

पिंपरी: केंद्र सरकारने वन नेशन वन स्टुडंट आयडी योजनेअंतर्गत देशभरातील शालेय विद्यार्थ्यांचा अपार क्रमांक तयार करण्याचे आदेश दिले आहेत. अपार आयडी हा विद्यार्थ्या भविष्याच्यादृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, सध्या पोर्टल बंद असल्याने अपार आयडी करण्याची प्रक्रिया थांबली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर हे पोर्टल सुरू होणार आहे.
उच्च शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व विद्यापीठांना या संदर्भातील निर्देश दिले आहेत. यानुसार सर्व संलग्न महाविद्यालये, स्वायत्त संस्था आणि पदव्युत्तर विभागांमधील विद्यार्थ्यांची 100 टक्के अपार आयडी नोंदणी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरात 86 टक्के अपार आयडीचे काम पूर्ण झाले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत देशात एक राष्ट्र, एक विद्यार्थी ओळख या संकल्पनेतून अपार आणि शैक्षणिक श्रेयांक बँक प्रणाली कार्यान्वित केली आहे. यानुसार, प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचा 12 अंकी अपार आयडी तयार करणे आणि तो आधार कार्ड व डिजिलॉकरशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
अपार आयडी नसल्यास काय होणार?
अपार कार्डचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक क्रेडिट, पदव्या आणि इतर माहिती ऑनलाइन संकलित करणे हा आहे. अपार ओळखपत्र हा आजीवन क्रमांक आहे. जे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा आणि त्यांच्या यशाचा मागोवा घेईल. यासोबतच एका शाळेतून दुसऱ्या शाळेत बदलीची प्रक्रिया सुलभ होणार आहे. हे कार्ड प्रत्येक विद्यार्थ्याला शाळा आणि महाविद्यालयांकडून दिले जात आहे. मात्र, अपार आयडी नसल्यास प्रवेश प्रक्रियेत अडथळे येतात. सरकारी शिष्यवृत्त्या आणि इतर शैक्षणिक योजनांचा लाभ मिळवण्यात अडचणी येऊ शकतात.
आधार कार्ड व डिजिलॉकरशी लिंक करणे आवश्यक
अपार आयडी हा आधार कार्ड आणि डिजिलॉकरशी लिंक करणे आवश्यक व अनिवार्य आहे. यामुळे विद्यार्थ्यांची सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, गुणपत्रिका आणि श्रेयांक डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहतात.
अपार आयडी म्हणजे काय?
अपार आयडी म्हणजे ऑटोमेटेड परमनंट ॲकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री होय. हा भारत सरकारच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एक राष्ट्र, एक विद्यार्थी या संकल्पनेखाली सुरू केलेला एक 12 अंकी युनिक डिजिटल ओळख क्रमांक आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 12 अंकी अपार आयडी अनिवार्य करण्यात आला आहे.
अपार आयडी कसा काढायचा?
डिजिलॉकर ॲप किंवा संकेतस्थळावर जाऊन आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर वापरून खाते तयार करावे. खात्यात लॉग इन केल्यावर सर्च डॉक्यूमेंटमध्ये जाऊन एबीसी आडी किंवा अपार पर्याय शोधावा. त्यानंतर राज्य आणि शिक्षण संस्था निवडून विचारलेली शैक्षणिक माहिती भरावी आणि आधारशी जोडलेली माहिती वापरण्यास परवानगी द्यावी. सर्व तपशील बरोबर असल्यास 12 अंकी अपार आयडी तयार होतो.
गेल्यावर्षी 86 टक्के अपार आयडीचे काम पूर्ण झाले होते. सध्या अपार आयडीचे पोर्टल बंद आहे. नवीन शैक्षणिक वर्षापासून हे पोर्टल सुरु होईल. आता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी बाहेर पडतील आणि पहिलीची मुले नवीन प्रवेश घेतील तेव्हा पुन्हा आकडेवारीत बदल होईल.
संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, महापालिका