पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील निवासी व बिगरनिवासी मालमत्ताधारकांनी सन 2025-26 या आर्थिक वर्षातील 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या पहिल्या सहामाहीत एकूण 606 कोटी रुपयांचा मालमत्ताकर भरला आहे. त्यात दरवर्षीप्रमाणे ऑनलाईन माध्यमातून बिल भरण्यास नागरिकांनी पसंती दिली आहे. (Latest Pimpri chinchwad News)
शहरातील एकूण 7 लाख 35 हजार निवासी व बिगरनिवासी मालमत्ताधारकांची नोंद महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे आहे. एक एप्रिल ते 30 जूनपर्यंत मालमत्ताकर भरल्यास सामान्यकरात 10 टक्के सलवत देण्यात आली. पहिल्या तीन महिन्यांत 30 जूनपर्यंत 522 कोटी 72 लाख रुपयांचा भरणा महापालिका तिजोरीत झाला आहे. एकूण 4 लाख 12 हजार नागरिकांनी बिल भरत सवलतीचा लाभ घेतला आहे.
त्यानंतर पुढील तीन महिन्यांत बिल भरल्यास सामान्यकरात 4 टक्के सलवत देण्यात आली. त्यात 30 सप्टेंबरपर्यंत एकूण 606 कोटी रुपयांचा मालमत्ताकर जमा झाला आहे. या आकडेवारीवरून 1 जुलै ते 30 सप्टेंबर या तीन महिन्यांत केवळ 84 कोटींचा भरणा झाल्याचे दिसत आहे. पहिल्या तीन महिन्यांची तुलना केल्यास ही रक्कम कमी आहे.
तीन महिन्यांत केवळ 84 कोटींचा भरणा
आर्थिक वर्षांच्या पहिल्या तीन महिन्यांत तब्बल 522 कोटी 72 लाख रुपयांचा विक्रमी भरणा महापालिका तिजोरीत झाला. शहरातील मालमत्ताधारकांनी बिल भरण्यास प्रतिसाद दिला. मात्र, पुढील तीन महिन्यांत नागरिकांचा प्रतिसाद थंडावला आहे. एक जुलै ते 30 सप्टेंबर या तीन महिन्यांत केवळ 84 कोटी रुपये जमा झाले आहेत.
पुढील सहा महिन्यात 444 कोटी वसुलीचे टार्गेट
महापालिकेच्या कर संकलन विभागावर सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 1 हजार 50 कोटी रूपये वसुलीचे उद्दिष्ट आहे. आर्थिक वर्षांतील पहिल्या सहा महिन्यांत केवळ 606 कोटी रूपये महापालिका तिजोरीत जमा झाले आहेत. पुढील सहा महिन्यांत तब्बल 444 कोटी रूपयांची वसुली करावी लागणार आहे. आगामी काळात महापालिकेची निवडणूक होऊ शकते. त्यासाठी महापालिकेचा तसेच, कर संकलन विभागाचा बहुतांश मनुष्यबळही निवडणूक कामात व्यस्त असणार आहे. त्यामुळे मालकत्ताकर वसुलीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अडीच लाखांपेक्षा अधिक मालमत्तांचा शोध
शहरातील नोंद नसलेल्या निवासी व बिगरनिवासी मालमत्ता शोधण्यासाठी महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत ड्रोन सर्वेक्षण केले. त्या एजन्सीने अडीच लाखांपेक्षा अधिक नोंद नसलेल्या व वाढीव बांधकाम केलेल्या मालमत्तांचा शोध घेतला आहे. त्या मालमत्ताधारकांकडून मालमत्ताकर वसुल करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्ताकरात मोठी वाढ झाली आहे. ती वाढ 1 एप्रिल ते 30 जून या पहिल्या तीन महिन्यात दिसून आली.
उद्दिष्ट पूर्ण करू :
सामान्यकरावर सवलतीची मुदत संपल्याने मालमत्ताकर भरण्याचे प्रमाण कमी होते. हे दरवर्षीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. तसेच, अनेक कर्मचाऱ्यांच्या इतर विभागात बदल्या झाल्या. पुढील सहा महिन्यात कर संकलन विभागाकडे असलेले एकूण 1 हजार 50 कोटींचे उद्दिष्टपूर्ण केले जाईल. ऑक्टोबर महिन्यात थकबाकीदारांना जप्तीचा नोटीसा बजावण्यात येणार आहेत. त्यानंतर जप्ती कारवाई तीव करण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीस कालावधी असल्याने त्यापूर्वीच वसुली मोहिम अधिक तीव केली जाईल. कर संकलन विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्याप्रमाणे सक्त सूचना देण्यात आल्या आहेत, असे कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.