Pimpri Chinchwad Police Zone Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Police Zone Restructuring: पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची परिमंडळ फेररचना

तीनऐवजी चार परिमंडळ; आयटी पार्क व औद्योगिक भागांसाठी स्वतंत्र नियोजन, कायदा-सुव्यवस्थेला बळ

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात वाढती लोकसंख्या, झपाट्याने विस्तारत असलेले औद्योगिक व आयटी क्षेत्र, तसेच बदलती भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारितील झोनची (परिमंडळ) फेररचना करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखता यावी, पोलिस यंत्रणेवरचा ताण समतोल राहावा, या उद्देशाने ही नवी रचना करण्यात आल्याचे पोलिस आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

तीनऐवजी चार परिमंडळ

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात यापूर्वी तीन परिमंडळ कार्यालय होती. मात्र, प्रशासकीय सोयीसह भौगोलिक विचार करत आता तीनऐवजी चार परिमंडळांची रचना करण्यात आली आहे. या चारही परिमंडळांचे प्रमुख पोलिस उपायुक्त दर्जाचे अधिकारी असणार असून, सर्व परिमंडळांवर अपर पोलिस आयुक्त (प्रादेशिक) बसवराज तेली यांचे नियंत्रण राहणार आहे. तर, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड यांच्याकडे गुन्हे शाखा, विशेष शाखा आणि वाहतूक शाखेची संपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नव्या रचनेनुसार परिमंडळ क्रमांक 1 मध्ये पिंपरी आणि सांगवी अशी दोन सहायक पोलिस आयुक्त कार्यालये असतील. सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी यांच्या अखत्यारीत निगडी, पिंपरी आणि चिंचवड ही पोलिस ठाणे आहेत. तर सहायक पोलिस आयुक्त सांगवी यांच्या अखत्यारीत संत तुकारामनगर, दापोडी आणि सांगवी पोलिस ठाण्यांचा समावेश करण्यात आला आहे.

आयटी पार्क क्षेत्रात स्वतंत्र व सक्षम नियोजन

परिमंडळ क्रमांक 2 मध्ये हिंजवडी आणि वाकड ही दोन सहायक पोलिस आयुक्त कार्यालये असतील. सहायक पोलिस आयुक्त, हिंजवडी यांच्या अखत्यारीत हिंजवडी आणि बावधन ही दोन पोलिस ठाणे राहतील. तर, सहायक पोलिस आयुक्त, वाकड यांच्या अखत्यारीत वाकड, काळेवाडी आणि रावेत ही तीन पोलिस ठाणे असणार आहेत. आयटी पार्क, नव्या वसाहती आणि दळणवळणाच्या मुख्य मार्गांमुळे संवेदनशील ठरणाऱ्या या भागासाठी स्वतंत्र व सक्षम नियोजन करण्यात आले आहे.

औद्योगिक पट्‌‍ट्याचा मोठा भार असलेल्या भागासाठी परिमंडळ क्रमांक 3 रचना करण्यात आली आहे. या परिमंडळात चाकण आणि भोसरी अशी दोन सहायक पोलिस आयुक्त कार्यालये असतील. सहायक पोलिस आयुक्त, चाकण यांच्या अखत्यारीत चाकण उत्तर, चाकण दक्षिण आणि आळंदी ही पोलिस ठाणे येतील. तर, सहायक पोलिस आयुक्त, भोसरी यांच्या अखत्यारीत भोसरी एमआयडीसी, दिघी आणि भोसरी ही पोलिस ठाणे राहतील.

शहराच्या उत्तरेकडील आणि वेगाने विस्तारत असलेल्या भागासाठी परिमंडळ क्रमांक चारची स्वतंत्र रचना करण्यात आली आहे. या परिमंडळात देहूरोड आणि महाळुंगे अशी दोन सहायक पोलिस आयुक्त कार्यालये असतील. सहायक पोलिस आयुक्त, देहूरोड यांच्या अखत्यारीत चिखली, देहूरोड आणि शिरगाव ही पोलिस ठाणे येतील. तर, सहायक पोलिस आयुक्त, महाळुंगे यांच्या अखत्यारीत तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, उत्तर महाळुंगे आणि दक्षिण महाळुंगे ही चार पोलिस ठाणे असणार आहेत.

स्वतंत्र जबाबदाऱ्या निश्चित

गुन्हे तपास आणि विशेष युनिट्‌‍सच्यादृष्टीने स्वतंत्र जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. पोलिस उपायुक्त शिवाजी पवार यांच्याकडे गुन्हे शाखेचा कार्यभार असून, त्यांच्या अखत्यारीत युनिट एक ते चार, दरोडा विरोधी पथक, गुंडाविरोधी पथक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग, आर्थिक गुन्हे शाखा, अमली पदार्थ विरोधी पथक, खंडणी विरोधी पथक, पीसीबी, एमओबी तसेच सायबर पोलिस ठाणे कार्यरत राहणार आहे. पोलिस उपायुक्त प्रदीप जाधव यांच्याकडे विशेष शाखा एक व दोनचा कार्यभार देण्यात आला आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांच्याकडे तर प्रशासनाचा चार्ज पोलिस उपायुक्त गणेश इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

कामात समन्वय वाढणार

ही नवी परिमंडळ रचना लागू झाल्याने नागरिकांना आपल्या परिसराचे पोलिस ठाणे, संबंधित परिमंडळ आणि वरिष्ठ अधिकारी याबाबत स्पष्ट माहिती मिळणार आहे. तक्रार नोंदणी, गुन्हे तपास, बंदोबस्त आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कामात समन्वय वाढेल, असा विश्वास पोलिस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत असून, सुटसुटीत रचना आणि जलद प्रतिसाद हे या फेररचनेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT