

राजश्री अतकरे
सांगवी: सांगवीत देशातील आधुनिक संकल्पनेवर आधारित अर्बन 95 पार्क उभारण्यात आला आहे. वयाच्या पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मेंदूच्या विकासासाठी महापालिकेने खास उपक्रम राबविला आहे. मोबाईल स्क्रीन आणि डिजिटल गेमिंगच्या विळख्यात अडकलेल्या आजच्या पिढीला पुन्हा मैदानी खेळांकडे वळवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक अत्यंत कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.
सांगवीतील मधुबन सोसायटी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संकल्पनेवर आधारित ‘अर्बन 95 नर्चरींग नेबरहुड्स’ हा नावीन्यपूर्ण प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांच्या हक्काची खेळण्याची जागा म्हणून हे उद्यान विकसित करण्यात आले असून, प्रत्येक प्रभागात असे किमान एक उद्यान असावे, असा महापालिकेचा मानस आहे.
बालपणातील पहिले 5 वर्षे हे मुलांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. मानवी मेंदूचा जवळपास 80 ते 90 टक्के विकास याच वयात होतो. मात्र, शहरातील बहुतांश उद्यानांमध्ये केवळ घसरगुंडी किंवा झोपाळ्यांसारखी मर्यादित खेळणी असतात. हीच अडचण ओळखून महापालिकेने ”डब्ल्यूआरआय इंडिया”च्या तांत्रिक सहकार्याने या उद्यानाचा कायापालट केला आहे. येथे मुलांच्या पंचेंद्रियांचा विकास आणि सूक्ष्म कौशल्यांना चालना देणारे आधुनिक खेळ प्रकार आणले आहेत.
घरात मोबाईलमध्ये रमणारी माझी 4 वर्षांची मुलगी आता या उद्यानात येण्यासाठी आवर्जून हट्ट धरते. पारंपरिक उद्यानांपेक्षा हा बदल नक्कीच सुखावणारा आहे. पण महापालिकेने या आधुनिक उपकरणांच्या देखभालीकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी भावना भावना जगताप यांनी व्यक्त केली.
..या खेळांचा समावेश
सॅण्ड पिट : मातीत खेळण्यातून कल्पकता वाढवण्यासाठी.
क्लाइंबिंग वॉल : मुलांमधील शारीरिक ताकद आणि साहस वाढवण्यासाठी.
रेलिंग लॉग : शरीराचा समतोल साधण्याचे कौशल्य शिकण्यासाठी.
या प्रकल्पाचा उद्देश
पालक आणि मुलांमध्ये यामुळे संवाद वाढणार आहे. केवळ मुलांना खेळवणे एवढाच या प्रकल्पाचा हेतू नाही. मुले खेळत असताना पालकांनी त्यांच्याशी कसा संवाद साधावा, त्यांना साहसी खेळांसाठी कसे प्रवृत्त करावे, यासाठी उद्यानात विशेष ’संदेश फलक’ लावण्यात आले आहेत. तसेच पालकांसाठी उत्तम बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या स्थापत्य, उद्यान आणि क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
सध्या ‘अ’, ‘ड’ आणि ‘ह’ प्रभागात ही संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यासाठी महापालिकेवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार टाकण्यात आलेला नाही. नियमित बजेटमधूनच या जागा विकसित केल्या जात असून, आगामी काळात शहरातील इतर चालू आणि नवीन प्रकल्पांमध्येही अशा जागा तयार केल्या जातील.
राजश्री सातलीकर, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य उद्यान, मनपा