संतोष शिंदे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्तालयातील आठ पोलिस ठाण्यांमध्ये अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आलेले नाहीत. यामध्ये नव्याने स्थापन झालेल्या पोलिस ठाण्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यभरातील सर्व पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वीच घेण्यात आला असतानाही शहरातील या आठ ठिकाणी व्यवस्था कार्यान्वित नसल्याने सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलिस ठाणे हे नागरिकांच्या तक्रारी, गुन्हे नोंदणी, चौकशी प्रक्रिया आणि कोठडी व्यवस्थापन यांचे प्रमुख केंद्र असल्याने तेथे सीसीटीव्ही व्यवस्था अत्यावश्यक मानली जाते. चौकशी कक्ष, प्रवेशद्वार, तक्रार नोंदणी कक्ष अशा संवेदनशील ठिकाणी कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. पारदर्शकता वाढविणे, कायदेशीर प्रक्रियेचे संरक्षण करणे आणि जबाबदारी निश्चित करणे हा या सीसीटीव्ही यंत्रणेचा मुख्य उद्देश आहे.
पोलिस ठाणे सुरक्षिततेचे केंद्र
नागरिकांच्या दृष्टीने पोलिस ठाणे हे सुरक्षिततेचे केंद्र आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि राज्य शासनाच्या धोरणानुसार सर्व ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही व्यवस्था तातडीने कार्यान्वित व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पारदर्शक आणि जबाबदार पोलिसिंगसाठी ही पायाभूत सुविधा पूर्ण क्षमतेने सुरू होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
खासगी सीसीटीव्हीवर मदार; दर्जाबाबत प्रश्न
शहरातील नव्याने सुरू झालेल्या काही पोलिस ठाण्यांमध्ये अधिकृत सीसीटीव्ही प्रणाली कार्यान्वित नसल्याने प्रभारी अधिकाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात खासगी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याची माहिती आहे. मात्र, या कॅमेऱ्यांना तांत्रिक व कायदेशीर मर्यादा येतात. खासगी कॅमेऱ्यांची रिझोल्यूशन, स्टोरेज क्षमता, ऑडिओ रेकॉर्डिंग सुविधा तसेच नियंत्रण कक्षाशी थेट जोडणी यामध्येदेखील मर्यादा येतात.
कामकाजात पारदर्शकता हा हेतू
देशातील सर्व पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर 2020 मध्ये महत्त्वपूर्ण आदेश दिले होते. कोठडीतील अत्याचार रोखणे, नागरिकांचे मूलभूत हक्क संरक्षित करणे आणि पोलिसांच्या कामकाजात पारदर्शकता आणणे हा या आदेशामागील हेतू होता. त्यानंतर राज्य सरकारे आणि पोलिस महासंचालक कार्यालयांनी टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू केली.
महासंचालक कार्यालयाकडून आढावा
महाराष्ट्रात 2018 ते 2020 या कालावधीत नियोजन आणि निधीवाटपास सुरुवात झाली. राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही बसविण्याचा आराखडा तयार करून त्यानुसार कॅमेरे बसविण्यात आले. महासंचालक कार्यालयाकडून जिल्हानिहाय आणि आयुक्तालयनिहाय प्रगतीचा आढावा घेतला जात आहे. बहुतांश जुन्या व कार्यरत ठाण्यांमध्ये कॅमेरे बसवून ते नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले आहेत. काही ठिकाणी ऑडिओ रेकॉर्डिंगसह प्रणाली कार्यरत आहे.
सीसीटीव्ही विश्वासार्हतेची हमी
सीसीटीव्ही प्रणालीमुळे चौकशीदरम्यान होणाऱ्या प्रत्येक हालचालींची नोंद राहते. कोठडीतील स्थितीचे निरीक्षण करता येते. तक्रारदार किंवा आरोपी यांच्याशी वर्तणुकीबाबत वाद निर्माण झाल्यास व्हिडिओ पुरावा उपलब्ध होतो. पोलिसांवर होणाऱ्या खोट्या आरोपांपासून संरक्षण मिळते, तर नागरिकांनाही प्रक्रियेवर विश्वास वाटतो. त्यामुळे ही व्यवस्था केवळ देखरेखीपुरती मर्यादित नसून विश्वासार्हतेची हमी मानली जाते.
...तर तपास प्रक्रियेत अडचणी
शहरात वाढत्या सायबर गुन्हे, मालमत्ता गुन्हे आणि महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्यांची पायाभूत सुविधा सक्षम असणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत सीसीटीव्ही कार्यरत नसल्यास तपास प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील इतर सर्व ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही व्यवस्था कार्यरत असून, नियंत्रण कक्षातून देखरेख केली जात आहे. संबंधित आठ ठाण्यांतील कॅमेरे लवकरच कार्यान्वित करण्यात येतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
तांत्रिक चाचण्या प्रक्रियेमुळे विलंब
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील आठ नव्या ठाण्यांमध्ये कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया अद्याप पूर्णत्वास गेलेली नसल्याचे सांगितले जात आहे. आयुक्त कार्यालयाकडून संबंधित ठाणे अलीकडेच सुरू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नेटवर्क कनेक्टिव्हिटी, डेटा स्टोरेज सर्व्हरशी जोडणी, नियंत्रण कक्षाशी समन्वय आणि तांत्रिक चाचण्या या प्रक्रियांमुळे कार्यान्वयास विलंब होत असल्याचे पोलिस प्रशासनाचे म्हणणे आहे.