RBSK School Health Checkup Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad RBSK Health Checkup: पिंपरी-चिंचवडमध्ये १.५७ लाख विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी; १,३७६ मुलांवर मोफत शस्त्रक्रिया

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचा मोठा दिलासा; हृदयविकार, नेत्रदोष, दंतविकार, हर्नियासह अनेक गंभीर आजारांचे वेळेत निदान आणि उपचार

पुढारी वृत्तसेवा

वर्षा कांबळे

पिंपरी: राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत २०२३ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका व अनुदानित शाळांसह अंगणवाड्यांमधील बालकांसाठी राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत अनेक गंभीर आजारांचे वेळीच निदान झाले. यामध्ये २९५ शाळांमधील १ लाख ५७ हजार १९६ मुला-मुलींची तपासणी करण्यात आली. यामध्ये १ हजार ३७६ मुलां-मुलींवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचा माध्यमातून बालकांच्या आरोग्याची तपासणी व त्यांच्या आढळणाऱ्या आजारांना वेळीच पायबंध घालणे हा मुख्य उद्देश समोर ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत ० ते १८ वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी करून मुलांमध्ये आढळणाऱ्या जन्मत: असलेले व्यंग, लहान मुलांमधील आजार, जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार व अपंगत्व इत्यादी बाबींचे वेळेवर निदान करून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकांचा समावेश होता. यातील एका पथकात दोन वैद्यकीय अधिकारी, एका औषध निर्माता आणि एका परिचारिकेचा समावेश आहे. या पथकामार्फत पिंपरी-चिंचवड शहरातील अंगणवाड्या, महापालिका व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात ३६१ अंगणवाड्यांपैकी बालकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये वयोगटातील शून्य ते सहा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. तर २९६ शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावीच्या एकूण १ लाख ६५ हजार ७२५ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ५७ हजार १९६ विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात सहा वर्षांपासून १८ वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

तपासणीत आढळलेले आजार

  • तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये जन्मजात हृदयविकार, दृष्टिदोष, रक्ताक्षय (अ‍ॅनिमिया), दातांची कीड, श्रवणदोष, डाऊन्स सिंड्रोम, त्वचारोग, मध्यम कानाचा संसर्ग (ओटायटिस मीडिया), हालचालींमध्ये उशीर (मोटर डिले) व हर्निया (आतड्याची गाठ) हे प्रमुख आजार आढळून आले.

  • यामध्ये २११ हृदयविकार असलेल्या मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली तसेच १२८ जणांवर हाडांच्या शस्त्रक्रिया, जलोदर १, हर्निया ५७, अपेंडिक्स १२२, ओठ व टाळुच्या ६०, तिरळेपणा व नेत्रदोष ८६, दंतविकार ५१५, कान १८२, कर्करोग २ आणि किडनीच्या १२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

आरबीएसकेअंतर्गत पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. या विद्यार्थ्यांत आढळलेल्या आजारांवर उपचारासाठी राज्यस्तरावर मोठ्या रुग्णालयांशी करार झालेला आहे. त्यामुळे उपचार आणि शस्त्रक्रियेसाठीचा खर्च केंद्र आणि राज्य सरकार मार्फत दिला दिला जात असल्याने संपूर्ण उपचार मोफत केले जातात.
आशिष पुर्नाळे ( जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT