

संतोष शिंदे
पिंपरी: भाड्याने राहणाऱ्या व्यक्तीने गंभीर गुन्हा केल्यास आणि संबंधित घरमालकाने त्या भाडेकरूची माहिती पोलिस ठाण्यात दिली नसल्याचे आढळल्यास आता घरमालकावरही थेट कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अशा प्रकरणांमध्ये घरमालकांची जबाबदारी निश्चित करण्यास सुरुवात केली असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना पडताळणी न करता आश्रय देणे आता घरमालकांच्या अंगलट येऊ लागले आहे.
हजारो कामगार भाड्याने खोल्या घेऊन वास्तव्यास
उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात देशभरातून मोठ्या प्रमाणात नागरिक रोजगारासाठी दाखल होत आहेत. औद्योगिक क्षेत्र, आयटी पार्क, कारखाने आणि बांधकाम व्यवसायामुळे शहरात परप्रांतीय कामगारांची संख्या सातत्याने वाढत असून, हजारो कामगार भाड्याने खोल्या घेऊन वास्तव्यास आहेत. मात्र, या वाढत्या स्थलांतरासोबतच शहराच्या सुरक्षिततेचाही प्रश्न गंभीर बनू लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकांविरोधात थेट कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.
यापूर्वी शहरात बांगलादेशी, नक्षलींशी संबंधितांचा वावर
दरम्यान, शहरात यापूर्वी बांगलादेशी नागरिक, नक्षलवादी संघटनांशी संबंधित संशयित तसेच दहशतवादी कारवायांशी संबंध असलेल्या व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान या संशयितांना आश्रय देणाऱ्या घरमालकांना त्यांच्या पार्श्वभूमीबाबत कोणतीही माहिती नसल्याचे समोर आले होते. अनेक घरमालक कोणतीही पडताळणी न करता केवळ आर्थिक फायद्यासाठी खोल्या भाड्याने देत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
घरमालकांकडून नियमांकडे दुर्लक्ष
पोलिसांकडून वेळोवेळी घरमालकांना आपल्या भाडेकरूंची संपूर्ण माहिती संबंधित पोलिस ठाण्यात देण्याचे आवाहन करण्यात आले होते. भाडेकरूचे ओळखपत्र, कायमचा पत्ता, मोबाईल क्रमांक, कामाचे स्वरूप आणि संबंधित व्यक्तीची प्राथमिक माहिती पोलिसांकडे जमा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, अनेक घरमालकांकडून या नियमांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे.
आरोपीसह फिर्यादीच्या घरमालकावरही गुन्हा
खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसी परिसरातील खालुंबे येथे तीन वर्षीय बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची संतापजनक घटना नुकतीच उघडकीस आली होती. या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपी राहत असलेल्या घरमालकाने पोलिसांना भाडेकरूची माहिती न दिल्याचे समोर आल्यानंतर त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संबंधित मुलगा राहत असलेल्या घरमालकावरदेखील नियमांचे पालन न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपी आणि फिर्यादी अशा दोन्ही बाजूंच्या घरमालकांवर कायद्याचा बडगा उगारण्यात आल्याचे दिसून आले
भाडेकरूची माहिती देणे बंधनकारक
यामुळे आता शहरात घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी राहत असलेल्या घरमालकांवरही पोलिसांनी जबाबदारी निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. संबंधित घरमालकाने भाडेकरूची माहिती पोलिसांना दिली नसल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. परिणामी, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना आश्रय देणे आता घरमालकांच्या अंगलट येऊ लागले आहे.
घरमालकांनी कोणतीही पडताळणी न करता भाडेकरू ठेवणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. भाडेकरूची माहिती स्थानिक पोलिस ठाण्यात देणे बंधनकारक आहे. शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घरमालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. गुन्हेगारांना नकळत आश्रय मिळू नये, यासाठी घरमालकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड