वर्षा कांबळे
पिंपरी: राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात (आरबीएसके) पिंपरी-चिंचवड शहरातील अंगणवाड्या महापालिका व अनुदानित शाळांमधील 98 हजार 891 विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये विविध आजारांचे निदान झालेल्या विद्यार्थ्यांवर मोफत औषधोपचार व शस्रक्रिया करण्यात आल्या. हृदयविकाराच्या 24, अन्य आजारांसाठीच्या 321 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे हे अभियान विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय पथकाद्वारे शहरातील अंगणवाडी व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये जन्मजात हृदयविकार, दृष्टिदोष, रक्तक्षय (निमिया), दात खराब होणे, श्रवणदोष, डाऊन्स सिंड्रोम, त्वचारोग, मध्यम कानाचा संसर्ग (ओटायटिस मीडिया), हालचालींमध्ये उशीर (मोटर डिले) व हर्निया (आतड्याची गाठ) हे प्रमुख आजार आढळून आले.
या अभियानाच्या माध्यमातून सामंजस्य करार झालेल्या खासगी रुग्णालयांमध्ये एक वर्ष ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये हृदयविकारावरील एकूण 24 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामध्ये अंगणवाडीतील 6 व शाळांमधील 18 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय इतर आजारांवरील एकूण 321 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामध्ये अंगणवाड्यांमधील 43 व शाळांमधील 278 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या शस्त्रक्रियांमध्ये डोळ्यांचा तिरळेपणा, पेंडिक्सचा आजार, फिमोसिस, जिभेची गाठ, टाळूला फट, ओठाला फट तसेच दंतशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.
योग्य उपचारांचे उद्दिष्ट
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचा माध्यमातून बालकांच्या आरोग्याची तपासणी व त्यांच्या आढळणाऱ्या आजारांना वेळीच पायबंध घालणे हा मुख्य उद्देश समोर ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी करून मुलांमध्ये आढळणाऱ्या जन्मत: असलेले व्यंग, लहान मुलांमधील आजार, जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार व अपंगत्व इत्यादी बाबींचे वेळेवर निदान करून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
तपासणीत आढळलेले आजार
तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये जन्मजात हृदयविकार, दृष्टिदोष, रक्तक्षय (निमिया), दातांची कीड, श्रवणदोष, डाऊन्स सिंड्रोम, त्वचारोग, मध्यम कानाचा संसर्ग (ओटायटिस मीडिया), हालचालींमध्ये उशीर (मोटर डिले) व हर्निया (आतड्याची गाठ) हे प्रमुख आजार आढळून आले.
98 हजार विद्यार्थ्यांची तपासणी
या कार्यक्रमात जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकांचा समावेश होता. यातील एका पथकात दोन वैद्यकीय अधिकारी, एका औषध निर्माता आणि एका परिचारिकेचा समावेश आहे. या पथकामार्फत अंगणवाड्या, महापालिका व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात 34097 बालकांची तपासणी करण्यात आली. 296 शाळांमधील 98 हजार 891 विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात सहा वर्षांपासून 18 वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
गंभीर आजारांचे वेळीच निदान
राष्ट्रीय बाल स्वास्थ अभियान (आरबीएसके) अंतर्गत एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत शहरातील महापालिका व अनुदानित शाळांसह अंगणवाड्यांमधील बालकांसाठी राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत अनेक गंभीर आजारांचे वेळीच निदान झाले. तसेच शेकडो बालकांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे राष्ट्रीय बाल स्वास्थ अभियान शालेय विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी व शालेय बालकांच्या आरोग्याच्या संवर्धन व विकास साधण्यासाठीही महत्त्वपूर्ण योजना आहे. 0 ते 18 वयोगटातील अंगणवाडी तसेच शासकीय निम शासकीय शाळेतील मुलांची आरोग्य विषयक तपासणी तसेच शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. सर्व शिक्षकांपर्यंत ही योजनेची माहिती पोहोचल्यास शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या मुलांना व पालकांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. जेणेकरून मुलांचे आरोग्य उत्तम राहू शकेल.आशिष पुरनाळे (जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम)