Pimpri Wakad Tree Cutting Issue: पिंपरीत सर्व्हिस रस्ता व मेट्रोसाठी 1,375 झाडांची कत्तल

एनएचएआयला परवानगी; 16 हजार झाडे लावण्याचे बंधन, पर्यावरणप्रेमींचा आक्षेप
Tree Cutting
Tree CuttingPudhari
Published on
Updated on

पिंपरी: भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) वतीने मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या (एक्सप्रेस वे) लगत असलेल्या सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी हजारो झाडांचा बळी घेतला जाणार आहे. शहरातील वाढती वाहतूककोंडी कमी करण्यासाठी सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. तसेच, वाकडे मेट्रो स्टेशनला अनेक झाडे अडथळा ठरत आहेत. त्या दोन्ही कामांसाठी तब्बल 1 हजार 375 झाडांची कत्तल केली जाणार आहे. सुसाट एक्सप्रेस वे आणि मेट्रोसाठी शहराचे हरितक्षेत्र कमी होणार आहे.

Tree Cutting
Vadgaon Maval Land Record Office Issue: वडगाव मावळ भूमिअभिलेखचा कारभार प्रभारीच्या हाती!

महामार्गालगत सूर्या रुग्णालय, वाकड ते मुकाई चौक, किवळे मार्गावर दोन्ही बाजूंनी असलेल्या सर्व्हिस रस्त्यांचे रुंदीकरण, काँक्रीटीकरण, ड्रेनेजलाईन व्यवस्था आणि पादचारी मार्ग विकसित करण्यात येणार आहेत. या कामात पूर्ण वाढलेली झाडे अडथळा ठरत असल्याचे एनएचआयकडून सांगितले जात आहे. रस्ता रुंदीकरणासाठी ती झाडे काढून टाकण्यात येणार आहे. त्यांचे पुनर्रोपण केले जाईल, असा दावा केला जात आहे.

ती 1 हजार 375 झाडे काढण्याबाबत एनएचआयने पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे परवानगी मागितली होती. त्याअनुषंगाने उद्यान विभाग व शहरी दळणवळण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित रस्त्यांची पाहणी केली. पाहणीनंतर रस्त्याचा विकास करत असताना अडथळा ठरणारी झाडे काढण्यास एनएचएआयला परवनागी देण्यात आली आहे. तब्बल 1 हजार 375 झाडे मुळासकट काढून टाकण्यात येणार आहेत. वाकड येथील मेट्रो स्टेशन परिसरात असलेली मोठ्या प्रमाणातील झाडे देखील काढण्यात येणार आहेत. मेट्रो प्रकल्प, सर्व्हेिस रस्ता आणि इतर पायाभूत सुविधा यांचा समन्वय साधताना झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाणार आहे.

Tree Cutting
Moshi Power Cut Issue: मोशी प्राधिकरणात विजेचा लपंडाव; नागरिक हैराण

दरम्यान, एनएचआय प्रशासनाकडून झाडांचे पुनर्रोपण करण्यात येईल, प्रत्येक तोडलेल्या झाडाच्या बदल्यात अनेक झाडे लावली जातील. पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत राहील, असे आश्वासन देण्यात येत आहे; मात्र पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, पूर्ण वाढलेल्या झाडांचे पुनर्रोपण करणे ही अत्यंत जिकिरीची प्रक्रिया असून, त्यातील यशाचे प्रमाण कमी असते. अनेकदा कागदोपत्री पुनर्रोपण दाखवले जाते. प्रत्यक्षात झाडे जगण्याचे प्रमाण नगण्य असते, असे वृक्षप्रेमींचे मत आहे.

वाकड, पुनावळे, ताथवडे, थेरगाव व पिंपळे गुरव या परिसरातील नागरिकांनी या झाडे तोडण्याच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. शहरातील वाढते तापमान, कमी होत चाललेली हरितक्षेत्रे आणि वाढते प्रदूषण लक्षात घेता, हजारो झाडांची कत्तल हा पर्यावरणासाठी मोठा धक्का ठरेल, असे मत व्यक्त केले जात आहे. सर्व्हिस रस्ता विकसित करताना पर्यायी आराखडा तयार करून शक्य तितकी झाडे वाचवावीत, अशी मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे.

Tree Cutting
Pimpri Chinchwad International Parcel Service: पिंपरी-चिंचवडमध्ये परदेशी पार्सलसाठी टपाल खात्याची विशेष सुविधा

परवानगी मिळाल्याने झाडे तोडणार

सर्व्हिस रस्ता आणि वाकड मेट्रो स्टेशनच्या कामासाठी झाडे तोडण्यास पर्यावरण विभागाची परवानगी, वृक्ष प्राधिकरणाची मान्यता मिळाली आहे. तसेच, सार्वजनिक हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्या कामास अडथळा ठरणारी झाडे तोडण्यात येणार आहेत.

केवळ 247 झाडांचे पुनर्रोपण

महापालिकेच्या उद्यान विभागाने दिलेल्या परवानगीनुसार, 1 हजार 375 झाडांपैकी केवळ 247 झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. उर्वरित 1 हजार 128 झाडे ही विदेशी व झुडपे स्वरुपाची असल्याने त्यांचे पुनर्रोपण करण्यात येणार नाही. या संपूर्ण 1 हजार 375 झाडांचे एकूण वय 16 हजार 486 असल्याने त्यांच्या वयाइतके 16 हजार 486 वृक्ष लावण्याचे बंधन एनएचएआयला घालण्यात आले आहे. त्यानुसार एनएचआय झाडे लावणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोणत्या ठिकाणी झाडांचे पुनर्रोपण करणार व 16 हजार झाडे कुठे लावणार, याचे उत्तर अद्याप देण्यात आलेले नाही.

Tree Cutting
PCMC Pavanathadi Jatra 2026: पवनाथडी जत्रेला आजपासून सुरुवात; सांगवीत 1 मार्चपर्यंत रंगणार उत्सव

देशी जातीची झाडे

कुडुनिंब, गुलमोहर, चंदन, आंबा, काशिद, बहावा, खैर, पेरू, सुबाभूळ, जांभुळ, जंगलीबोर, बदाम, फणस, निलगिरी, भेंडी, बेहडा, सीताफळ, करंज, रामफळ, सुपारी, काटेरी बाभूळ, तपशी, पिंपळ, उंबर, आवळा, आकाशनीम, चेरी, अर्जुन, चिंच, सोनचाफा, चिकू, बेल, आवळा जातीची ती पूर्ण वाढ झालेली झाडे आहेत. ती देशी जातीची झाडे पूर्णपणे तोडण्यात येणार आहेत.

16 हजार झाडे लावणे बंधनकारक

मेट्रो आणि सर्व्हिस रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारी झाडे काढण्याची परवानगी महापालिकेच्या उद्यान विभागाने दिली आहे. मात्र, संबंधित प्रशासनाला या झाडांचे पुनर्रोपण करणे व झाडांच्या एकूण वयाइतके 16 हजार वृक्ष लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मियावाकी पद्धतीने शहरात इतर ठिकाणी झाडे लावण्यात येणार आहेत, असे महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news