

संतोष शिंदे
पिंपरी: पिंपरी-चिंचवडमध्ये सव्वाआठ महिन्यांत ६०९ जणांनी जीवन संपवले. मात्र, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी केवळ २६ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे उर्वरित घटनांमध्ये संबंधित व्यक्तीने टोकाचे पाऊल नेमके का उचलले? त्यामागे कोणाचा छळ, दबाव अथवा अन्य कारण होते का? या प्रश्नांची उत्तरे अनेक प्रकरणांत मृत्यूनंतरही अनुत्तरित राहिली आहेत. जानेवारी ते ८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ५८३ आत्महत्यांची नोंद झाली आहे. याच कालावधीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी २६ गुन्हे दाखल झाले असून, त्यामध्ये २६ जणांनी जीवन संपवले. अशा प्रकारे सव्वाआठ महिन्यांत एकूण ६०९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आत्महत्या झाल्यानंतर पोलिस सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करून त्यामागील कारणांचा शोध घेतात. मृत व्यक्तीचे नातेवाईक, मित्र, संपर्कातील व्यक्तींचे जबाब, कौटुंबिक किंवा आर्थिक वाद, याबाबत माहिती घेतली जाते. उपलब्ध असल्यास सुसाइड नोट, मोबाईलमधील संभाषण आणि इतर पुराव्यांचाही तपास केला जातो. मात्र, छळ किंवा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे पुरावे समोर आल्यासच संबंधितांविरोधात गुन्हा दाखल होतो. त्यामुळे प्रत्येक आत्महत्येमागे दुसऱ्या व्यक्तीचा सहभाग आहे, असा निष्कर्ष काढता येत नसला तरी मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट न झालेल्या घटनांतील गूढ कायम आहे.
मृत्यूनंतर कुटुंबीयांसमोर अनुत्तरित प्रश्न
कौटुंबिक कलह, प्रेमसंबंध, आर्थिक व्यवहार, कर्जबाजारीपणा, नोकरी-व्यवसायातील ताण, आजारपण किंवा मानसिक तणाव, अशी अनेक कारणे प्राथमिक तपासात पुढे येतात. मात्र, मृत व्यक्तीच नेमके कारण सांगण्यासाठी हयात नसल्याने अनेकदा तपासाला मर्यादा येतात. सुसाइड नोट किंवा ठोस पुरावा नसल्यास संबंधित व्यक्तीवर नेमका कोणता दबाव होता? ती कोणत्या समस्येला सामोरी जात होती? किंवा शेवटच्या क्षणी टोकाचा निर्णय घेण्यामागे काय घडले? याची साखळी जोडणे कठीण होते. परिणामी, अनेक कुटुंबांसाठी 'आत्महत्या का केली?' हा प्रश्न कायमचा अनुत्तरित राहतो.
प्रयत्नातून वाचलेल्या १८२ जणांची वेगळी कहाणी
जीवन संपवण्याचा प्रयत्न करून बचावलेल्या १८२ जणांवर जानेवारी ते जून २०२६ दरम्यान वायसीएम रुग्णालयात उपचार आणि समुपदेशन करण्यात आले. त्यामध्ये ६० पुरुष आणि १२२ महिला होत्या. विशेषतः २० ते ४० वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण अधिक होते. महिलांमध्ये पती व सासरच्या व्यक्तींसोबतचा कौटुंबिक तणाव, तर पुरुषांमध्ये आर्थिक अडचणी आणि मद्यप्राशनाशी संबंधित समस्या अधिक आढळून आल्या. वैद्यकीय उपचारांनंतर मानसोपचार विभागाकडून संबंधित व्यक्तीच्या समस्येचे स्वरूप समजून घेऊन समुपदेशन केले जाते.
पोलिस ठाणेनिहाय आकडेवारी
चिखली परिसरात सर्वाधिक ४३ आत्महत्यांची नोंद आहे. हिंजवडी आणि काळेवाडी येथे प्रत्येकी ३७, देहूरोड ३६, एमआयडीसी भोसरी ३५, उत्तर महाळुंगे एमआयडीसी ३४, आळंदी ३२, तर बावधन आणि चाकण दक्षिण पोलिस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी ३० आत्महत्या झाल्या आहेत.
आत्महत्येच्या प्रत्येक घटनेचा पोलिसांकडून तपास केला जातो. संबंधित व्यक्तीला कोणाकडून छळ करण्यात आला किंवा आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचे पुरावे मिळाल्यास कायदेशीर कारवाई केली जाते. नागरिकांनी छळ, धमकी अथवा गंभीर तणावाची परिस्थिती असल्यास वेळीच पोलिस किंवा संबंधित यंत्रणेकडे मदत मागावी.
नरेंद्र ठाकरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी, पिंपरी-चिंचवड
नैराश्य, सततचा तणाव, झोप-भुकेतील बदल, एकटेपणा तसेच वारंवार मृत्यू किंवा जीवन संपवण्याबाबत बोलणे, या संकेतांकडे दुर्लक्ष करू नये. संबंधित व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून तिला आधार देणे आणि वेळेत मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणे महत्त्वाचे आहे.
डॉ. मनजित संत्रे, मानसोपचार विभाग, वायसीएम रुग्णालय