Pimpri Chinchwad Traffic Police Manpower: पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक पोलिसांचे अपुरे मनुष्यबळ; वाढती कोंडी आणि अपघातांचा धोका

20 लाख वाहनांचा ताण, मोजके वाहतूक पोलिस; अपघातमुक्त शहरासाठी मनुष्यबळ वाढविण्याची गरज
Traffic Police
Traffic Police Pudhari
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराचा वेगाने वाढणारा विस्तार, आयटी व औद्योगिक क्षेत्रांची भरभराट आणि त्यातून वाढलेली वाहनसंख्या यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. शहरात सुमारे 20 लाख वाहने, 2252 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि 150 प्रमुख चौक आहेत. या संपूर्ण यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मात्र अवघ्या 440 वाहतूक पोलिस आणि 175 वाहतूक वॉर्डन यांच्या खांद्यावर आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेंतर्गत 13 वाहतूक विभाग व एक नियंत्रण कक्ष कार्यरत असला, तरी उपलब्ध मनुष्यबळाच्या तुलनेत शहराचा पसारा प्रचंड असल्याने वाहतूक पोलिसांची अक्षरशः दमछाक होत आहे.

Traffic Police
Maharashtra Vasudev Folk Artist: खराळवाडीत वासुदेव लोककलेचे दुर्मिळ दर्शन

मनुष्यबळ वाढविण्याची गरज

शहराचा झपाट्याने वाढणारा विस्तार, नव्या गृहसंकुलांची उभारणी, औद्योगिक वाहतूक, आयटी कर्मचाऱ्यांची वाढती संख्या यामुळे भविष्यात वाहनसंख्या आणखी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेतील मनुष्यबळ वाढविणे, आधुनिक तंत्रज्ञानासोबत प्रत्यक्ष रस्त्यावर अधिक कर्मचारी तैनात करणे आणि नागरिकांमध्ये शिस्त निर्माण करणे ही काळाची गरज आहे. अन्यथा, अपघात प्रवण ठिकाणांची संख्या कमी झाली तरी वाढत्या कोंडी आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे अपघातमुक्त आणि कोंडीमुक्त शहर हे स्वप्न दूरच राहण्याची भीती आहे.

वाढती कोंडी, वाढते अपघात

शहरातील वाढती वाहतूककोंडी, वेगमर्यादेचे उल्लंघन, सिग्नल तोडणे, रस्त्यांच्या डिझाइनमधील त्रुटी आणि बेकायदा पार्किंग यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सकाळी व संध्याकाळी कार्यालयीन वेळेत हिंजवडी, वाकड, बालेवाडी, भोसरी, निगडी, तळवडे-चिखली, पिंपरी कॅम्प, चापेकर चौक, काळेवाडी फाटा आदी भागांत वाहनांच्या रांगा लागतात. अनेकदा एका चौकात अडकलेली वाहने पुढील तीन-चार चौकांपर्यंत कोंडी निर्माण करतात.

Traffic Police
Pimple Gurav Godown Fire: पिंपळे गुरवमध्ये फर्निचर गोडाऊनला भीषण आग

शहर परिसरात 15 ब्लॅकस्पॉट

शहरातील 15 ठिकाणांना ब्लॅकस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये हिंजवडी फेज-3 जंक्शन, वाकड येथील बिर्ला हॉस्पिटल चौक, चापेकर चौक, रावेतजवळील स्टोन स्कूल कट, काळेवाडी फाटा, भोसरी-आळंदी रस्त्यावरील महाळुंगे फाटा, निगडी बीआरटी मार्गावरील दुचाकी लेन तसेच तळवडे-चिखली मार्गावरील धोकादायक वळणांचा समावेश आहे.

मनुष्यबळाअभावी अंमलबजावणीत अडथळे

वाढत्या अपघातांमागे चुकीचे सिग्नल टाइमिंग, अपुरे पथदिवे, बेकायदा पार्किंग, रस्ते अभियांत्रिकीतील त्रुटी आणि अवजड वाहनांची बेशिस्त वाहतूक ही प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. ब्लॅकस्पॉटवरील अपघात रोखण्यासाठी सीसीटीव्ही नेटवर्क उभारणे, उच्च क्षमतेचे एलईडी दिवे बसविणे, रंबल स्ट्रिप्स व सूचना फलक लावणे, स्पीडगन मोहीम राबविणे, 24 तास बेकायदा पार्किंगविरोधात कारवाई तसेच रोड इंजिनिअरिंग अहवालानुसार सुधारणा करणे अशा उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. मात्र, या सर्व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक तेवढे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने वाहतूक पोलिसांना सतत तडजोड करावी लागत आहे. एका वाहतूक पोलिसावर अनेक चौकांची जबाबदारी येते. एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास त्या भागातील कर्मचारी तेथे धाव घेतात आणि इतर चौकांवरील नियंत्रण सुटते. परिणामी कोंडी वाढल्याचे दिसून येते.

Traffic Police
Maval Wrestling Tradition: मावळची कुस्ती परंपरा धोक्यात; भव्य कुस्ती संकुलाची मागणी

आकडे बोलतात

जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत शहरात 360 अपघात झाले असून त्यात 374 जणांचा मृत्यू झाला. 2025 मध्ये अपघातांची संख्या सव्वातीनशेपर्यंत खाली आली असून मृत्यूंची संख्या 318 इतकी नोंदविण्यात आली आहे. काही प्रमाणात घट दिसत असली, तरी ही स्थिती समाधानकारक म्हणता येत नाही.

मास्टर प्लानचा मर्यादित परिणाम

वाहतूककोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी आखलेल्या मास्टर प्लानअंतर्गत 143 चौकांची ओळख करून तेथे अतिरिक्त कर्मचारी नेमणे, गरजेनुसार वन-वे, यू-टर्न, सर्व्हिस रस्त्यांचे रुंदीकरण अशा उपाययोजना करण्यात आल्या. नियंत्रण कक्षातून सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख वाढविण्यात आली. तरीही प्रत्यक्ष रस्त्यावर पोलिसांची उपस्थिती अपुरी पडत असल्याने शिस्त राखणे कठीण होत असल्याचे वाहतूक पोलिस खासगीत सांगतात.

Traffic Police
Vadgaon Maval Election Extortion Allegation: निवडणुकांत पैसे उकळल्याचा आमदार सुनील शेळकेंचा गंभीर आरोप

पिंपरी-चिंचवड शहरात अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना सातत्याने राबवित आहोत. ब्लॅकस्पॉटची सखोल तपासणी करून तातडीने सुधारणा केल्या जात आहेत. पूर्वी 24 ब्लॅकस्पॉट होते, ती संख्या 15 वर आणण्यात यश मिळाले आहे. सीसीटीव्ही, स्पीडगन मोहीम, सिग्नल टाइमिंग सुधारणा आणि बेकायदा पार्किंगविरोधातील कारवाई सुरू आहे. शहरात 20 लाख वाहनांचा ताण असून मनुष्यबळ मर्यादित आहे, तरी उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत. नागरिकांनीही नियमांचे पालन करून सहकार्य करणे गरजेचे आहे.

विवेक पाटील, पोलिस उपायुक्त (वाहतूक), पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news