Ramkrishna More Auditorium Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Ramkrishna More Auditorium Irregularities: रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील अनियमितता; १० कर्मचाऱ्यांना नोटीस

भाडे व अनामत रक्कम गैरव्यवहार; ५० लाख वसुलीचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अनामत रक्कम आणि भाडे वसुलीत अनियमितता झाल्याचे प्रकरण पुढे आले. अखेर या प्रकरणात लिपिक पदाच्या एकूण 10 कर्मचाऱ्यांना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवत 50 लाख 71 हजार रुपये दहा दिवसांच्या आत जमा करण्यास बजावण्यात आले आहे.

प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सन 2018 ते 2024 या कालावधीत क्रीडा विभागाकडून लिपिक व मुख्य लिपिक कार्यरत होते. तसेच, व्यवस्थापक म्हणून नाट्यगृहाची जबाबदारी काही कर्मचाऱ्यांवर देण्यात आली होती. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेले कार्यक्रम व रक्कम किती जमा झाली आहे, याचा हिशेब ठेवला नाही. हा प्रकार तब्बल सहा वर्षे सुरू होता. काही कर्मचाऱ्यांनी ही रक्कम महापालिकेत जमा न करता थेट स्वतःच्या खिशात घातली.

हा प्रकार समोर आल्यानंतर क्रीडा विभागाने संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली. रजिस्टर तपासणीत झालेले कार्यक्रम आणि प्रत्यक्षात जमा झालेली रक्कम यात तफावत आढळून आली. नंतर अंतर्गत लेखापरीक्षणामध्ये (ऑडिट) संबंधित कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या भाड्यापोटी जमा झालेले लाखो रुपये तिजोरीत भरली नसल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, नाट्यगृह भाड्याने देताना अनामत रक्कमा न घेणे, भाडे वसुलीची परस्पर विल्हेवाट लावणे, इतर साहित्य, साधनसामुग्रीचे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला. त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती; मात्र मागील काही महिन्यांपासून कोणतीही कार्यवाही झाली नाही. अखेर सामान्य प्रशासन व आयुक्तांना या कार्यवाहीसाठी मूहूर्त मिळाला. आयुक्त सूर्यवंशी यांनी 30 एप्रिलला एकूण 10 लिपिक, मुख्य लिपिक कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

ज्यामध्ये मुख्य लिपिक कांतीलाल वाघेरे, उमेश बांदल, मनोज भूतकर (सेवानिवृत्त), लिपिक राहुल ककरोठी, अभिषेक हिंगे, संकेत जंगम, संतोष बोत्रे, अमर निकाळजे, अतुल काळे, अशोक केंगले यांचा समावेश आहे. लेखापरीक्षण अहवालानुसार प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून वसूलपात्र रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण 50 लाख 70 हजार 626 रुपये वसूल केले जाणार आहे. दहा दिवसांच्या आत रक्कम जमा करण्यास व खुलासा करण्यास कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी बजावले आहे.

रक्कम तत्काळ भरा अन्‌‍ खुलासाही करा

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कामकाजात गैरवर्तन, हलगर्जीपणा आणि अनियमितता आढळून आली. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणी एकूण 50 लाख 70 हजार 626 रुपये रक्कम वसुलीसाठी दहा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्याकडून खुलासा देखील मागविण्यात आला आहे, असे महापालिकेचे सहआयुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT