-चिंचवड महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT