मिलिंद कांबळे
पिंपरी : तब्बल 9 वर्षांनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक झाली आहे. निर्विवाद बहुमत मिळवून भाजपने सलग दुसऱ्यांना सत्ता काबीज केली आहे. भाजपचा कारभाऱ्यांचा कर्णधार होण्यासाठी म्हणजे महापौर, सत्तारूढ पक्षनेता, स्थायी समितीचे अध्यक्ष व इतर महत्त्वांच्या पदासाठी अनेक दिग्गज व अनुभवी नगरसेवकांनी फिल्डिंग लावली आहे. त्यादृष्टीने पडद्यामागे हालचालींना वेग आला आहे. कोणाच्या गळ्यात श्रीमंत असा नावलौकीक असलेल्या महापालिका कॅप्टन पदाची माळ पडते, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
मुदतीमध्ये निवडणुका न झाल्याने महापालिका 12 मार्च 2022 ला बरखास्त झाली. त्यानंतर आयुक्त हे प्रशासक म्हणून महापालिकेचा संपूर्ण कारभार पाहत आहेत. फेबुवारी 2017 च्या निवडणुकीनंतर तब्बल 9 वर्षांनंतरच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 ला मतदान तर, 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल लागला आहे. भाजपने सलग दुसऱ्यांदा बहुमत प्राप्त केले आहे. भाजपचे कारभारी महापालिकेत आता पाच वर्षे राज्य करणार आहेत.
शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. महापौरपद हे अनुसूचित जाती (एससी) वर्गासाठी राखीव असल्याचे सांगितले जात आहे. स्थायी समिती सभेचे सभापतीपद, उपमहापौरपद, विविध विषय समितीचे अध्यक्षपद तसेच, अतिमहत्त्वाचे असलेल्या सत्तारूढ पक्षनेतेपदासाठी पक्षांतील अनेक नगरसेवक इच्छुक आहेत. महापालिका कामकाजाचा अनुभव असलेले अनेक नवनिर्वाचित नगरसेवक त्या पदांसाठी दावा करीत आहेत. त्यादृष्टीने स्थानिक आमदारांसह प्रदेशाध्यक्ष व राज्य नेतृत्वाकडे साकडे घालण्यात येत आहे. त्यासाठी भेटीगाठीचा सिलसिला वाढला आहे. अनेक टर्म निवडून आल्याचे तसेच, महापालिका कामकाजाचा दांडगा अनुभव तसेच, निष्ठावंत असल्याचा दावा करीत, पक्षश्रेष्ठींकडे पदासाठी विनवणी केली जात आहे. त्यासाठी उच्च पातळीवरील अनेकांना स्वत:च्या नावाची शिफारस करण्याचा आग््राह धरला जात आहे. पदासाठी वाटले ते करण्याची तयारी काहींनी केली आहे. श्रीमंत महापालिका असा नावलौकीक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रतिष्ठित पद भूषवण्यासाठी अनेक नगरसेवक तयारीला लागले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपदी खुला प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) या प्रवर्गाच्या नगरसेवकांना संधी मिळाली आहे. केवळ अनुसूचित जातीचे (एससी) आरक्षण राहिले आहे. महापौरपदासाठी एससीचे आरक्षण पडण्याची शक्यता आहे. एससीच्या 20 जागांपैकी भाजपचे 14 नगरसेवक निवडून आले आहेत. आमदार अमित गोरखे यांच्या आई अनुराधा गोरखे तसेच, शिक्षण समितीच्या माजी सभापती मनीषा पवार, मधुरा शिंदे, आशा सूर्यवंशी, सारिका गायकवाड, माजी नगरसेवक विकास डोळस यांच्या पत्नी श्रृती डोळस, माजी नगरसेवक सागर आंगोळकर यांच्या पत्नी रविना आंगोळकर, माजी नगरसेवक संतोष कांबळे यांच्या पत्नी तृप्ती कांबळे आणि पुरुष गटातून बाबासाहेब त्रिभुवन, कुंदन गायकवाड, विनायक गायकवाड, अनिल घोलप, डॉ. सुहास कांबळे आणि भाजपा-आरपीआयचे कुणाल वाव्हळकर, धर्मराज तंतरपाळे हे नगरसेवक आहेत. एससी पदासाठी महापौरपद आरक्षित झाल्यास त्यापैकी एकाची महापौरपदी वर्णी लागू शकते. वर्षभरासाठी एका-एका नगरसेवकाला संधी दिली जाऊ शकते.
भाजपचे अपक्ष धरून 85 नगरसेवक सदस्य संख्या आहे. त्यानुसार, भाजपचे 3 स्वीकृत नगरसेवक होतील. तर, राष्ट्रवादी काँग््रेासकडून 37 नगरसेवक असन, त्यांचे 2 स्वीकृत नगरसेवक असतील. निवडून आलेल्या नगरसेवकाप्रमाणेच स्वीकृत नगरसेवकांना अधिकार असतात. मात्र, त्यांना मतदानासाठी सहभाग घेत नाहीत. त्या पाच पदासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पराभूत झालेल्या दिग्गजांना त्या ठिकाणी संधी जाते. महापालिका कामकाजाचे अनुभव लक्षात घेऊन त्या पदावर पक्षाकडून योग्य उमेदवारांची नियुक्ती केली जाते.
महापौर पदासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा बोलवली जाणार आहे. महापौर निवडीनंतर प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे. अद्याप महापौर पदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही. ती घोषणा झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून महापौर, उपमहापौर पदाची निवड केली जाईल. विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रत्येक पक्षाकडून नगरसेवकांची यादी देऊन पक्षनेता व विरोधी पक्षनेता निवडला जाईल. त्यानंतर विविध विषय समिती सदस्य व अध्यक्षांची निवडप्रक्रिया सुरू होईल. फेबुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापौरपदाची निवड होईल, असा अंदाज व्यक्त केला जाईल.
भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांच्या शहराध्यक्षपद काळात भाजपने सर्वांधिक 85 नगरसेवक निवडून आले आहेत. शत्रुघ्न काटे सत्तारूढ पक्षनेते किंवा स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. तसेच, शिवसेनेतून भाजपत आलेले माजी गटनेते राहुल कलाटे हेही तयारी करीत आहेत. माजी महापौर राहुल जाधव व माजी महापौर नितीन काळजे तसेच, सलग तीन वेळा निवडून आलेले शीतल शिंदे हेही त्या पदासाठी दावेदार मानले जात आहेत. सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आलेले रवी लांडगे या पदासाठी आग््राह धरू शकतात. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नितीन लांडगे, माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, अमित गावडे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, शैलजा मोरे व हिराबाई घुले, तसेच हर्षल ढोरे, संदीप कस्पटे, आरती चोंधे, माजी महापौर शकुंतला धराडे, शशिकांत कदम, नवनाथ जगताप, नमता लोंढे, सोनाली गव्हाणे हेही इच्छुक असल्याचे समजते.