

किरण जोशी
पिंपरी: भ्रष्टाचाराच्या आरोपांना विकासाच्या मुद्याने प्रत्युत्तर देत भाजपने पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अत्यंत प्रतिष्ठेची केल्याने राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत भाजपने 84 जागांसह जोरदार मुसंडी मारली. पवार यांना थेट अंगावर घेणारे भोसरीचे आमदार महेश लांडगे हे या विजयाचे शिल्पकार ठरले.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणार्या पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता गतवेळी 2017 मध्ये भाजपने खेचून आणली होती. महापालिकेत झालेल्या कथित मूर्ती घोटाळ्यावरुन आरोपांची राळ उठवत अजित पवारांच्या गडाला भाजपने भगदाड पाडले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करणारे आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनीच महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यानंतरच्या लोकसभेमध्ये झालेल्या पार्थ पवारांच्या पराभवाचा बदला घेऊन पुन्हा महापालिका मिळविण्यासाठी अजित पवारांनी या निवडणुकीत संपूर्ण ताकद पणाला लावली होती. गेल्या 9 वर्षांत भष्ट्राचार आणि दहशत झाल्याचा मुद्दा उपस्थित करून अजित पवारांनी पिंपरीत तळ ठोकला. आमदार महेश लांडगे यांना लक्ष्य करून भोसरीसह शहराच्या चौफेर सभा घेतल्या. पवार आणि लांडगे यांच्यामध्ये रंगलेले शाब्दीक युद्ध राज्यात चर्चेचा विषय ठरले.
भाजपचे वरिष्ठ नेत्यांनीही अजित पवारांच्या या भूमिकेवरुन नाके मुरडली. मात्र, महेश लांडगे यांनी पवारांचे आव्हान स्वीकारुन थेट बंड पुकारल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली. शहराचा कारभार माझ्या हातात द्या, येथील दादागिरी मी मोडून काढतो आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार करून दाखवितो, अशी साद घालत अजित पवारांनी पिंपरीकरांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, बारामतीतून तुम्ही काय विकास करणार, असा सवाल करून स्थानिकांच्या स्वाभिमान दुखावल्याचा पलटवार आमदार लांडगे यांनी केला. यावरून पेटलेल्या राजकारणावर मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, केवळ एक सभा आणि विजय रॅली काढून मुख्यमंत्र्यांनी विकासाचा नारा दिला. आम्ही टीकेवर टीका न करता विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि याच मुद्याला पिंपरीकरांनी साथ दिल्याचे दिसून आले.
मुख्यमंत्र्यांची शायरी ठरली खरी!
पवार आणि लांडगे यांच्यातील शाब्दिक युद्धामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून पवारांना चिमटा काढला. परिंदों को मिलेगी मंजिल एक दिन, ये फैले हुए उनके पर बोलते हैं, वही लोग रहते हैं खामोश अक्सर, जमाने में जिनके हुनर बोलते हैं! या शायरीने त्यांनी आमदार लांडगे यांची पाठराखण केली होती. त्यावर पवारांनीही शायरीच्या माध्यमातूनच उत्तर दिले. हर पंख फैलाने वाला परिंदा उड नहीं पाता, कही सपनें घमंड और गलत दिशा में टूट जाते हैं! हुनर की बातें करने से कुछ नहीं होता, जमाना उसी को पहचानता है, जो मैदान में उतर के शाबीत करे! अशी शायरी पवारांनी प्रत्युत्तरादाखल सांगितली. दुसर्याच दिवशी झालेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्यू पडे हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में! असा थेट इशारा देऊन शेरोशायरीच्या जुगलबंदीला पूर्णविराम दिला होता. मुख्यमंत्र्यांची हीच शायरी अखेर खरी ठरली.
राष्ट्रवादी (शरद पवार गट), मनसे, उबाठा अन् काँग्रेसला भोपळा
हायव्होल्टेज ठरलेल्या या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीमध्येच इतकी जुंपली की इतर पक्षाची चर्चाच गायब झाली. शिवसेना उबाठा गटाने 48, काँग्रेसने 55 तर मनसेने एक जागा लढविली; मात्र भाजप आणि राष्ट्रवादीच्या टोकाच्या संघर्षात या तीनही पक्षांना भोपळाही फोडता आला नाही. गतवेळी एका जागेवर विजय मिळविलेल्या काँग्रेसला या वेळी एकही जागा मिळाली नाही. विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटालाही एकही जागा मिळाली नाही.
गेल्या काही वर्षांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार महेश लांडगे या दोन दादांमध्ये सुप्त राजकीय संघर्ष सुरू होता. वेळोवेळी त्याचा प्रत्यय येत होता. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने हा संघर्ष उफाळून आला. पवारांनी थेट लांडगेंवर आरोपांच्या फैरी सुरू केल्याने लांडगेंनीही एकेरी भाषेत प्रत्युत्तर देत पवारांना अंगावर घेतले. त्यामुळे ही निवड प्रतिष्ठेची बनली होती. भाजपच्या स्थानिक पदाधिकार्यांनी यावर भाष्य करणे टाळले. त्यामुळे आमदार लांडगेंसमोर मोठे आव्हान उभे राहिले. भोसरीच्या मैदानातच विजयाची सभा घेण्याचा दावा पवारांनी केला होता, त्याच भोसरी विधानसभा मतदारसंघातील 48 जागांपैकी 35 जागा मिळवून लांडगेंनी शहरात मीच दादा असल्याचे स्पष्ट केले.
जगतापांचा करिष्मा कायम!
पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणामध्ये जगताप कुटुंबीयांचा करिष्मा कायम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. 2017 मध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवडमध्ये परिवर्तन घडवले. शहरामध्ये भाजपची निर्विवाद सत्ता आणली. तोच करिष्मा 2026 मध्ये देखील पहायला मिळाला. यंदाच्या निवडणुका निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. यामध्ये देखील भाजपने निर्विवाद सत्ता मिळवत पिंपरी चिंचवड मध्ये कमळ फुलवले.
माजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर ही पहिलीच महापालिका निवडणूक होती. त्यांची उणीव नक्कीच आम्हाला होती. मात्र, त्यांनी दिलेले विचार आणि शहराचा विकास हेच अंतिम ध्येय मानून आम्ही काम केले. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचा विजय सुज्ञ मतदारांचा विजय आहे विकासाला विरोधाची झालर चढवण्याचा प्रयत्न झाला मात्र मतदारांनी तो खोडून काढला.
आमदार शंकर जगताप