संतोष शिंदे
पिंपरी: शहरातील रस्ते अपघातांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. मागील अडीच वर्षांत साठ वर्षांपुढील ९३ ज्येष्ठांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश अपघात रस्ता ओलांडताना झाल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी पाय मोकळे करण्यासाठी मारलेला फेरफटका जीवघेणा ठरत असल्याचे या आकडेवारीवरून समोर येत आहे.
सन २०२४ मध्ये साठ वर्षांपुढील ४३ ज्येष्ठांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. सन २०२५ मध्ये हा आकडा ३५ होता, तर यंदा आतापर्यंत १५ ज्येष्ठांचा अपघाती मृत्यू झाला आहे. शहरातील वाढती वाहनसंख्या, भरधाव वाहतूक आणि सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी आवश्यक सुविधांचा अभाव ज्येष्ठांसाठी धोकादायक ठरत आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी, मंदिर, उद्यान किंवा बाजारात जाण्यासाठी बाहेर पडणाऱ्या ज्येष्ठांना मुख्य तसेच अंतर्गत रस्ते ओलांडावे लागत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडताना त्यांच्यासोबत कोणीतरी असणे गरजेचे बनले आहे.
... म्हणून रस्ता ओलांडताना धोका अधिक
ज्येष्ठ नागरिकांचा चालण्याचा वेग तुलनेने कमी असल्याने रस्ता ओलांडण्यासाठी त्यांना अधिक वेळ लागतो. वयोमानानुसार दृष्टी आणि श्रवणशक्तीत होणारे बदल, वाहनाचा वेग आणि अंतराचा अंदाज घेण्यात होणारी चूक तसेच अचानक वाहन जवळ आल्यास तत्काळ बाजूला होता न येणे, यामुळे अपघाताचा धोका वाढतो. काही भागांत झेब्रा क्रॉसिंग किंवा सिग्नल दूर असल्याने नागरिक वाहनांच्या मधून रस्ता ओलांडताना दिसतात. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना अधिक धोका निर्माण होतो. त्यामुळे ज्येष्ठ पादचारी दिसल्यास वाहनचालकांनी वेळीच वाहनाचा वेग कमी करणे आवश्यक आहे.
आकडेवारी
२०२४ : ४३ मृत्यू
२०२५ : ३५ मृत्यू
२०२६ : १५ मृत्यू
एकूण : ९३ मृत्यू
पदपथांचाही प्रश्न कायम
शहरातील काही भागांत पदपथ नाहीत, तर काही ठिकाणी पदपथांवर अतिक्रमण, वाहने किंवा अन्य अडथळे आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना रस्त्याच्या कडेने चालावे लागते. गर्दीच्या वेळेत दुचाकी आणि इतर वाहनांची वर्दळ वाढल्याने पादचाऱ्यांसाठी उपलब्ध जागा कमी होते. परिणामी, ज्येष्ठ पादचाऱ्यांना अपघाताचा धोका अधिक निर्माण होत आहे.
फेरफटक्याची वेळही महत्त्वाची
अनेक ज्येष्ठ नागरिक नियमितपणे सकाळी किंवा सायंकाळी चालण्यासाठी घराबाहेर पडतात. मात्र, सायंकाळच्या वेळेत कार्यालये आणि औद्योगिक परिसरातून परतणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असल्याने रस्त्यांवरील वाहतुकीची गर्दीही अधिक असते. त्यामुळे फेरफटक्यासाठी सुरक्षित मार्ग निवडणे तसेच तुलनेने कमी वाहतूक असलेली वेळ निवडणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
वृद्ध व्यक्तींना शहरातील बंदिस्त फ्लॅटमध्ये दीर्घकाळ राहावे लागल्यास एकटेपणा आणि बंदिस्तपणाची भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळे चालणे आणि समवयस्क व्यक्तींशी संवाद साधणे ही त्यांची मानसिक गरजही असते. त्यांना बाहेर जाण्यापासून रोखण्याऐवजी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आणि शक्य असल्यास घराबाहेर जाताना त्यांच्यासोबत कोणीतरी असणे आवश्यक आहे.डॉ. पूजा मिसाळ, डायरेक्टर ऑफ मेडिसिन, वृद्धावस्था मेंदू व मनोविकार तज्ज्ञ, पिंपरी-चिंचवड.
रस्ता ओलांडताना ज्येष्ठ नागरिकांचा चालण्याचा वेग कमी असल्याने वाहनचालकांनी त्यांना पुरेसा वेळ द्यावा. ज्येष्ठ व्यक्ती रस्त्यावर किंवा रस्ता ओलांडताना दिसल्यास वाहनाचा वेग आधीच कमी करावा. ज्येष्ठांनीही शक्यतो झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल किंवा सुरक्षित ठिकाणावरून रस्ता ओलांडावा.विक्रांत देशमुख, पोलिस उपायुक्त (वाहतूक विभाग), पिंपरी- चिंचवड.