Police Action Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Illegal Liquor Raid: फुगेवाडी दारूकांडानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मोठा धडाका; 50 ठिकाणी छापे

अवैध दारू व्यवसायावर कारवाई तीव्र; झोपडपट्टी, नदीकाठ व औद्योगिक भागांमध्ये संयुक्त धाडसत्र

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: फुगेवाडी विषारी दारूकांडानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवैध दारू व्यवसायाविरोधात आक्रमक भूमिका घेत शहरभर धाडसत्र सुरू केले आहे. मागील दोन दिवसांत विविध पोलिस ठाण्यांच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत तब्बल 50 ठिकाणी छापे टाकले असून, अनेक अवैध दारूअड्डे, ताडी सेंटर आणि हातभट्टी दारू विक्रीची ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत. याशिवाय राज्य उत्पादन शुल्क विभागानेही स्वतंत्र कारवाई मोहीम राबवत शहर व परिसरातील संशयित ठिकाणांची तपासणी सुरू केली आहे.

फुगेवाडी परिसरातील विषारी दारू प्रकरणात 14 नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर शहर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या घटनेनंतर पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी तातडीची बैठक घेऊन अवैध दारू व्यवसायांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, सर्व झोनमधील उपायुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि गुन्हे शाखेच्या पथकांना त्यांच्या हद्दीतील अवैध धंद्यांची माहिती संकलित करून तातडीने धाडसत्र राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मागील दोन दिवसांत शहरातील झोपडपट्टी भाग, नदीकाठ परिसर, मोकळ्या जागा, औद्योगिक वसाहतीलगतचे भाग तसेच अवैध दारू विक्रीसाठी कुप्रसिद्ध ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे ड्रम, रसायने, कच्चा माल, तयार दारूचा साठा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काही ठिकाणी ताडी सेंटरची तपासणी करून परवान्यांच्या अटींची पडताळणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन, परवान्याच्या अटींचा भंग किंवा संशयास्पद व्यवहार आढळलेल्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागानेही पिंपरी-चिंचवड, भोसरी, चिखली, दापोडी, फुगेवाडी आणि शहरालगतच्या काही भागांत स्वतंत्र तपासणी मोहीम सुरू केली आहे. विभागाच्या पथकांनी हातभट्टी दारू तयार होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांवर छापे टाकून माहिती संकलन सुरू केले आहे. अवैध दारू निर्मिती आणि विक्रीच्या साखळीतील संबंधित व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. फुगेवाडी दारूकांडामुळे शहरातील अवैध दारू नेटवर्कचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः झोपडपट्टी भाग, नदीकाठ आणि काही वस्त्यांमध्ये सुरू असलेल्या हातभट्टी दारूच्या व्यवसायाबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी होत होत्या.

मात्र, या प्रकरणानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात समन्वित कारवाई सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. पोलिसांकडून केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता दारू तयार करणारे, पुरवठादार, साठवणूकदार आणि वितरण साखळीतील प्रमुख व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्व पोलिस ठाण्यांना त्यांच्या हद्दीतील संशयित अड्ड्यांची यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून, येत्या काही दिवसांत ही मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

दारूकांडानंतर सुरू झालेल्या या धाडसत्रामुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अनेक ठिकाणी अड्डे बंद ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. फुगेवाडीतील दुर्घटनेनंतर सुरू झालेली ही मोहीम तात्पुरती न राहता सातत्याने सुरू राहते का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT