

पिंपरी: भोसरी एमआयडीसी परिसरातील खंडेवस्ती येथे जुन्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटातील आरोपींनी एकमेकांना मारहाण करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 15) रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली.
पहिल्या प्रकरणात रघुनाथ जिंबक आव्हाड (52, रा. खंडेवस्ती, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आकाश भरत खरात (26, रा. खंडेवस्ती, भोसरी), सागर प्रधान (28, रा. खंडेवस्ती, भोसरी), रोहन बबन गाडे (23, रा. खंडेवस्ती, भोसरी), साहिल सुभाष तुपसौंदर (22, रा. खंडेवस्ती, भोसरी), राहुल ऊर्फ काळ्या रमेश प्रसाद (24, रा. खंडेवस्ती, भोसरी) आणि तीन विधीसंघर्षित बालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रस्त्याने जात असताना आरोपींनी त्यांना घेराव घातला आणि ‘तुझे या भागात अति चालले आहे, तुला आता ठार करतो’ असे म्हणून लोखंडी पट्टीने डोक्यात वार केले. फिर्यादीचा आवाज ऐकून त्यांचे नातेवाईक वाचवण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांनाही लाथा-बुक्क्यांनी आणि लोखंडी पट्टीने मारहाण करून जखमी केले. या हल्ल्यात फिर्यादीसह त्यांचे नातेवाईक गंभीर जखमी झाले असून राहुल ऊर्फ काळ्या याला अटक करण्यात आली आहे, तर अल्पवयीन मुलांना समजपत्र देण्यात आले आहे.
याच्या परस्पर विरोधात सोनू बाबुलाल गौतम (17, रा. खंडेवस्ती, भोसरी) याने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रघुनाथ त्रिंबक आव्हाड (50, रा. खंडेवस्ती, भोसरी), समाधान दुधभाते (25, रा. खंडेवस्ती, भोसरी), ओमकार दुधभाते (22, रा. खंडेवस्ती, भोसरी), अविनाश दत्ता काकडे (20, रा. खंडेवस्ती, भोसरी) आणि एक महिला (45, रा. खंडेवस्ती, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी सागर प्रधान यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देऊन आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात दगडाने मारले, तर महिला आरोपीने लोखंडी पाईपने मारहाण करून गंभीर दुखापत केली. या प्रकरणी पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करत आहेत.