Pimpri Chinchwad Public Toilets Issue Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Public Toilets Issue: पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था

पाणीटंचाई, अस्वच्छता आणि देखभालीअभावी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे

पुढारी वृत्तसेवा

मनीषा थोरात -पिसाळ

मोशी: पिंपरी-चिंचवड शहराचा वेगाने विस्तार होत असतानाच, दुसरीकडे शहरातील सार्वजनिक आणि सामूहिक स्वच्छतागृहांची दुरवस्था हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या दुरवस्थेचा त्रास स्थानिक नागरिक, महिला आणि पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.

संपूर्ण शहराचा विचार केला तर सध्या झोपडपट्टी आणि चाळ परिसरामध्ये 125 सामूहिक स्वच्छतागृहे आहेत, तर गार्डन आणि रस्त्यांच्या कडेला 701 सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणची मिळून एकूण संख्या 3,563 इतकी स्वच्छतागृह असून, 1589 जागांवर ही व्यवस्था उपलब्ध आहे. मात्र, यातील बहुतांश ठिकाणी पाण्याच्या तीव टंचाईमुळे सर्वत्र दुर्गंधीचे सामाज्य पसरले आहे. विशेषतः मोशी, चिखली, बीआरटी रोड, एमआयडीसी या भागांतील सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये महिला आणि पुरुषांसाठी पुरेशा सुविधांचा अभाव असल्याने बहुतांश स्वच्छतागृह म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी आहेत.

सार्वजनिक स्वच्छतागृह हाताळताना पाण्याचा अभाव हीच सर्वात मोठी अडचण आहे. अनेक स्वच्छतागृहांची अंतर्गत दुरवस्था झाली असून, नळ तुटलेले आहेत, तर काही ठिकाणी नळांना पाणीच येत नाही. बऱ्याच ठिकाणी प्रशासनाकडून वीजजोडणी केली जाते, मात्र समाजकंटकांकडून तिथली तोडफोड केली जाते. वीज आणि स्वच्छतेच्या प्रमाणावर लक्ष दिले जात असले तरी आज काम केले की उद्या पुन्हा वीज गायब होणे किंवा अस्वच्छता पसरणे अशा समस्या उद्भवतात. याशिवाय, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला असून, अनेक महिला स्वच्छतागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे किंवा सुरक्षेसाठी अटेंडंटची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही, ज्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे.

नागरिकांनीही सामाजिक भान जपावे

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मात्र नियमित स्वच्छता होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील या सर्व भागांतील सार्वजनिक स्वच्छतागृहांची रोजच्या रोज स्वच्छता केली जाते. परंतु, नागरिकांकडून त्याचा योग्य पद्धतीने वापर केला जात नाही. लोक फ्लश करत नाहीत, नळ चालूच ठेवून देतात किंवा तोडफोड करतात, ज्यामुळे यंत्रणेवर नाहक ताण येतो. नियमित पाणीपुरवठा आणि तुटलेल्या नळांची दुरुस्ती त्वरित झाल्यास ही परिस्थिती सुधारू शकते असे नागरिकांचे म्हणणे असले, तरी केवळ प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करून चालणार नाही, तर नागरिकांनीही हे आपलेच समजून सहकार्य केले पाहिजे आणि जबाबदारीने वागले पाहिजे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. या संपूर्ण समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता दोन्ही बाजूंनी समन्वय असणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

11 ठिकाणी स्मार्ट स्वच्छतागृहे उभारण्याचे काम सुरू

सध्या स्मार्ट सिटी आणि बीआरटीएस यांच्यामार्फत शहरात 11 ठिकाणी ‌’स्मार्ट स्वच्छतागृहे‌’ उभारण्याचे काम सुरू करण्यात आले असून, त्यापैकी नागरिकांच्या वापरासाठी 3 ठिकाणी काम पूर्ण झाले आहे. तर 8 ठिकाणी अद्याप बांधकाम सुरू आहे. यामध्ये भक्ती-शक्ती (पे अँड यूज), अप्पूघर पायथा आणि रोड, धर्मराज चौक, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज रस्ता, काळेवाडी जोतीबा गार्डन, काळेवाडी फाटा येथे 1, जगताप डेअरी चौक येथे 2, सांगवी फाटा येथे 1, बिर्ला हॉस्पिटल जवळ 1 आणि अण्णासाहेब मगर स्टेडियम चिंचवड बिजजवळ 2 याप्रमाणे वेगवेगळ्या भागात ही आधुनिक स्वच्छतागृहे उभी केली जात आहेत.

स्वच्छता सेवकांमार्फत शहरातील स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता केली जाते. मात्र, अनेक नागरिक त्याचा अत्यंत निष्काळजीपणे वापर करतात. वापर केल्यावर पाणी न टाकणे, नळ चालूच ठेवणे किंवा तोडफोड करणे अशा प्रकारांमुळे यंत्रणेवर ताण येतो. नागरिकांनीही हे आपलेच समजून सहकार्य केले, तरच ही सुविधा चांगल्या स्थितीत राहील.
प्रदीप ठेंगल, उपायुक्त, आरोग्य विभाग
शहरातील मुख्य बस स्टॉप आणि गर्दीच्या भागांमध्ये आजही पुरेशा स्वच्छतागृहांची व्यवस्था नसल्याचे चित्र आहे. बाजारपेठा आणि मंडईच्या भागात कागदोपत्री स्वच्छतागृहे दाखवली जात असली तरी ती दुरूनच स्वच्छ दिसतात, प्रत्यक्षात आतून मात्र त्यांची अवस्था अतिशय दयनीय आणि वापरण्यास अयोग्य आहे. महापालिकेने गेल्या वर्षी काही वापरण्यास अयोग्य ठरलेली स्वच्छतागृहे पाडलीदेखील आहेत.
शीतल वर्णेकर, नगरसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT