पिंपळे गुरव: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘पवनाथडी’ जत्रेने यंदा लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. अस्सल गावरान चवीचे पदार्थ आणि हस्तकलेच्या वस्तूंनी पिंपरी-चिंचवडकरांना भुरळ घातली असून, अवघ्या पाच दिवसांत जत्रेने 1 कोटी 75 लाख रुपयांच्या उलाढालीचा टप्पा गाठला आहे.
यावर्षी सांगवीच्या मैदानावर जत्रेचे अत्यंत नेटके आणि भव्य नियोजन करण्यात आले होते. महिला बचत गट आणि स्थानिक व्यावसायिकांना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी एकूण 837 स्टॉल उभारण्यात आले होते. त्यामध्ये जनरल स्टॉल्स : 452 (हस्तकला, गृहोपयोगी वस्तू, मसाले इ.), शाकाहारी खाद्यपदार्थ : 215, मांसाहारी खाद्यपदार्थ : 170 स्टॉल्स उभारले आहेत. जत्रेच्या शेवटच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. प्राथमिक अंदाजानुसार रात्री 10 वाजेपर्यंत विक्रीचा आकडा 1.50 कोटींच्या पुढे गेला होता. जनरल स्टॉल (वस्तू व उत्पादने) यातून 53 लाख रुपये, शाकाहारी खाद्यपदार्थातून 46 लाख रुपये, मांसाहारी खाद्यपदार्थातून 44 लाख रुपये असे एकूण प्राथमिक विक्री 1 कोटी 43 लाख रुपये रात्री उशिरापर्यंत झालेली गर्दी पाहता अंतिम आकडा 1 कोटी 75 लाखांच्या घरात गेल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
खवय्यांची ‘खाऊ गल्ली’त चंगळ
जत्रेतील मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे येथील खाऊ गल्ली. खवय्यांनी मासे, बिर्याणी, मटण-भाकरी यांसारख्या मांसाहारी पदार्थांसोबतच खानदेशी मांडे आणि पाणीपुरीवर ताव मारला. महिला बचत गटांनी तयार केलेले घरगुती मसाले पापड आणि हस्तकलेच्या वस्तूंनाही महिला वर्गाकडून मोठी पसंती मिळाली.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
केवळ खरेदीच नव्हे तर मनोरंजनासाठीही पालिकेने उत्तम व्यवस्था केली होती. ऑर्केस्ट्रा लावणी मखेळ रंगला पैठणीचाफ आणि हिंदी-मराठी गीतांचे बहारदार कार्यक्रम पार पडले. महापालिकेचा समाज विकास विभाग सुरक्षा आरोग्य विद्युत आणि स्थापत्य विभागाने पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने चोख बंदोबस्त आणि व्यवस्था ठेवली होती.
महिला सक्षमीकरणाचा ‘बँड’
पवनाथडी जत्रा हे केवळ प्रदर्शन नसून, महिलांच्या आर्थिक प्रगतीचे मोठे व्यासपीठ बनले आहे. ग््राामीण आणि शहरी भागातील बचत गटांच्या उत्पादनांना शहरात मोठी मागणी मिळत आहे. ही आनंदाची बाब आहे. अशी भावना आयोजकांकडून व्यक्त करण्यात आली. आज पवनाथडीचा शेवटचा दिवस उत्साहात पार पडला. मुलांच्या परीक्षा सुरू असतानाही नागरिकांचा चांगला सहभाग लाभला. ही माझ्यासाठी पहिलीच पवनाथडी असल्याने संपूर्ण नियोजन सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले. या यशस्वी आयोजनाबद्दल संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार मानले.
पुढील पवनाथडी अधिक भव्य आणि नियोजनबद्ध करण्याचा आमचा प्रयत्न राहील. यावेळी ज्या बचत गटांना स्टॉल मिळू शकले नाहीत त्यांना पुढील वेळी जास्तीत जास्त संधी मिळेल यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील.ममता शिंदे, उपयुक्त, समाज विकास विभाग, मनपा