Nashik Phata Flyover Pudhari
पिंपरी चिंचवड

Nashik Phata Flyover Lights Issue: नाशिक फाटा उड्डाण पुलावर अंधाराचे साम्राज्य; पथदिवे बंद, अपघाताचा धोका वाढला

पिंपरी-चिंचवडमधील नाशिक फाटा जेआरडी टाटा उड्डाण पुलावरील पथदिवे बंद असल्याने रात्री भीषण अंधार पसरतो. वाहनचालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला

पुढारी वृत्तसेवा

पिंपळे गुरव: अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा समजला जाणारा वाकड-भोसरी बीआरटीएस मार्गावर सध्या अंधाराचे सामाज्य पसरले आहे. नाशिक फाटा येथील जेआरडी टाटा उड्डाण पुलावरील दुभाजकामधील पथदिवे काही दिवसांपासून बंद असल्याने रात्रीच्या वेळी संपूर्ण पुलावर भीषण अंधार पसरतो. त्यामुळे हजारो वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

नाशिक फाटा चौक हा पुणे-नाशिक तसेच शहरातील विविध भागांना जोडणारा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. या पुलावरून दररोज हजारो लहान-मोठी वाहने प्रवास करतात. मात्र, पुलावरील पथदिवे बंद असल्यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा योग्य अंदाज येत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या तीव हेडलाईटमुळे दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, अपघाताची शक्यता बळावली आहे. बीआरटीएस मार्गावरील हा अंधार वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे.

नागरिकांच्या मते वेगवान वाहतुकीसाठी ओळखला जाणारा हा मार्ग आता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. इतक्या महत्त्वाच्या उड्डाण पुलावर दिवे बंद असणे ही गंभीर बाब आहे. रात्री पुलावर काहीच दिसत नाही. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी एका वाहनचालकाने व्यक्त केली.

पथदिव्यांच्या वायरची चोरी

पुलावरील पथदिव्यांच्या फिटिंगमधून खाली येणाऱ्या कॉपर वायरची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण उड्डाण पुलावरील अनेक ठिकाणावरील कॉपर वायर चोरीला गेल्यामुळेच पथदिवे बंद पडल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे केवळ आर्थिक नुकसान झाले नसून, नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

नाशिक फाटा येथील जेआरडी टाटा उड्डाण पुलावरील बंद पथदिव्यांची तपासणी करून ते लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. आवश्यक दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात येईल.
सना तांबोळी, कनिष्ठ अभियंता, मुंबई पुणे विद्युत विभाग.
उड्डाण पुलावर रात्री पूर्ण अंधार असल्यामुळे वाहन चालवताना भीती वाटते. विशेषतः दुचाकीस्वारांना समोरचा रस्ता नीट दिसत नाही. कॉपर वायर चोरीला जाणे ही गंभीर बाब असून, प्रशासनाने तातडीने सुरक्षा व्यवस्था वाढवून पथदिवे सुरू करावेत.
अतुल पवार, अध्यक्ष, आध्या सोशल फाउंडेशन, पिंपळे गुरव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT