सांगवी: जुन्या सांगवीतील मधुबन कॉलनीतील गल्ली नंबर ४. बुधवारची सकाळ नेहमीसारखीच सामान्य होती. अमृता बसन्नावार ही तरुण माता आपल्या पोटच्या गोळ्याला, म्हणजेच आपल्या चिमुरड्याला प्रेमाने कडेवर घेऊन गल्ली नंबर 4 मधून आपल्या घरी चालली होती. आईच्या उबदार कुशीत निश्चिंत असलेले ते बाळ जगाच्या विरंगुळ्यात रमले होते; पण कोपऱ्यावरून काळ बनून आलेल्या काही राकट आणि आक्रमक भटक्या कुत्र्यांनी काही समजण्यापूर्वीच त्यांच्यावर अचानक हल्ला केला. कुत्र्यांच्या अचानक झालेल्या या क्रूर हल्ल्यामुळे अमृता यांचा तोल गेला. एका क्षणात त्यांच्या कडेवरील ते लहानगं बाळ थेट रस्त्यावर खाली कोसळले. याचवेळी आजूबाजूला दबा धरून बसलेली आणखी २ ते ३ कुत्रे त्या निष्पाप बाळाच्या अंगावर अक्षरशः भुंकत धावून आली.
या वेळी माझ्या बाळाला वाचवा... माझ्या लेकराला कुत्रे खाणार हा हुंदका आणि आईचा तो हताश पण जिवाच्या आकांताने केलेला संघर्ष पाहून दगडही पाझरल्याशिवाय राहणार नाही. परिसरातील भटक्या कुत्र्यांची दहशत आता कोणत्या थराला गेली आहे, याचे एक अत्यंत काळीज पिळवटून टाकणारे वास्तव जुन्या सांगवीतून समोर आले आहे. पाठीवर आणि कडेवर खेळणारी कोवळी लेकरं सुरक्षित घराबाहेर कशी न्यायची, हा प्रश्न आज प्रत्येक आई-वडिलांना पडला आहे.
माझं लेकरू वाचलं, पण तो आघात कसा विसरू?
या थरारक आणि मन हेलावून टाकणाऱ्या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया देताना बाळाचे वडील उदय बसन्नावार यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते म्हणाले, की माझ्या पत्नीवर आणि लहान बाळावर हा जो आघात झाला, तो मी शब्दांत सांगू शकत नाही. ती बेसावध होती, अचानक कुत्र्याने झेप घेतली आणि लेकराला खाली पाडले. तिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाळाला उचलले म्हणूनच आज आमचे लेकरू आमच्यासोबत आहे; पण उद्याची शाश्वती काय? प्रशासनाला जाग यायला आता आणखी किती लेकरांचा बळी जावा लागणार आहे?
आईच्या प्राणांतिक संघर्षाने टळला अनर्थ
कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर त्या मातेने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या प्राण्यांची पर्वा न करता, जीवाची बाजी लावली. अत्यंत विलक्षण प्रसंगावधान आणि अंगात संचारलेल्या अफाट धाडसाच्या जोरावर तिने जमिनीवर पडलेल्या आपल्या एक वर्षाच्या बाळाला झटकन उचलले आणि आपल्या छातीशी घट्ट कवटाळून धरले. जर त्या मातेने त्या एका सेकंदाचाही विलंब केला असता, तर त्या मुक्या प्राण्यांनी त्या चिमुरड्याचे लचके तोडले असते. एका आईच्या अफाट जिद्दीमुळे आज एका निष्पाप जीवाचा पुनर्जन्म झाला; पण या भीषण थराराने त्या मातेच्या काळजाचा ठोका चुकला होता.
आता किती वाट पाहणार
कुत्रा चावल्यानंतर रुग्णालयात इंजेक्शनचे डोस घेणे, वेदना सहन करणे आणि मानसिक धक्क्यातून बाहेर येणे ही साधी गोष्ट नाही. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि प्रशासनाने आता कागदी घोडे न नाचवता व केवळ कुत्री पकडण्याचे नाटक न करता, भटक्या कुत्र्यांचे शास्त्रीय पद्धतीने पुनर्वसन किंवा कठोर स्थलांतर करण्याची वेळ आली असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
आमची पशुवैद्यकीय विभागाची टीम सकाळपासूनच त्या कुत्र्याला पकडण्यासाठी सांगवी परिसरामध्ये पूर्णपणे कार्यरत आहे. नागरिकांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची असून, संबंधित कुत्र्याला हुडकून योग्य ती कारवाई केली जात आहे.अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका
माझ्या पुतणीवरही यापूर्वी परिसरातील भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता. प्रशासनाला कळवून आठ-दहा दिवसांनी पालिका कर्मचारी येतात, कुत्र्याला पकडून नेतात, त्याला अँटी-रेबीज इंजेक्शन देऊन आणि नसबंदी करून पुन्हा त्याच भागात सोडून देतात. पालिकेच्या या पकडा आणि पुन्हा त्याच भागात सोडा या जुन्याच धोरणामुळे समस्येवर कधीच कायमस्वरूपी तोडगा निघत नाही.रेखा पवार, स्थानिक नागरिक
काही दिवसांपूर्वीच चिखली परिसरात एका लहान मुलीवर भटक्या कुत्र्याने अत्यंत क्रूर हल्ला केला होता, ज्यामध्ये त्या दुर्दैवी मुलीला तब्बल ४० टाके पडले होते. त्यावेळी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय चांगलाच गाजला होता, परंतु त्या सभेनंतर प्रत्यक्षात काय झाले? अद्यापही भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासंदर्भात पालिकेने कुठलीही ठोस किंवा कायमस्वरूपी उपाययोजना केलेली नाही. प्राणीमित्र उघड्यावर कुत्र्यांना खाऊ घालतात, ज्यामुळे कुत्र्यांची संख्या व हिंस्त्रपणा वाढतो, पण नाहक जीव सामान्य नागरिकांचा आणि लेकरांचा जातो.गणेश ढोरे, स्थानिक नागरिक