

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तब्बल 75 लाख रुपयांचा खर्च करण्याचा प्रस्ताव आणला आहे. महापालिकेची प्राथमिकता नेमकी लोकसेवा की पदाधिकाऱ्यांची सुरक्षा, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष, सत्तारूढ पक्षनेते आणि विरोधी पक्षनेते यांच्यासाठी खासगी सुरक्षारक्षक नेमण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बुधवार (दि. 13) होणाऱ्या सभेसमोर आहे. शासनमान्य महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित (मेस्को) संस्थेमार्फत नऊ सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला आहे. प्रत्येक सुरक्षारक्षकासाठी दर महिन्यास 34 हजार 650 रुपये वेतन आहे. एकूण 9 सुरक्षारक्षक नेमले जाणार आहेत.
दोन वर्षांच्या कालावधीत त्यांच्यावरील वेतनाचा खर्च एकूण 74 लाख 84 हजार 400 रुपये आहे. कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता थेट पद्धतीने हे सुरक्षारक्षक नेमले जाणार आहेत. महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. त्यामुळे नाहक आणि अनावश्यक खर्चाला फाटा देण्यात यावे, अशी स्थिती अपेक्षा केली जात आहे. मात्र, पदाधिकाऱ्यांकडून या प्रकारे नाहक उधळपट्टी केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सुरक्षारक्षक देण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी
स्थायी समितीचे अध्यक्ष, सत्तारुढ पक्षनेते आणि विरोधी पक्षनेते यांच्याकडे मोठ्या संख्येने नागरिकांची वर्दळ असते. विविध संघटना समस्या घेऊन येत असतात. त्यामुळे या पदाचय सुरक्षेसाठी सुरक्षार विभामामार्फत मेस्कोमार्फत सुरक्षारक्षक उपलब्ध करून देऱ्याची मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी आयुक्तांकडे 1 एप्रिलला केली होती. त्यानुसार आयुक्तांनी सुरक्षारक्षक पुरविण्यास सहमती दर्शवली आहे.
महापालिकेच्या सुरक्षारक्षकांचे काय ?
महापालिकेच्या सुरक्षा विभागात मोठ्या संख्येने सुरक्षारक्षक आहेत. महापालिकेच्या प्रवेशद्वारावर एकाच वेळी 5 ते 10 सुरक्षारक्षक तैनात असतात. महापालिकेचे ते सुरक्षारक्षक पदाधिकाऱ्यांनी सुरक्षासेवेत का, घेतले नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहेत.