Navratri Public Monitoring Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Navratri: पिंपरी-चिंचवडमध्ये दांडियावर पोलिसांची नजर; लेझर, बीमलाइटवर निर्बंध

६२८ सार्वजनिक मंडळांसाठी ‘एक मंडळ, एक पोलिस अंमलदार’ योजना; ध्वनिमर्यादा ओलांडल्यास कारवाई, गर्दी आणि वाहतूक व्यवस्थापनाचेही आव्हान

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: गणेशोत्सवात डीजेच्या दणदणाटाला लगाम घातल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आता नवरात्रोत्सवातील दांडियावरही कारवाईचा दंडुका उगारला आहे. ध्वनिमर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याबरोबरच प्रखर बीमलाइट आणि लेझर लाइटच्या वापरावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांवर आता ‘एक मंडळ, एक पोलिस अंमलदार’ योजनेतून नजर ठेवली जाणार आहे.

पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ६२८ सार्वजनिक मंडळांकडून दांडियाचे आयोजन करण्यात येते. तसेच, भाविकांची गर्दी होणारी ४८ प्रमुख देवी मंदिरे आहेत. दरम्यान, नवरात्रोत्सवात ११ आणि २० ऑक्टोबर या दोन दिवसांसाठी रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास सवलत देण्यात आली आहे. इतर दिवशी रात्री दहा वाजताच आवाज बंद करावा लागणार आहे. सवलतीच्या दिवशीही निर्धारित ध्वनिमर्यादा पाळणे बंधनकारक राहणार आहे.

गणेशोत्सवाप्रमाणेच प्रत्येक मंडळाची जबाबदारी स्वतंत्र पोलिस अंमलदाराकडे सोपविण्यात येणार आहे. संबंधित अंमलदार मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कार्यक्रमांची माहिती अद्ययावत ठेवणार आहे. त्यामुळे नियमभंग झाल्यास संबंधित मंडळावर तत्काळ कारवाई करणे पोलिसांना शक्य होणार आहे. दरम्यान, दांडियात वापरल्या जाणाऱ्या प्रखर बीमलाइट आणि लेझर बीमलाइटवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

‘बापट इफेक्ट’ची नवरात्रोत्सवातही चर्चा

गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेत डीजे यंत्रणा जप्त करण्याबरोबरच नियम मोडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल केले होते. या धडक कारवाईमुळे विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजेऐवजी ढोल-ताशांचा गजर ऐकू आला. अखेरच्या दिवशी डीजेचा दणदणाट थंडावल्याने शहरात ‘बापट इफेक्ट’ची चर्चा रंगली होती. आता नवरात्रोत्सवातही पोलिसांनी तोच आक्रमक पवित्रा घेतल्याने दांडियाच्या मैदानात ‘चौबे पॅटर्न’ किती प्रभावी ठरतो, याकडे लक्ष लागले आहे.

दांडिया संपल्यानंतर कोंडी

दांडिया कार्यक्रमांसाठी एकाच वेळी शेकडो वाहने दाखल होत असल्याने कार्यक्रमस्थळांभोवती वाहतूक कोंडी होते. रस्त्यांवर बेशिस्त पार्किंग, प्रवेशद्वारांसमोर वाहनांची गर्दी आणि कार्यक्रम संपल्यानंतर एकाच वेळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांमुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे आयोजकांनी स्वतंत्र वाहनतळ, प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग तसेच स्वयंसेवकांची व्यवस्था करणे आवश्यक आहे.

मिरवणुकांची रेलचेल; बंदोबस्ताचे आव्हान

नवरात्रोत्सवात पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ४० ठिकाणी पथसंचलन, ५८ ठिकाणी दुर्गा दौड आणि २६ ठिकाणी रावणदहनाचे कार्यक्रम होणार आहेत. घटस्थापनेच्या दिवशी ८४, तर विजयादशमीला २३१ ठिकाणी मिरवणुका निघणार आहेत. विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी चार, कोजागिरी पौर्णिमेला १०५, त्याच्या दुसऱ्या दिवशी आठ आणि इतर दिवशी १५ ठिकाणी मिरवणुका होणार आहेत. विशेष म्हणजे ४७१ मंडळे जागेवरच देवीमूर्तींचे विसर्जन करणार आहेत. या सर्व कार्यक्रमांदरम्यान गर्दी आणि वाहतुकीचे नियोजन करण्याचे आव्हान पोलिसांसमोर राहणार आहे.

दांडियाच्या मैदानात साध्या वेशातील पोलिस

दांडिया आणि गरब्याच्या कार्यक्रमांना तरुण-तरुणींची मोठी गर्दी होते. या गर्दीचा फायदा घेत छेडछाड, चोरी आणि हुल्लडबाजीचे प्रकार घडण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठ्या दांडिया कार्यक्रमांच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची गस्त, महिला पोलिसांची उपस्थिती आणि संशयास्पद व्यक्तींवर नजर ठेवण्यात येणार आहे. ज्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर रात्री घरी परतणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित वातवरण रहाणार आहे.

नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करताना कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. ध्वनिमर्यादा, वेळेचे निर्बंध आणि प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. मंडळांनी पोलिसांना सहकार्य करून उत्सव शांततेत पार पाडावा.
विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT