पिंपरी: नागरिकांच्या आरोग्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांत उभारण्यात आलेल्या ओपन जिमला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर काही ठिकाणी उपकरणे धूळ खात पडल्याचे चित्र आहे. शहरातील सर्व 32 प्रभागांमध्ये नागरिकांच्या मागणीनुसार ओपन जीम उभारण्यात आल्या असल्या, तरी त्यांच्या वापराबाबत काही परिसरात कमी प्रतिसाद आहे. तर, काही साहित्य नादुरुस्त झाल्याने ते शोभेचे ठरत आहे.
शहरात जवळपास गेल्या पाच वर्षांत महापालिकेने सर्व दहा क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रात एकूण 187 ओपन जीमचे साहित्य उभारले आहे. लोकांच्या मागणीनुसार आणखी जीम उभारण्यात येणार आहेत. आवश्यकतेनुसार काही ठिकाणी 10, तर काही ठिकाणी 13 प्रकारची व्यायामाची उपकरणे बसविण्यात आली आहेत. काही ठिकाणी नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन उपकरणांची संख्या वाढविण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी वापराअभावी उपकरणे काढून टाकण्याची वेळ आली आहे. काही भागांत अधिक संख्येने साहित्य बसण्यात आले आहे.
सांगवी, नवी सांगवी, पिंपळे सौदागर, भोसरी, थेरगाव, वाकड, पिंपळे गुरव आणि चिंचवड परिसरातील ओपन जिमचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. तर मोशी, चिखली व काळेवाडी परिसरातील काही ठिकाणी उपकरणांचा अपेक्षित वापर होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेचे नगरसेवक, नागरिक यांच्या मागणीनुसार ओपन जिम सुरू केल्या जातात. त्यानंतर क्रीडा विभागाच्या वतीने जागेची निवड केली जाते.
नागरिकांना सहजपणे व्यायाम करता यावा, यासाठी उद्याने, मोकळी पटांगणे, पदपथ, हाऊसिंग सोसायट्या तसेच, क्रीडांगणे या ठिकाणी जिमसाठी प्राधान्य दिले जाते. त्यानंतर तज्ज्ञांच्या अहवालानुसार उपकरणांची देखभाल आणि दुरुस्ती केली जाते. सर्व दहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत तब्बल 187 ओपन जीम उभारल्या आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार आणखी जीम उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे.
41 ठिकाणच्या जिमची माहिती क्रीडा विभागाकडे नाही
शहरातील 41 ठिकाणी विविध निधीतून किंवा जिल्हा क्रीडा विभागाच्या मान्यतेनुसार या जीमम उभारण्यात आल्या आहेत. मात्र, नेमक्या कोणत्या संस्थेने किंवा यंत्रणेने उभारण्यात आल्या आहेत. त्यांची देखभाल-दुरुस्ती तसेच उपकरणांची तांत्रिक माहिती काय आहे, याची पुरेशी नोंद उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या 41 जीमची तांत्रिक माहिती क्रीडा विभागाकडून मिळवण्यात येत आहे. मात्र, त्याला अद्याप यश आलेले नाही.
‘नादुरुस्त साहित्यांची तातडीने दुरुस्ती’
नागरिकांच्या आरोग्यासाठी ओपन जिमची संकल्पना संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात आली आहे. सर्व जिमची नियमित पाहणी केली जाते. नादुरुस्त उपकरणांची तातडीने दुरुस्ती केली जाते, असे महापालिकेच्या क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांनी सांगितले.