Library Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Public Libraries: पिंपरी-चिंचवडमधील ग्रंथालये वाचकांविना ओस; ८१ हजारांहून अधिक पुस्तकांसाठी अवघे ७१२ सभासद!

शहरातील ११ सार्वजनिक ग्रंथालयांची दयनीय अवस्था; दोन ग्रंथालयांतील सभासदसंख्या शून्यावर, मोबाईल आणि डिजिटल माध्यमांमुळे पुस्तक वाचनाकडे तरुणांची पाठ

पुढारी वृत्तसेवा

वर्षा कांबळे

पिंपरी: एकेकाळी ज्ञानाचे मंदिर मानली जाणारी ग्रंथालये आज वाचकांअभावी ओस पडली आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वजनिक ग्रंथालयांची अधिकृत आकडेवारीच हे सांगते. शहरातील ११ मोठ्या ग्रंथालयांमध्ये मिळून ८१,६७६ हजार पुस्तके आहेत; परंतु वाचक सभासद आहेत फक्त ७१२! म्हणजे १०० पुस्तकांमागे एक सभासदही नाही.

१९४३ मध्ये भोसरीत सुरू झालेल्या ग्रंथालयापासून ते २०१७ मध्ये केशवनगरमध्ये सुरू झालेल्या पु. ल. देशपांडे वाचनालयापर्यंत सर्वच ग्रंथालयांची अवस्था सारखीच आहे. सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पुस्तके असलेली भोसरी आणि चिंचवडची ग्रंथालयेही १०० सभासदांचा टप्पा ओलांडू शकलेली नाहीत. तर, निगडी आणि चिंचवडमधील दोन ग्रंथालयांमध्ये सभासदसंख्या थेट शून्यावर आली आहे.

पूर्वी उन्हाळी सुट्टीत मुले कथा-कादंबऱ्या वाचनासाठी रांगा लावायची. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी सकाळपासून ग्रंथालयात बसायचे. आता तीच जागा मोबाईलने घेतली आहे. पुस्तक वाचायला दोन तास लागतात, रील्सला ३० सेकंद. त्यामुळे तरुण पिढीला इन्स्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअ‍ॅप हेच वाचन वाटू लागलेय. अभ्यासही आता ऑनलाइन झाला आहे. पीडीएफ, ऑनलाइन क्लास, मॉक टेस्टमुळे ग्रंथालयात जाण्याची गरजच उरली नाही, असे विद्यार्थी सांगतात.

शाळेतही वाचन तास बंद झाले आहेत. घरी पालकही मुलांना पुस्तकाऐवजी मोबाईल देतात. त्यामुळे सलग दोन पानेही वाचता येत नाहीत, लक्ष विचलित होते, एकाग्रता कमी झाली आहे, असे शिक्षक सांगतात. दुसरीकडे अनेक ग्रंथालयांमध्ये जुनी पुस्तके, वाय-फाय नाही, बसायला चांगली व्यवस्था नाही. त्यामुळे तरुणांना तिथे जावेसे वाटत नाही. प्रत्येक ग्रंथालयात ग्रंथपाल, लिपिक, शिपाई अशी पदे आहेत. पण, वाचक नसल्याने कर्मचारीही रिकामे बसतात.

ग्रंथालये पुन्हा गजबजण्यासाठी आता काळानुसार बदल गरजेचा आहे. पुस्तकांसोबत ई-बुक्स, मोफत वाय-फाय, डिजिटल वाचन कक्ष सुरू करावा. शाळांनी महिन्यातून एकदा विद्यार्थ्यांना ग्रंथालयात आणावे. सोशल मीडियावरच नवीन पुस्तकांची माहिती देणे गरजेचे आहे. कथाकथन, लेखकभेट, वाचन स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन अशा उपक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे. सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत ग्रंथालये सुरू ठेवावीत; जेणेकरून नोकरदारांनाही पुस्तक वाचन करता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT