

मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक वाहतुकीस चालना देण्यासाठी 31.40 किलोमीटर अंतराचा उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाचा (एचसीएमटीआर-हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रूट) (रिंगरोड) प्रकल्प 33 वर्षांपासून धूळ खात पडला आहे. वारंवार त्यात बदल करण्यात आले. त्यातील काही ठिकाणी बीआरटीएस धावत असून, मेट्रो व ई-आरटीएस प्रस्तावित आहे. निओ मेट्रोऐवजी ई-आरटीएसचा स्वस्त व सोईस्कर पर्याय लक्षात घेता एचसीएमआरटी मार्गावर ती सेवा निर्माण करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. काही भागात नागरिकांचा या प्रकल्पास विरोध आहे. वारंवार अडथळे निर्माण होत असल्याने हा प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी दिसत आहे.
शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी तसेच, नागरिकांमध्ये खासगी वाहनांचा वापर कमी करण्यासाठी एचसीएमटीआर या सार्वजनिक वेगवान वाहतूक सेवेचा पर्याय सन 1993 ला समोर आला होता. त्याचा डीपी अहवाल तयार करण्यात आला. तब्बल 33 वर्षांपासून भिजत पडलेला हा प्रकल्प अखेर, सन 2019 मध्ये पुन्हा बाहेर काढण्यात आला. महामेट्रोकडून त्या प्रकल्पाचा डीपीआर तयार करून घेण्यात आला. त्याकरिता सुमारे 5 कोटींचा खर्च झाला. डीपीआरच्या मार्गात काही बदल व सुधारणा करून तो डीपीआर तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिका पदाधिकार्यांसमोर सादर केला.
तो डीपीआर तत्कालिन दिवगंत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्यासमोर तत्कालिन आयुक्त राजेश पाटील यांनी 19 जानेवारी 2021 ला सादर केला. त्यांनी सूचना केल्यानंतर त्यात पुन्हा बदल करण्यात आले. तत्कालिन आयुक्त शेखर सिंह यांनी तो डीपीआर राज्य सरकार समोर मांडला होता. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरही आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी डीपीआरचे सादरीकरण केले आहे. एचसीएमटीआरऐवजी ई-आरटीएस मार्गास मुख्यमंत्र्यांनी होकार दिला आहे. त्यानुसार, बोर्हाडेवाडी, मोशी ते वाकड चौक मार्गावर सुमारे 17 किलोमीटर अंतराची ई-आरटीएस सेवा निर्माण केली जाणार आहे. तर, काही मार्गावर मेट्रोचे नियोजन करण्यात आले आहे. काही मार्गावर बीआरटीएस तयार आहे. मात्र, संपूर्ण एचसीएमटीआर मार्गाबाबत ठोस निर्णय होत नसल्याने हा प्रकल्पाची गरज आहे की संपली, असा प्रश्न निर्माण होत आहे.
मेट्रो, बीआरटीएस, ई-आरटीएस यंत्रणेत नाही ताळमेळ
शहरात दापोडी ते पिंपरी मेट्रो धावत आहे. तो मार्ग निगडीपर्यंत विस्तारीत करण्याचे काम सुरू आहे. तसेच, निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक ते चाकण असा 47. 295 किलोमीटर अंतराचा मेट्रोचा नवीन मार्ग आहे. तसेच, बोर्हाडेवाडी ते वाकड चौक असा ई-आयटीएस प्रकल्पाची नवीन संकल्पना राबवण्यात येत आहे. महापालिका, मेट्रो, बीआरटीएस, ई-आयटीएस यंत्रणेत ताळमेळ नसल्याने एचसीएमटीआर प्रकल्प बारगळला आहे. नवनव्या संकल्पनेमुळे एचसीएमटीआर मार्गाचे तुकडे होत असल्याचे चित्र आहे. काही भागांत दाट लोकवस्ती निर्माण झाली आहे. घरे पाडून मार्ग तयार करण्यास शहरातून मोठा विरोध होऊ शकतो. त्यामुळे नियोजित संपूर्ण कामांवर एचसीएमटीआर साकार करण्यास महापालिकेस मोठ्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे.
डीपीत एचसीएमटीआर मार्ग दर्शवल्याने हरकतींचा पाऊस
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप सुधारित विकास आराखड्यावर (डीपी प्लॅन) सुनावणी सुरू आहे. त्या डीपीत एचसीएमटीआरचा मार्ग दर्शवण्यात आला आहे. त्या डीपीवर शहरभरातून तब्बल 56 हजार 779 हरकती दाखल झाल्या आहेत. एससीएमटीआरबाबत चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, काळेवाडी, थेरगाव, रहाटणी आदी भागांतून 2 हजार 435 हकरती दाखल करण्यात आल्या आहेत. तो मार्ग कायमस्वरूपी रद्द करावा, अशी बाधित होणार्या नागरिकांची मागणी आहे. त्याबाबत सुनावणी समिती काय निर्णय घेते याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
31.40 किलोमीटर अंतराचा एचसीएमटीआर मार्ग
तीस मीटर रुंदीचा हा 31.40 किलोमीटर अंतराचा एचसीएमआरटीचा एलिव्हेटर (उन्नत) डीपीआर तयार करण्यात आला आहे. नाशिक फाटा, पिंपळे गुरव, सुदर्शननगर, कोकणे चौक, काळेवाडी फाटा, तापकीर चौक, पीसीएमसी-वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमी, संचेती स्कूल, क्रांतिवीर नगर, थेरगाव बिर्ला रुग्णालय, वाल्हेकरवाडी, रानमळा हॉटेल, स्पाइन रस्ता, रेलविहार चौक, आकुर्डी रेल्वे स्थानक, निसर्ग दर्शन सोसायटी, गायरान, निगडी भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक, स्पाइन रस्ता त्रिवेणीनगर, रूपीनगर, टाटा मोटर्स, जॅग्वार कंपनी (मर्झिडीझ बेंझ) समोरून इंद्रायणीनगर, स्वामी समर्थ स्कूल, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणी चौक, टेल्को रस्ता, सेंच्युरी एन्का, लांडेवाडी असा मार्ग आहे.
निओ मेट्रोचा डीपीआर बारगळला
डीपीआरमध्ये एचसीएमआरटीचा मार्ग एलिव्हेटर दर्शवण्यात आला आहे. त्यासाठी निओ मेट्रोचा पर्याय ठेवण्यात आला होता. त्यानुसार, महामेट्रोने डीपीआर तयार केला. निओ मेट्रो ही टायरबेस असलेली तीन कोचची इलेक्ट्रिक वाहन आहे. एकदा चार्ज झाल्यानंतर ती 50 ते 60 किलोमीटर अंतर धावते. त्यासाठी लोहमार्ग टाकण्याचा खर्च वाचतो. एका वेळी 700 ते 750 प्रवासी यातून प्रवास करू शकतात. मात्र, निओ मेट्रोचा पर्याय गुंडाळण्यात आला आहे. निगडीच्या भक्ती-शक्ती चौक ते चाकण असा 47.295 किलोमीटर अंतराचा सुधारित डीपीआर तयार करण्यात आला. त्याला महापालिका सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.
दोन हजार 300 कोटींचा प्रकल्प
शहरातील एचसीएमटीआर निओ मेट्रो मार्गासाठी एकूण 2 हजार 300 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तो प्रकल्प पीपीपी, बीओटी, केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने की म्युन्सिपल बॉण्ड काढून करायचा, याबाबत अद्याप एकमत झालेले नाही. राज्याने मान्यता दिल्यानंतर निधी उभारण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे अधिकार्यांनी सांगितले.
नेतेमंडळीच्या फायद्यासाठी प्रकल्प कागदावर
तब्बल 400 कोटी रुपये खर्चाचा हा एचसीएमटीआर रिंग रेल्वे प्रकल्प पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक क्षमतेच्याबाहेर होता. सन 1980 ते 1992 च्या काळात जागतिक बँकेच्या मदतीशिवाय हा प्रकल्प अस्तित्वात येऊ शकत नव्हता. सन 1995 च्या डीपी अहवालात तशी नोंद आहे. त्यामुळे हा प्रकल्प फक्त नकाशातच राहिला. हा प्रकल्प कालबाह्य ठरला आहे. महापालिकेच्या नगर रचना विभागाच्या अधिकार्यांनी बेकायदेशीर टीडीआर वाटप केल्यामुळे हा प्रकल्प राजकीय नेत्यांच्या आर्थिक लाभासाठी आजही कागदावर आहे. जो भविष्यात राबवला जाईल असे वाटत नाही, असे विजयकुमार पाटील यांनी सांगितले.
एचसीएमटीआर मार्गावर ईआरटीएसचे नियोजन
एचसीएमटीआर मार्ग हा निओ मेट्रो म्हणून डीपीआर तयार करण्यात आला होता. त्याच वेळी दाट लोकवस्तीऐवजी बीआरटी मार्गातून मार्गिका प्रस्तावित करण्यात आली होती. त्या प्रकल्पासाठी सध्या 65 टक्के जागा ताब्यात आहे. तर, सुमारे 30 टक्के मार्गावर मेट्रोची मार्गिका होणार असल्याने तेथे एचसीएमटीआरची गरज राहणार नाही. मात्र, नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध राहणार आहे. बोर्हाडेवाडी ते वाकड चौक असा ई-आरटीएस मार्ग तयार होऊन त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्यास एचसीएमटीआर हा ई-आयटीएस पद्धतीने विकसित करण्यात येईल, असे महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाचे सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.