Pimpri Chinchwad Municipal Corporation Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Property Tax Recovery: पिंपरी-चिंचवडमध्ये थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करा; अतिरिक्त आयुक्तांचे सक्त आदेश

मालमत्ताकर वसुलीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश; दिरंगाई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: मालमत्ताकराची थकबाकी, मालमत्ता जप्तीची कारवाई, मालमत्ता हस्तांतरणाची प्रकरणे, सारथी पोर्टलवरील प्रलंबित तक्रारी तसेच, मागील बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी घेतला. मालमत्ता जप्तीची कठोर कारवाई करून वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्याच्या त्यांनी करसंकलन विभागास सक्त सूचना दिल्या आहेत.

या बैठकीत उपायुक्त सचिन पवार, प्रशासन अधिकारी रश्मी देशपांडे, सहायक मंडल अधिकारी बाळू लोंढे, हनुमंत सरवदे, मनोज शिंदे, अजित नखाते, रणजित भोसले, जयंत मरळीकर, राजेश बांदल, रवींद्र शिंदे, राजेंद्र कुदळे, प्रसाद एच. एस, राकेश सौदे, अतुल काळे, नाना सोनटके, निता राणे, डी. डी. गोरडे, हनुमंत मोरे, मिलिंद कांबळे आदी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर म्हणाल्या, की चालू आर्थिक वर्षासाठी निश्चित करण्यात मालमत्ताकर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांनी नियोजनबद्ध आणि प्रभावीपणे काम करावे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात मालमत्ताकराच्या उत्पन्नाचा मोठा वाटा असतो.

या उत्पन्नाच्या आधारे विविध विकासकामे व नागरी सुविधांसाठी आर्थिक नियोजन करण्यात येते. त्यामुळे मालमत्ताकर वसुलीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्व सहायक मंडल अधिकार्‍यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात नियोजनबद्ध करवसुली मोहीम राबवून निश्चित केलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे. करवसुलीच्या कामात दिरंगाई करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उपाययोजना आवश्यक

मालमत्ताकर वसुली वाढविण्यासाठी प्रत्येक मंडल अधिकार्‍याने आपल्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीचा अभ्यास करून प्रभावी उपाययोजनांचे नियोजन करावे. करवसुलीची आकडेवारी वाढविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत, याबाबतची लेखी माहिती सादर करावी. मागील पाच वर्षांतील मालमत्ता कर संकलनाच्या आकडेवारीची तुलना करून चालू वर्षातील करवसुलीचा आढावा घेण्यात येणार आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा करवसुलीत अपेक्षित वाढ होणे आवश्यक असून, करवसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी अधिक जबाबदारीने काम करावे. थकबाकीदारांविरुद्ध जप्तीची कारवाई करावी. करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या कठोर उपाययोजना करताना कोणतीही दिरंगाई करू नये, असे त्यांनी सूचना केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT