संतोष शिंदे
पिंपरी: सहल आणि रोड ट्रिपची वाढती क्रेझ आता तरुणांच्या जिवावर बेतू लागली आहे. पिंपरी-चिंचवडमधील तरुण बाहेरगावी सहलीसाठी जात असताना प्रवासादरम्यान अपघाती मृत्यूच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील काही वर्षांत घडलेल्या घटनांनी सहलींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. शहरातील तरुणांचा कल परराज्यातील पर्यटनस्थळांकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
स्वतःची कार घेऊन ‘रोड ट्रिप’ ही नव्या पिढीची आवड बनली असली, तरी त्यामागील धोके अजूनही दुर्लक्षित आहेत. लांब पल्ल्याचा प्रवास, अनोळखी रस्ते, बदलणारे हवामान आणि वाहनांवरील नियंत्रण, यांचा पुरेसा विचार न करता केलेल्या प्रवासामुळे अपघातांची शक्यता वाढत आहे. नुकतेच लेह-लदाख सहलीहून परतताना राजस्थानमध्ये पिंपरी-चिंचवडमधील कुणाल चोरडिया, मयूरेश पाडाळे आणि सिद्धेश आल्हाट या तिघा तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. नियंत्रण सुटलेली कार पुलावरून सुमारे 30 फूट खाली कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण शहर हादरले असून, सहलींच्या नावाखाली तरुण घेत असलेल्या जोखमीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुले परत येईपर्यंत मनात धडधड
मुले सहलीला गेली की परत येईपर्यंत मनात धडधड असते. मुलांनी पोस्ट केलेले फोटो आणि व्हिडीओ पाहून आनंद होतो. मात्र, एखादी अपघाताची बातमी आली की भीती वाटते, अशी भावना पालक व्यक्त करू लागले आहेत.
घटना:
यापूर्वी अक्कलकोट-गाणगापूर रस्त्यावर बिंजगेर येथे कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात हिंजवडी परिसरातील दीपक सुभाष बुचडे, आकाश ज्ञानेश्वर साखरे आणि आशुतोष संतोष माने या तिघांचा मृत्यू झाला होता. रात्री उशिरा घडलेल्या या अपघातात समोरून येणाऱ्या ट्रेलरची कारला जोरदार धडक बसली होती. धडकेची तीव्रता इतकी होती, की कारचा चुराडा झाला आणि तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे हिंजवडीसह परिसरात शोककळा पसरली होती.
तज्ज्ञ काय सांगतात...
लांब पल्ल्याच्या सहलीदरम्यान होणाऱ्या अपघातामागे काही ठळक कारणे दिसून येतात. अतिवेग ही सर्वांत मोठी समस्या ठरत असून, हायवेवर वाहन चालवताना वेगावर नियंत्रण न राहिल्यास अपघाताचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे सलग 10 ते 12 तास ड्रायव्हिंग केल्याने चालकाचा थकवा वाढतो आणि त्याचा परिणाम रिॲक्शन टाइमवर होतो. अनोळखी रस्ते, विशेषतः घाट आणि डोंगराळ भाग तसेच पावसाळा किंवा बर्फवृष्टीसारखे हवामान हेदेखील अपघाताला कारणीभूत ठरते. मित्रांच्या ग्रुपमध्ये प्रवास करताना ‘कोण वेगात चालवतो’ किंवा ‘कोण आधी पोहचतो’ अशा स्पर्धात्मक मानसिकतेमुळेही धोका वाढतो.
काय काळजी घ्यावी?
प्रवासापूर्वी वाहनाची सखोल तपासणी करावी
दोन ते तीन तासांनी विश्रांती घ्यावी आणि शक्य असल्यास चालक बदलावा
वेगमर्यादा काटेकोर पाळावी, विशेषतः घाट आणि डोंगराळ भागात रात्रीचा प्रवास टाळण्याचा प्रयत्न करावा
हवामान आणि रस्त्यांची माहिती आधी घेऊनच प्रवास सुरू करावा
मद्यपान करून वाहन चालवणे टाळावे
जीपीएसवर पूर्ण अवलंबून न राहता स्थानिक मार्गदर्शन घ्यावे
आपत्कालीन क्रमांक आणि प्राथमिक उपचारपेटी सोबत ठेवावी
सहल अथवा लांब पल्ल्याच्या रोड ट्रिपदरम्यान घडणाऱ्या अपघातांच्या घटनांचे विलेषण केल्यास अतिवेग, चालकाचा थकवा आणि निष्काळजीपणा, ही प्रमुख कारणे आढळून येतात. अशा घटना टाळण्यासाठी प्रवासादरम्यान नियमित अंतराने विश्रांती घेणे, निर्धारित वेगमर्यादेचे काटेकोर पालन करणे तसेच वाहनाची पूर्वतपासणी करणे अत्यावश्यक आहे.डॉ. विवेक पाटील, उपायुक्त, वाहतूक विभाग, पिंपरी-चिंचवड