

महेश भागीवंत
पिंपरी: दिवाळीच्या सुट्यांमध्ये पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या पिंपरी-चिंचवडकरांचा यंदा देशांतर्गत पर्यटनाकडे कल वाढल्याचे चित्र आहे. विमान प्रवासाचे वाढलेले दर, परदेशातील हॉटेलचा खर्च, व्हिसा प्रक्रिया आणि पर्यटनासाठी लागणारा एकूण खर्च यामुळे अनेकांनी परदेशवारीचा बेत बदलला आहे. त्याऐवजी देशातील विविध राज्यांमधील पर्यटनस्थळांना पसंती दिली जात आहे. विशेषतः दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू तसेच थंड हवेची ठिकाणे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.
दरवर्षी दिवाळीच्या सुट्यांचे नियोजन करताना अनेक कुटुंबे परदेशातील पर्यटनस्थळांना पसंती देतात. त्यासाठी काही महिने आधीच विमान तिकिटे आणि हॉटेलचे बुकिंग केले जाते. मात्र, यंदा विमान प्रवासाच्या वाढत्या दरांमुळे पर्यटनाचे आर्थिक गणित बदलले आहे. कुटुंबातील चार ते पाच सदस्यांचा प्रवास, निवास, जेवण आणि स्थानिक पर्यटनाचा खर्च विचारात घेता परदेशवारीचा खर्च वाढत असल्याने पर्यटकांनी देशातील पर्यटनस्थळांचा पर्याय निवडला आहे.
यंदा परदेशी सहलींच्या तुलनेत देशांतर्गत पर्यटनाबाबत नागरिकांकडून अधिक चौकशी होत आहे. विशेषतः केरळ, तामिळनाडू आणि थंड हवेच्या ठिकाणांसाठी पर्यटक विचारणा करत आहेत. विमान प्रवासाचे वाढलेले दर आणि परदेशातील एकूण खर्च यामुळे अनेक ग्राहक देशांतर्गत सहलींचा पर्याय निवडत आहेत," असे एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने सांगितले.
कमी अंतरातील सहलींना प्राधान्य
कमी अंतरातील सहली, चार ते सहा दिवसांचे पर्यटन पॅकेज, धार्मिक स्थळे आणि निसर्गरम्य ठिकाणांचा समावेश असलेल्या सहलींना पसंती मिळत आहे. सुट्यांचा कालावधी, प्रवासाचा वेळ आणि एकूण खर्च यांचा ताळमेळ साधून नागरिक सहली निश्चित करत आहेत.
भारतातील पर्यटनस्थळांना पसंती
निसर्गरम्य परिसर, थंड हवामान, चहाचे मळे, समुद्रकिनारे आणि धार्मिक पर्यटन यांचा अनुभव एकाच सहलीत घेता येत असल्याने दक्षिण भारताला प्राधान्य दिले जात आहे.
प्रवास खर्च वाढल्याने पर्यटनाचे बजेट बदलले
विमान तिकिटांच्या दरांमध्ये होणारे चढ-उतार पर्यटकांच्या नियोजनावर परिणाम करत आहेत. विशेषतः सणासुदीच्या काळात प्रवासाचे दर वाढल्याने अनेकांना नियोजित बजेटमध्ये परदेशवारी करणे कठीण होत आहे. त्यामुळे रेल्वे, खासगी बस आणि स्वतःच्या वाहनाने करता येणाऱ्या देशांतर्गत सहलींकडे पर्यटकांचा कल वाढत आहे.
दिवाळीच्या सुट्यांमध्ये बाहेर फिरायला जायचे होते. परदेशवारीचा खर्च अपेक्षेपेक्षा अधिक असल्याने दक्षिण भारतातील पर्यटनस्थळांना पसंती दिली. देशातही फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे असून प्रवासाचा आनंद घेता येतो.
वैभव माने, नागरिक
यंदा परदेशात जाण्याचा विचार होता. मात्र, विमान तिकिटांचे दर आणि इतर खर्च पाहता तो बेत बदलला. कुटुंबासह केरळला जाण्याचे नियोजन केले आहे. कमी खर्चात निसर्गरम्य ठिकाणांचा आनंद घेता येणार असल्याने हा पर्याय निवडला.
सूरज भालके, नागरिक