Pimpri Chinchwad Parks Problems Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Parks Problems: पिंपरी-चिंचवड उद्यानांची दुरवस्था; मूलभूत सुविधांचा बोजवारा

तुटलेली खेळणी, पिण्याच्या पाण्याची समस्या आणि दिव्यांगांसाठी कुलूपबंद सुविधा; उद्यान व्यवस्थापनावर नागरिकांचा संताप

पुढारी वृत्तसेवा

बजरंग मासाळ

पिपंरी: पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक उद्याने नागरिकांच्या विरंगुळ्याचे आणि मुलांच्या खेळाचे केंद्र मानली जातात. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली असता अनेक उद्याने समस्यांच्या गर्तेत अडकली असल्याचे स्पष्ट झाले आहे. करण्यात आलेल्या पाहणीत तुटलेली खेळणी राडारोडा, दिव्यांगांसाठी कुलूपबंद प्रसाधनगृहे, प्रेमी युगुलांचे किड्स झोनमध्ये बस्तान, पार्किंग समस्या, नियम धाब्यावर बसवणारे फोटोशूट प्रकार उघडकीस आले.

पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर

उद्यानांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. महापालिकेचे कनेक्शन असूनदेखील अनेक ठिकाणी पाणी पुरेशा दाबाने येत नसल्याने टाक्यांमध्ये पाणी चढत नसल्याची माहिती समोर आली. यामागे काही ठिकाणी मोटर नसणे हे प्रमुख कारण असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात विद्युत विभागाला पत्र देण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या नळातून गढूळ पाणी येत आहे. पाइपलाइन बदलण्याचे काम प्रस्तावित असले, तरी टेंडर प्रक्रियेला वर्षानुवर्षे विलंब होत असल्याने प्रत्यक्ष काम रखडले आहे. परिणामी वाटर कुलींग प्लांटदेखील बंद अवस्थेत असून नागरिकांना उन्हाळ्यात स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे.

कधी मिळणार सोयीसुविधा?

उद्याने ही नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग मानली जातात. मात्र मूलभूत सुविधांचाच अभाव असल्याने हीच उद्याने आता समस्यांचे केंद्र बनत आहेत. मुलांसाठी सुरक्षित खेळणी, स्वच्छ पिण्याचे पाणी, दिव्यांगांसाठी खुली सुविधा आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन यासाठी नागरिकांना अजून किती प्रतीक्षा करावी लागणार, तिकीट दर मात्र पंचतारांकित पण उद्यानातील सुविधांचा बोजवारा उडालेला दिसतो,काही उद्यानांमध्ये तिकीट आकारले जाते; परंतु बदल्यात मिळते तुटलेली खेळणी, दुर्गंधी आणि अस्वच्छ परिसर.नागरिकांच्या खिशावर ताण टाकणारे हे तिकीट धोरण, सुविधांच्या बाबतीत मात्र पूर्णपणे फसवे ठरत आहे.उद्यानांचा विकास कागदावर आणि प्रत्यक्षात नागरिकांची फक्त आर्थिक लूट सुरू असल्याची भावना निर्माण होत आहे. तिकीट घेताना नियम कडक पण सुविधा देताना प्रशासन मात्र बेफिकीर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

खेळण्यांची दुरवस्था; मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

शहरातील अनेक उद्यानांमध्ये मुलांसाठी बसविण्यात आलेली खेळणी तुटलेल्या अवस्थेत आढळली. काही ठिकाणी लोखंडी भाग बाहेर आलेले असून घसरगुंडी, झोपाळे आणि सी-सॉ धोकादायक बनले आहेत. उद्यानांमध्ये नियमित देखभाल नसल्याने गवत वाढलेले, राडारोडा पडलेला आणि साहित्य अस्ताव्यस्त टाकण्यात आल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे काही उद्यानांभोवती नियोजित गोडाउन किंवा साहित्य ठेवण्याची व्यवस्था नसल्याने देखभाल साहित्य थेट मोकळ्या जागेत टाकण्यात येत आहे. त्यामुळे साप, विंचवाचा धोका उद्भवू शकतो; तसेच स्वच्छता करण्यास अडचण तसेच उद्यानाचे सौंदर्यही खराब होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

दिव्यांगांसाठीच्या सुविधा कुलूपबंद

काही उद्यानांमध्ये दिव्यांग नागरिकांसाठी उभारण्यात आलेली प्रसाधनगृहे कुलूपबंद अवस्थेत आढळली. प्रसाधन ग्रहाच्यासमोरच राडारोडा तसेच शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या सुविधांचा प्रत्यक्ष उपयोगच होत नसल्याने दिव्यांग नागरिकांनी संताप व्यक्त केला. उद्यानात फिरण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

उद्यानांतील उउढत फक्त शोभेपुरते

कॅमेरे बसवले पण स्क्रीन नाही, सर्व्हर नाही, देखरेख नाही! नागरिकांच्या सुरक्षेच्या नावाखाली लाखोंचा खर्च; प्रत्यक्षात सीसीटीव्ही यंत्रणा फक्त दिखाव्यासाठी असल्याचे चित्र. घटना घडल्यावर पुरावेच उपलब्ध नसतील तर या कॅमेऱ्यांचा नेमका उपयोग कोणासाठी? सुरक्षा फलक झळकतोय, पण व्यवस्था मात्र पूर्णपणे अंधारात असल्याचे चित्र आहे.

एकूण 175 उद्याने आहेत, खेळणी दुरुस्तीसाठीचे टेंडर फायनल झाले आहे. 15-20 दिवसांत खेळणी दुरुस्तीस सुरुवात केली जाणार आहे. याविषयी विभागीय कर्मचाऱ्यांना योग्य ती देखभाल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याकडे आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.
महेश गारगोटे, मुख्य उद्यान अधीक्षक तथा वृक्षाधिकारी उद्यान विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT