Pet License Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Pet License: पिंपरी-चिंचवडमध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाळीव प्राणी विनापरवाना; ७५ रुपयांच्या शुल्काकडे मालकांची पाठ

श्वानांचे परवाने केवळ ९५०, तर मांजरांचे १०५; नियमांनुसार ५०० रुपयांच्या दंडाची तरतूद, मात्र अद्याप कारवाई नाही

पुढारी वृत्तसेवा

वर्षा कांबळे

पिंपरी: हजारो रुपये खर्च करून घरात विदेशी श्वान पाळायचे, पण महापालिकेचा फक्त ७५ रुपयांचा परवाना काढायचा नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या हेच चित्र दिसत आहे. शहरात १० हजारांहून अधिक घरांमध्ये श्वान आणि मांजर पाळले जातात, असा महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचा अंदाज आहे. मात्र, प्रत्यक्षात परवाना काढलेल्या नागरिकांची संख्या फक्त ९५० आहे, तर मांजर पाळण्याचा परवाना फक्त १०५ जणांकडे आहे. म्हणजेच ९० टक्क्यांहून अधिक मालकांनी विनापरवाना प्राणी पाळले आहेत.

गेल्यावर्षी २०२५ मध्ये केवळ ७७८ नागरिकांनी श्वान पाळण्याचा, तर केवळ ९३ नागरिकांनी मांजर पाळण्याचा परवाना घेतला होता. यावरून तीन वर्षामध्ये परवाना घेणाऱ्यांची संख्या हजाराचा आकडादेखील पार करू शकली नाही; मात्र अशा विनापरवाना प्राणी पाळणाऱ्या नागरिकांवर पालिकेकडून कोणतीही दंडात्मक कारवाई झालेली नाही.

पाळीव प्राण्यांसाठी परवाना बंधनकारक करण्याचा निर्णय महापालिकेकडून साडेतीन वर्षांपूर्वी घेण्यात आला. नागरिकांना कार्यालयात जाण्याचा त्रास होऊ नये, म्हणून ४ ऑगस्ट २०२२ पासून ही सुविधा पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली. घरबसल्या अर्ज करता येतो. यासाठी श्वानाचा फोटो, लसीकरणाचा रिपोर्ट आणि मालकाचे आधार कार्ड एवढीच कागदपत्रे लागतात. परवान्यासाठीची फी फक्त ७५ रुपये आहे.

नियमात परवाना नसेल तर ५०० रुपये दंडाची तरतूद आहे. मात्र, प्रत्यक्षात आजपर्यंत प्राणी पाळलेल्या एकाही नागरिकावर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई झालेली नाही. त्यामुळे परवाना अनेकजण परवाना काढण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

मोठमोठ्या सोसायट्या आणि अलिशान घरामध्ये महागडे विदेशी जातीचे श्वान पाळणाऱ्याची संख्या वाढत आहे. लाखो रुपये खर्च करून महागडे श्वान खरेदी केले जातात. त्यांच्या पालनपोषणावरही भरमसाठ खर्च केला जातो. त्यामुळे पाळीव प्राण्यांसाठी परवाना काढणे देखील गरजेचे आहे. परवाना काढताना लसीकरणाचा रिपोर्ट द्यावा लागतो. त्यामुळे श्वानाचे लसीकरण झाले आहे की नाही, हे महापालिकेला समजते. मात्र परवाना नसल्यामुळे किती श्वानांचे लसीकरण झाले आहे, याचीच नोंद नाही.

आमच्या सोसायटीमध्ये विनापरवाना श्वान पाळले जातात. लिफ्टमध्ये, पार्कमध्ये श्वान आल्यास भीती वाटते. श्वानाने चावा घेतला तर आम्हालाच बाहेर पडायची चोरी होते. पण मालक आम्ही श्वानाचे नियमित लसीकरण करतो असे उत्तर देतात. पालिकेने फक्त नियम काढून चालणार नाही. कारवाई पण केली पाहिजे.
विजय मोरे (त्रस्त नागरिक)
शेजाऱ्यांकडे चार-पाच मांजरी आहेत. पण मालकाचे घर सोडून कधीही आमच्या घरात शिरतात. त्यामुळे आम्हाला जरावेळदेखील दार उघडे ठेवता येत नाही. या मांजरी पार्किंगमधल्या आणि रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी गाड्यांचे सीट नखांनी कुरतडतात नुकसान करतात.
प्रियंका शर्मा (त्रस्त नागरिक)
परवाना काढण्यासाठी फक्त ७५ रुपये शुल्क आहे. परवाना न काढणाऱ्यांवर अद्याप कोणतीही दंडात्मक कारवाई केलेली नाही. परवाना काढण्याकडे खूप जण दुर्लक्ष करतात, यासाठी आता मोहीम राबवावी लागेल. पण त्यासाठी आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे.
डॉ. अरुण दगडे (पशु वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT