Fire Certificate Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri School Fire Safety Certificate: पिंपरी-चिंचवडमधील 650 शाळांना फायर सर्टिफिकेटसाठी नोटीस

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन विभागाचा मोठा निर्णय; फायर ऑडिट व सुरक्षा उपाय बंधनकारक

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: शाळांची अग्निसुरक्षा नोंदणी आणि अग्निसुरक्षितता पूर्तता प्रमाणपत्र (फायर सर्टिफिकेट) बंधनकारक आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांनी फायर सर्टिफिकेट घेण्याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तब्बल 650 शाळा आणि शैक्षणिक संस्थांना फायर सर्टिफिकेट घेण्यासाठी नोटीस बजावली आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून दहा दिवसांत फायर सर्टिफिकेट घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.

शहरात 540 खासगी तर, 110 महापालिकेच्या अशा एकूण 650 शाळा आहेत. उन्हाळ्याची सुटी संपून 15 जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. तर, काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा पूर्वीच सुरू झाल्या आहेत. शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षक व कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी अग्निसुरक्षा उपाय असणे गरजेचे आहे.

महापालिकेच्या नियमानुसार प्रत्येक शैक्षणिक संस्थेकडे अग्निशमन विभागाचे फायर सर्टिफिकेट असणे बंधनकारक आहे. यासाठी सर्व शाळांना अग्निशामक सुरक्षा प्रमाणपत्राची पूर्तता करण्यासाठी नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. सर्व शाळांमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना करणे, त्या कार्यान्वित ठेवणे हे संस्थाचालकांची जबाबदारी आहे. मान्यताप्राप्त संस्थेकडून विहित नमुन्यातील प्रमाणपत्र अग्निशमन विभागाकडे सादर करणे बंधनकारक आहे.

अग्निशमन यंत्रणा असणे आवश्यक

शाळा इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा सुरू आहे का ? याबाबत शासन मान्य संस्थेकडून फायर ऑडिट करून घेण्यात यावे. ऑडिटमध्ये काही आक्षेप निघाल्यास त्याची पूर्तता करावी. फायर ऑडिटचा अहवाल महापालिकेस सादर करावा. शैक्षणिक संस्थेची नोंदणी व आवश्यक सुरक्षा अग्नी सुरक्षितता उपाययोजना केल्यास गंभीर दुर्घटना टाळण्यास मोठी मदत होणार आहे.

विद्यार्थ्यांना सुरक्षेची हमी देणे संस्थेची जबाबदारी

शहरातील सर्व शाळांनी फायर सर्टिफिकेट घेतले नसल्याचे पडताळणीत आढळून आले आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षेची हमी देणे ही शैक्षणिक संस्थाचालक व मालकांची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे नोंदणी आणि अधिकृत फायर सर्टिफिकेट घेणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळाचालकांनी नियमांचे पालन करणे आणि कोणत्याही संभाव्य दुर्घटनेपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करणे महापालिकेचे ध्येय आहे, असे महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT