

पिंपळे गुरव: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कासारवाडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात चोरट्यांनी डल्ला मारत मोठ्या प्रमाणात साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुरक्षा पत्र्याची भिंत कापून चोरट्यांनी तलाव परिसरात प्रवेश केला. सीसीटीव्ही कॅमेरा, इलेक्ट्रिक साहित्य, शॉवर, नळांसह विविध साहित्य चोरीला गेले आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी तीनही पाळ्यांमध्ये सुरक्षारक्षक तैनात असतानाही ९ नोव्हेंबर रोजी झालेल्या चोरीचा प्रकार तब्बल तीन दिवसांनंतर म्हणजेच १२ नोव्हेंबर रोजी उघडकीस आला. त्यामुळे जलतरण तलावाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी जलतरण तलावाच्या बाजूला लावलेल्या सुरक्षा पत्र्याच्या भिंतीचा पत्रा कापून आत प्रवेश केला. त्यानंतर जलतरण तलावातील विविध साहित्य चोरून नेले. येत्या दहा दिवसांत हा जलतरण तलाव नागरिकांसाठी सुरू करण्याचे नियोजन होते. त्यासाठी परिसराची पाहणी करण्यासाठी जलतरण तलावाचे ठेकेदार फडतरे गेले असता त्यांना साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी याची माहिती महापालिका प्रशासनाला दिली.
या चोरीमध्ये एक सीसीटीव्ही कॅमेरा, दोन इलेक्ट्रिक वायर, एक एमसीबी, दोन हॅलोजन दिवे तसेच पुरुष आणि महिला स्वच्छतागृहांमधील शॉवर व नळ मोठ्या प्रमाणात चोरीला गेले आहेत. पुरुषांच्या बाथरूममधील ११ शॉवर आणि १३ नळ, तर महिलांच्या बाथरूममधील आठ शॉवर आणि १४ नळ चोरट्यांनी लंपास केले. याशिवाय शेजारील पाण्याच्या टाकीवरील दोन बाथरूममधील नळ, अतिक्रमण विभागाने ठेवलेल्या चार लोखंडी फ्रेम तसेच शेजारील क्रिकेट अकॅडमीमधील दोन क्रिकेट बॅटही चोरीला गेल्या आहेत.
चौकशीची मागणी
९ नोव्हेंबर रोजी चोरी झाली असताना तिचा उलगडा १२ नोव्हेंबर रोजी झाला. त्यामुळे सुरक्षारक्षकांच्या कामकाजाबरोबरच सुरक्षा यंत्रणेच्या देखरेखीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत होती का?, सुरक्षारक्षकांनी नियमित गस्त घातली होती का? आणि चोरीची माहिती वरिष्ठांना वेळेत देण्यात आली होती का?, याची चौकशी होणे आवश्यक आहे.
तीन पाळ्यांत सुरक्षारक्षक; तरी चोरी कशी?
जलतरण तलावाच्या ठिकाणी तीनही पाळ्यांमध्ये सुरक्षारक्षक काम करत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, ९ नोव्हेंबरच्या हजेरी मस्टरवर संबंधित सुरक्षारक्षकाची स्वाक्षरी असल्याचेही निदर्शनास आले आहे. असे असताना चोरट्यांनी सुरक्षा पत्र्याचा भाग कापून आत प्रवेश केला आणि मोठ्या प्रमाणात साहित्य लंपास केले. मात्र, या प्रकाराची माहिती तत्काळ का मिळाली नाही?, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
जलतरण तलाव सुरू होण्याआधीच साहित्य चोरीला
सदर जलतरण तलाव ठेकेदारांना भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी देण्यात आला आहे. येत्या दहा दिवसांत तलाव सुरू करण्याच्यादृष्टीने तयारी सुरू होती. मात्र, सुरू होण्यापूर्वीच आवश्यक साहित्य चोरीला गेल्याने तलाव सुरू करण्याच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक वापरासाठी असलेल्या महापालिकेच्या मालमत्तेची सुरक्षा करण्यासाठी सुरक्षारक्षक तैनात असतानाही चोरीची घटना घडल्याने प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रशासन जबाबदारी निश्चित करणार का?
सुरक्षा पत्र्याची भिंत कापून चोरट्यांनी प्रवेश करणे, चोरीची माहिती तीन दिवसांनंतर समोर येणे, या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. चोरीला गेलेल्या साहित्यांचा शोध घेऊन संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी. तसेच, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. आता या प्रकरणी महापालिका प्रशासन काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.
या घटनेची माहिती मिळताच संबंधित ठिकाणी पर्यवेक्षकांना पाठविण्यात आले आहे. तसेच. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात येणार आहे. सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षा व्यवस्था, सुरक्षा रक्षक विभागाला आवश्यक ती कारवाई करण्यासाठी पत्र देण्यात येणार आहे. या प्रकरणाची दखल घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.
पंकज पाटील, उपायुक्त, क्रीडा विभाग, महापालिका
कासरवाडी परिसरातील सीतांगण उद्यान, पाण्याची टाकी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावासह दापोडी-फुगेवाडी प्रभागातील महापालिकेच्या ठिकाणी रात्रीच्यावेळी सुरक्षारक्षकांची नेमणूक नसते. त्यामुळे अशा चोरीच्या घटना घडत आहेत. रात्रीच्या पाळीसाठी सुरक्षारक्षक असणे आवश्यक आहे.
प्रतीक्षा जवळकर, नगरसेविका